चित्पावन मंडळाच्या पुरस्कारांचे रविवारी वितरण

रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळाने २०२१- २०२२ सालचे वार्षिक पुरस्कार जाहीर केले आहेत. या पुरस्कारांचे वितरण ८९ व्या वर्धापनदिनी, येत्या रविवारी (दि. २७ मार्च) सायंकाळी ४.३० वाजता मंडळाच्या जोशी पाळंद येथील ल. वि. केळकर वसतिगृहातील भगवान परशुराम सभागृहात होईल.

या सोहळ्याआधी पुणे येथील देणगीदार आसावरी केळकर यांनी पती (कै.) विश्वनाथ केळकर यांच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीतून आनंदीबाई त्रिविक्रम केळकर मुलींच्या वसतिगृहाच्या कक्षाचे नामकरण होणार आहे.

मुख्य कार्यक्रमात (कै.) सौ. सुधा वसंत बडे आदर्श महिला पुरस्कार ३ महिलांना देण्यात येणार आहे. यामध्ये नलिनी गाडगीळ (अडूर, ता. गुहागर), सौ. सुनीता गोगटे (मावळंगे, ता. रत्नागिरी), डॉ. माधुरी जोशी (वाडा, ता. देवगड) यांचा समावेश आहे. आदर्श विद्यार्थी पुरस्कार ल. वि. केळकर वसतिगृहातील तन्मय कवठेकर, आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार मंडळाच्या आनंदीबाई त्रिविक्रम केळकर मुलींच्या वसतिगृहातील स्वरदा पाध्ये, युवा गौरव पुरस्कार कश्ती शेख हिला देण्यात येईल.

मंडळाचा जीवनगौरव पुरस्कार रत्नागिरीतील ज्येष्ठ डॉक्टर अलिमियॉं परकार यांना जाहीर झाला आहे. संस्कृतप्रेमी पुरस्कार कविकुलगुरू कालिदास विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांना देण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर शौर्य पुरस्कार करोनाकाळात अंत्यसंस्कार करण्यात महत्त्वाची जबाबदारी निभावणारे नगरपालिकेचे जितेंद्र विचारे आणि युवा सर्पमित्र अनिरुद्ध गोगटे या दोघांना सन्मानाने प्रदान करण्यात येणार आहे. बाजीराव-मस्तानी पुत्र समशेरबहाद्दर पुरस्कार गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिकी शाळेतील (तासगाव) श्रेयस शिंगटे या विद्यार्थ्याला देण्यात येणार आहे.

वर्धापनदिनाचे औचित्य साधून चिपळूणमध्ये महापुरावेळी मदतकार्य करणाऱ्या रत्नदुर्ग माउंटेनिअर्सला गौरवण्यात येणार आहे. विविध पुरस्कार आणि गणित, संस्कृत विषयातील पारितोषिकांचे वितरण या समारंभात करण्यात येणार आहे. मंडळाचे सहकार्यवाह अनंत आगाशे यांचा पुत्र गौरांग याचा विशेष सत्कार केला जाणार आहे. त्यांनी करोना कालखंडात घरपोच किराणा सामानाचे वाटप व घरपोच खाद्यपदार्थ विक्रीसाठी अनबॉक्स हे अॅप सुरू केले. कार्यकारिणी सदस्य गोविंद भिडे (संगमेश्वर) यांचा डॉक्टरेट झालेला मुलगा केदार आणि ज्येष्ठ सभासद योगशिक्षक शशिकांत लिमये यांचा नातू कपिल सुनील लिमये सीए झाला म्हणून त्यांचाही सत्कार केला जाणार आहे.

याशिवाय वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेल्या मंडळाच्या आजीव सभासदांचा सन्मान मंडळातर्फे करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाने दिली आहे.

पुरस्कारार्थी

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply