परशुराम घाटात २० एप्रिलपासून दररोज दुपारी ५ तास मेगाब्लॉक

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटातील वाहतूक येत्या २० एप्रिलपासून घाटाची दुरुस्ती होईपर्यंत दररोज दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

याबाबतचा ताजा अपडेट वाचा पुढील लिंकवर

गेल्यावर्षी परशुराम घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या होत्या. एका दरडीखाली गा़डले गेल्याने एका घरातील तिघांचा मृत्यू झाला होता. यावर्षीचा पावसाळा आता जवळ आला आहे. पावसाळ्यात घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प होऊ नये, यासाठी आतापासूनच गतीने घाटाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. भूस्खलन होऊ नये आणि चौपदरीकरणासाठी सुरू असलेले रुंदीकरण गतीने व्हावे, यासाठी २० एप्रिलपासून दुपारी १२ ते ५ या वेळेत वाहतूक थांबवून उन्हात काम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज परशुराम घाटाची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या आढावा बैठकीनंतर ऑनलाइन पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची माहिती दिली.

घाटरस्त्यावर मोठ्या प्रमाणात असणारी माती हटवण्यासाठी रस्ता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळी हंगाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर चाकरमानी आणि पर्यटक कोकणात येणार आहेत. त्यांच्या सोयीकरिता छोट्या गाड्यांसाठी पर्यायी मार्गाचा विचार केला जात आहे. सध्या आंब्याच्या वाहतुकीचा हंगाम आहे. पण भर दुपारी आंब्याची वाहतूक होत नाही. त्यामुळे दुपारच्या वेळेत रस्ता बंद ठेवण्याचा विचार करण्यात आला आहे. घाटातील काम गतिमान पद्धतीने व्हावे, यासाठी उत्खनन करणाऱ्या यंत्रांची संख्या वाढविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. येत्या १९ एप्रिलपर्यंत महामार्ग बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे, असे श्री. सामंत यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply