नववर्षात स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या किमान दोन नव्या शाखा – अॅड. पटवर्धन

रत्नागिरी : लागोपाठ दुसऱ्या आर्थिक वर्षातही स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने उत्तम आर्थिक भरारी घेतली आहे. करोनाची परिस्थिती निवळल्यानंतर येत्या वर्षभरात किमान दोन नव्या शाखा सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

गेल्या आर्थिक वर्षाचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, पतसंस्थेला नव्या शाखा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र करोनाच्या काळात शाखा सुरू करणे शक्य नव्हते. आता परिस्थिती निवळल्याने दोन ते तीन शाखा सुरू केल्या जाणार आहेत. सन २०२१-२२ हे वर्ष अर्थकारणाच्या दृष्टीने खूप आव्हानात्मक होते. करोना लॉकडाउनमुळे अर्थचक्र मंदावले होते. अर्थकारणात कमालीची अनिश्चितता आली होती. अशा या अस्थिर कालखंडात अर्थव्यवहार वाढवणे हे मोठे आव्हान होते. मात्र स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने ते लीलया पेलले आणि प्रतिवर्षाप्रमाणे उत्तम आर्थिक स्थिती प्राप्त केली आहे. गेल्या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवी २५० कोटी ३१ लाख तर कर्ज १७० कोटी ५१ लाख झाले असून संस्थेच्या गुंतवणुका ११९ कोटी ६९ लाख झाल्या आहेत. संस्थेचा निधी २९ कोटीहून अधिक आहेत. स्वनिधी ३१ कोटी ८५ लाख, मालमत्ता ३ कोटी ५५ लाख झाल्या आहेत.

करोनामुळे प्रभावित झालेल्या वर्षातही संस्थेने कर्जदारांची वसुली नियमित भरण्याचे आपले कर्तव्य नेटाने बजावल्याने ९९.५१ टक्के एवढी विक्रमी वसुली झाली आहे. संस्थेचा नेट एनपीए ० टक्के ठेवण्यात संस्था यशस्वी झाली. १७ शाखांपैकी ८ शाखांची वसुली १०० टक्के झाली असून पावस, राजापूर, खंडाळा, नाटे या शाखाही जवळजवळ १०० टक्क्यांच्या जवळ आहेत. उर्वरित थकबाकीपैकी ५० टक्के थकबाकी दोन कुटुंबांची आहे. संबंधित कर्जदारांविरुद्ध दावे दाखल केले असून त्या कर्जदारांना पर्याप्ततेपेक्षा अधिक मूल्याचे नोंदणीकृत तारण संस्थेने घेतले आहे. तसेच या थकीत कर्जाची १०० टक्के तरतूद संस्थेने केली आहे.

श्री. पटवर्धन म्हणाले, संस्थेच्या सर्व शाखा नफ्यात असून चालू वर्षी ६ कोटी २१ लाख निव्वळ नफा मिळाला. खेळत्या भांडवलाच्या २ टक्के प्रमाणात हा नफा आहे. नफ्याचे हे प्रमाण आर्थिक संस्थेसाठी लक्षणीय आहे. सर्व प्रकारच्या तरतुदी केल्यानंतर राहिलेला निव्वळ नफा संस्थेच्या उत्तम व्यवस्थापनात कौशल्य व उपलब्ध निधीचा पर्याप्त वापर यामुळे शक्य झाला आहे.

सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवींमध्ये २४ कोटींनी वाढ झाली. संस्थेच्या १७ शाखांपैकी ८ शाखांमधील ठेवींमधील वाढ १ कोटीपेक्षा अधिक आहे. मारुती मंदिर शाखेमध्ये गेल्या आर्थिक वर्षात ५ कोटी ३८ लाखांच्या ठेवी वाढल्या आहेत. एकूण २५० कोटी ३१ लाखाच्या ठेवी ७३ हजार ७८७ ठेव खात्यांच्या माध्यमातून संस्थेकडे जमा आहेत.
संस्थेची ग्राहक सभासद संख्या ४० हजार ८९० झाली असून सर्व प्रकारच्या कर्जदारांची संख्या २२ हजार ७३० झाली आहे. सातत्यपूर्ण अर्थकारणाला पूरक असा हा व्यापक जनाधार असलेले हे स्वरूपानंद पतसंस्थेचे अर्थविश्व आहे. ३१ वर्षाच्या अखंड वाटचालीत विश्वासार्ह, पारदर्शकता, ग्राहकाभिमुख, अद्यायावत तंत्रज्ञानानेयुक्त अशी ओळख दृढ केलेली स्वामी स्वरूपानंद पतसंस्था सहकार क्षेत्रात सहकार तत्त्वाला व्यावसायिकतेची जोड देत मार्गक्रमणा करीत आहे. व्हॉटसअॅपद्वारे ग्राहकांना त्यांचा बॅलन्स आणि खातेव्यवहार यांची माहिती मागताक्षणी उपलब्ध करून देणारी स्वामी स्वरूपानंद ही कोकणातली एकमेव संस्था आहे. समाजाचे दायित्व ओळखून पतसंस्थेने सोशल वेल्फेअर फंडातून १३ लाख ७१ हजाराचा खर्च करोनाच्या कालावधीत सामाजिक महत्त्वाच्या उपयुक्त कार्यावर केला, असेही अॅड. पटवर्धन यांनी सांगितले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply