कर्तृत्ववान तरुणाईचा रौप्य महोत्सव

रिंगणे (ता. लांजा) या मूळ गावात श्री गांगो युवक मंडळातर्फे झालेल्या सन्मानामुळे भारावून गेलेले राजापूर लांजा नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी व्यक्त केलेल्या भावना.

…………………………..

महिनाभर मी लांज्यातच होतो. प्रभानवल्ली-खोरनिनको येथे होऊ घातलेल्या संघाच्या सातव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचा व्याप मोठा असणार याचा अंदाज आल्याने त्याची तयारीसुद्धा तेवढ्याच ताकदीने करावयाची, असे ठरविले होते. कामातील व्यग्रता, धावपळ त्यामुळे थकवा जाणवायचा. एक दिवस आमचे मित्र प्रकाश अपंडकर यांचा फोन आला. “व्हॉट्सअॅप पाहिलेस का?”
“नाही.”
“नंतर बघ ,तुला महाशिवरात्रीच्या कार्यक्रमात सन्मानीत करायचा मंडळाचा निर्णय झालाय .या वर्षी गांगोच्या यात्रेचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे.”
“अरे व्वा! छान आहे. मी येईन कार्यक्रमाला.”

रिंगणे या माझ्या गावात माझा सन्मान होणार या निमंत्रणाने मी खुलून गेलो. एक चैतन्यच अंगात संचारले. संमेलनाच्या पूर्वतयारीने वेग घेतला आणि संमेलनही तितक्याच दिमाखदारपणे पार पडले. त्याला एवढी प्रसिद्धी मिळाली की आजपर्यंत त्याच्यावर विविध माध्यमांवर भाष्य चालूच आहे.

नंतर अधीर होऊनच गावाला पोहोचलो. माझा कौतुक सोहळा पाहायला लांज्याहून विजय हटकर, मंगेश चव्हाण, संदीप हांदे, प्रणव वाघाटे आणि विशेष म्हणजे माझे मार्गदर्शक आदरणीय नामदेव खामकर आरगावहून आले होते.
गावचे श्री गांगो युवक मंडळ म्हणजे सळसळती तरुणाई. उत्सवाची पंचवीस वर्षे म्हणजे या पिढीची कारकीर्द. त्याचा मीही एक साक्षीदारच. याअगोदर इथे ‘श्री शिवाजी मंडळ” याच मंडळींचे यशोशिखरावर पोहोचले होते, पण काहीतरी कारणामुळे या भाबड्या सेवाव्रतींना ते काम थांबवावे लागले, पण तोपर्यंत सामाजिक कार्याची नशा नसानसात भिनली होती. त्यांना कामाची संधी हवी होती. ती सुवर्णसंधी श्री गांगो युवक मंडळाच्या रूपाने त्यांनीच निर्माण केली. आज ते मंडळ यशस्वीरीत्या सव्विसाव्या वर्षात पदार्पण करते आहे.

मला सन्मान मिळाला. माझ्या पाठीवरून माझ्या मातेने मायेचा हात फिरवल्यासारखे समाधान मला मिळाले. मला त्याबद्दल दोन शब्द बोलता येतील का, याची शंकाच होती. ज्येष्ठ नागरिकांपासून विविध उपक्रम, स्पर्धा यांचे बक्षीस वितरण आणि विशेष सन्मान अशी भली मोठी कार्यक्रमांची यादी दोन तासांत निपटणे कठीणच. तशात पुढे नाटकाचाही खेळ असल्याने आयोजक जो निर्णय घेतील तो योग्यच असणार होता. बोलायला संधी मिळाली नसती तरी नाराज होण्याचीही काही गरज नव्हती. तरीही माझ्या नावाचा पुकारा झाला, “यापुढे सुभाष लाड २ मिनिटे बोलतील.”

कमी वेळेत माझे कृतज्ञतेचे शब्द बोलून थांबलो, पण मंडळ आणि मंडळाचे कर्तृत्ववान पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याबद्दल न बोलताच मला भाषण आवरते घ्यावे लागल्याने मन खट्टू झाले.

मंडळाचे प्रमुख पदाधिकारी माझ्या पिढीतले. आज सगळेच मुंबईत नोकरीनिमित्त स्थिरावले असले तरी बालपण, शिक्षण याच मातीतले. येथील रामनवमीचा उत्सव त्याकाळी सर्वदूर प्रसिद्ध होता. इथेच सुप्रसिद्ध नाटककार ला. कृ. आयरे याना पाहायला मिळाले. तिथे होणारा नाटकाचा खेळ बघायला लोक बैलगाड्यांतून यायचे. पेट्रोमॅक्स बत्तीवर चालणारे नाटक बघायला येणारे लोक एका हातात कंदील व काखोटीला बसण्यासाठी गोणपाट नाहीतर घोंगडीचे फटकूर आणायचे. राम मंदिर आणि जत्रेच्या मधूनच बैलगाडीचा रस्ता जात असल्याने लाल धुरळ्याने सगळेजण माखून जात. ‘संत तुकाराम’ सारखे पाच अंकी नाटक कोंबडा आरवताना संपायचे. तोपर्यंत सगळा प्रेक्षक विठ्ठलभक्तीत लीन झालेला असे. त्या काळात पोरांची संख्या मोठी असे. कुणी दूध पितं, एखादं कडेवर आणि एखादं चालायला लागलेलं पण चालून थकलेलं, एखाद्याला बापाचा खांदा मिळालेला असायचा, असे पोरांचे लटांबर घेऊन अख्खे कुटुंब नाटकाची हौस लुटायला यायचे. जाताना गाढ झोपेत गेलेल्या नाकातोंडात माती गेलेल्या मुलांना उठवतानाचा होणारा कालवा आज समोर उभा राहतो.

मीसुद्धा त्या मुलांपैकी एक आहे. कारण माझ्या आईने एखादेही नाटक चुकवले नसेल, याची मला खात्री आहे. त्यामुळे नकळत्या वयापासून माझा वावर या वाडीत आहे.

पूर्वी या वाडीत स्वर्गीय सयाजी आयरे यांचे दुकान होते. त्यामुळे सुरुवातीला कुणाचा तरी हात धरून ते पुढे वयाच्या पंधरा-सोळा वर्षापर्यंत या दुकानावर जात असू. माझ्या घराजवळची शाळा चौथीपर्यंत असल्याने गावच्या मध्यवर्ती टेकडीवर असलेल्या एक नंबरच्या प्राथमिक शाळेत पाचवीपासून जाऊ लागलो. हायस्कूल आणि केदारलिंग मंदिर त्याच टेकडीवर आहे. तिथे जाण्यासाठी त्याकाळी आतासारखा रस्ता नसल्याने गांगोवाडीतल्या अनेक घरांच्या अंगणातूनच जावे लागे. पाचवीपासून ते अगदी दहावीपर्यंत एकत्र वागलेले आम्ही सवंगडी आजही दोस्ती टिकवून आहोत.

दहावीनंतर कुणी पुढे शिकण्यासाठी, कुणी नोकरी करण्यासाठी वेगवेगळ्या दिशेने मुंबईत पोहोचलो. ऐंशीच्या दशकात फोनही नसताना आम्ही अनेकजण मुंबईत सातत्याने भेटत असू. त्यात प्रदीप अपंडकरची खोली लालबाग मेघवाडीत मध्यवर्ती वाटे. त्याचे वडील आत्माराम अपंडकर आणि चुलतभाऊ रा. दि. अपंडकर गावच्या मंडळात क्रियाशील असल्याने त्यांच्या घरी अनेकजण भेटत असत. गावाकडची ख्यालीखुशालीही मिळत असे. त्यामुळे माझी तेथे हमखास हजेरी असे.

या वाडीत रामनवमीचा कार्यक्रम होत असला तरी राममंदिर हे खासगी होते. पूर्वीप्रमाणे होणारा नाटकाचा खेळही सातत्याने होतोच असे नाही. याव्यतिरिक्त सामुदायिकरीत्या एकत्र येण्याची संधी नव्हती.

कार्यक्रमाच्या निमित्ताने हे सारे डोळ्यांपुढे तरळून गेले. १९६३ साली बांधलेल्या मंदिरातील गांगोदेवाच्या महाशिवरात्रीचा उत्सव करायला २५ वर्षांपूर्वी सुरुवात केली. प्रतिवर्षी हा उत्सव अधिक कलात्मक आणि देखणा करण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. इथला प्रत्येक तरुण तन मन आणि मोकळेपणाने धन देऊन कामास उतरतो. पदाधिकारी कोण आहे, याचा विचार इथे गौण असतो. मंडळाचा कार्यक्रम यशस्वी करणे या एकाच ध्येयाने झपाटलेला दिसतो. चांगला विचार कुणी मांडला, तरतो कुणी मांडला याचा खल न करता चांगला आहे तर आपला आहे, असे म्हणून त्यात जीव ओतणारा तरुण ज्या संस्थेकडे आहे, ती संस्था लौकिकास पात्र ठरल्याशिवाय राहत नाही. हे तरुण जसे शिमग्यात, गणपती उत्सवात आणि महाशिवरात्रीला एकत्र येतात, तसेच वाडीतल्या कुणाच्याही मंगल कार्यातही यजमान होऊन राबतात. कुणाच्याही दु:खात खंबीर आधार होऊन पाठीशी उभे राहतात. संपूर्ण वाडी एक कुटुंब म्हणून राहते, म्हणूनच त्यांच्या वाडीतील सार्वजनिक असो अथवा कुणाचा वैयक्तिक कार्यक्रम, तो राजेशाही थाटात तसाच तो नियोजनबद्धच असणार याबाबत शंकाच नको.
हे वर्ष तर उत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष. मग कार्यक्रमांची रेलचेल तर विचारूच नका. धार्मिक कार्यक्रमांबरोबर सामाजिकता जोपासणारेही उपक्रम राबविले गेले.

म्हणूनच पाच दिवसांची जत्रा झाली. शिवलूलामृताचे पारायण, कीर्तन, भजन, मुलांसाठी हस्ताक्षर स्पर्धा, मुला-मुलींच्या कबड्डी-क्रिकेट स्पर्धा आणि रेकॉर्ड नृत्यही, ज्येष्ठांविषयी आदर व्यक्त करताना ‘ आई’ या संकल्पनेतून ज्येष्ठ महिलांना मंचकावर आणून सन्मानीत केल्याने आपल्या कर्तृत्वान मुलांच्या पाठीवर हसऱ्या भरल्या डोळ्यांनी मातांनी दिलेल्या आशीर्वादाने अवघा माहोल कृतकृत्य झाला. बाह्यक्षेत्रात नाव कमविणाऱ्या आणि त्यायोगे रिंगणे गावाचे नाव रोशन करणाऱ्या व्यक्तींनाही इथे सन्मानीत करून मंडळाकडे विशाल दृष्टिकोन असल्याची जाणीव करून दिली.

नाटक ही आमच्या गावाची जुनी परंपरा. ती जपण्यासाठी ‘ शोध सुखाचा’ या नाटकाने कार्यक्रमाची सांगता करताना नाट्यपरंपरेत वावरलेल्या या गावातील स्वर्गीय नाट्य कलाकारांच्या दुवा घेण्याचे कामही मंडळाने केले म्हणूनच त्यांना मनापासून सलाम!

हे मंडळ उत्तरोत्तर मोठे व्हावे, त्यांच्याकडून होणारा महाशिवरात्री उत्सव प्रतिवर्षी अधिक आनंददायी व्हावा, त्यांच्याकडून लोकोपयोगी कामे होत राहोत यासाठी शुभेच्छा देताना इथल्या प्रत्येकाला आयुरारोग्य लाभो, अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. मला सन्मान देऊन त्यांनी दिलेले प्रेम ही माझ्यासाठी ऊर्जा आहे, असे समजून त्यांचा कायमचा ऋणी राहीनच. तसेच हे प्रेम वाढविण्याचाही प्रयत्न करीन.

  • सुभाष लाड, मुंबई

(98691 05734)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply