पंचम वेदाच्या पुनरुज्जीवनाचे पुण्यकर्म करणारे पं. पलुस्कर

कुरुंदवाड (जि. कोल्हापूर) येथे ७ आणि ८ मे २०२२ या दिवशी हिंदुस्थानी संगीताचे उद्धारकर्ते, कलासाधक पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्या जन्मगावी संगीत महोत्सव होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या विश्वरूप कार्यकृतीचे सूक्ष्म दर्शन.

………………………………..

आपण ज्या कलेला हिंदुस्थानी संगीत म्हणतो, ती कला आज जगभराच्या कानाकोपऱ्यात पोहोचून जगविख्यात झाली, समृद्ध झाली, प्रवाहित झाली, त्या कलेचे उद्गाते ,पं. विष्णु दिगंबर पलुस्कर या नावाचे महामानव, संगीत साधक, प्रचारक उपाधींनी सन्मान्य झालेले एक थोर गानगुरू होते. हिंदुस्थानी संगीत जे आज सर्वार्थांनी सर्वस्थानी, सुप्रतिष्ठित झालेले दिसते, त्या कलेचा अठराव्या शतकापर्यंतचा इतिहास सदाचार, सन्मान, सद्विचार यांच्यापासून फार दूर होता. म्हणून प्रतिष्ठित, घरदांज लोक आणि उच्चवर्गीय स्त्रिया संगीतापासून फार दूर होत्या. या कलेला प्रतिष्ठा, सन्मान आणि उच्च दर्जा मिळायचा असेल तर व्यसनी, लहरी, असंस्कृत अशा गुरूंच्या जागी विद्वान, स्वरसाधक, सुसंस्कृत, प्रतिष्ठ‍ित असे गुरू तयार होण्याची अनिवार्य गरज आहे, हे ओळखून तातडीने असे शिष्य घडविण्याचे कार्य पं. पलुस्करांनी हाती घेतले.

कला ही सन्मान्यच असली पाहिजे. कलासाधक, कलाकार समाजात मानाने स्थानापन्न झाला पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. यासाठी संपूर्ण भारतभ्रमण करून त्यांनी देशातील स्थ‍िती पाहिली. अशिक्ष‍ित, असंस्कृत, दुराचारी गुरूमुळे संगीत कला अप्रतिष्ठित राहिली. आचरण शुद्धी, सुसंस्कार, संगीत साधना याचे आचरण गुरूंनी करावे, यासाठी प्रचार करून त्यांनी शेकडो ठिकाणी अभ्यासक्रम सुरू केले. परीक्षा, अभ्यासक्रम, प्रमाणपत्र या गोष्टीचा उपयोग त्यांनी सुरू केल्यामुळे एक नियमबद्ध परीक्षा पद्धती अमलात आली.

लाहोर येथे त्यांनी ५ मे १९०१ रोजी गांधर्व महाविद्यालय स्थापन केले. उद्घाटनाच्या दिवशी पलुस्कर स्वत: तानपुरा घेऊन साधनेला बसले. पहिल्या दिवशी एकही विद्यार्थी आला नाही. आज हजारोंच्या संख्येने अभ्यास वर्ग सुरू झाले आहेत. हा मधला प्रगती प्रवास हे विष्णु दिगंबर यांचे कार्य! आज दरबारांपासून घरादारांपर्यंत संगीताला मिळालेली प्रतिष्ठा हे त्यांचे योगदान!

सर्वांगीण सांगीतिक अभ्यास केलेले १०० शिष्य तयार करून त्यांनी प्रचार केला. ओंकारनाथ ठाकूर, नारायणराव व्यास, विनायकराव पटवर्धन, कशाळकर यांना देशभर आणि नंतर जगभर पाठवून अध्ययनाची सोय केली. लाहोरच्या पहिल्या शाळेच्या पहिल्या दिवशी जेथे एकही विद्यार्थी नव्हता, त्या जागी आता हजारो शाळांमधून कित्येक हजार विद्यार्थी संगीत साधना करताहेत. अशा एका ऋषितुल्य महागुरूंना आशीर्वाद होता त्यांचे गुरू बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांचा.

पलुस्कर यांच्या जन्मगावी कुरुंदवाड येथे त्यांची मूर्ती स्थापित होत आहे. तसेच एक संगीत महामहोत्सव होत आहे. अशा मंगल प्रसंगी माझ्यासारख्या असंख्य साधकांच्या वतीने मी गुरुदेव पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांना अभिवादन करतो!

  • माधव गावकर
    कणकवली
    (संपर्क : 9423879207)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply