कर्वेबुवांनी कीर्तनसंध्येत मांडला १८५७ च्या स्वातंत्र्यसमरापूर्वीच्या शहा घराण्याचा इतिहास

रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने आयोजित कीर्तनसंध्येत पनवेल येथील हभप कीर्तनभास्कर अनंत गणेश तथा नंदकुमार कर्वे यांनी गोंडवन संस्थानच्या राजघराण्यातील नरहर-शंकर-रघुनाथशहा या तीन पिढ्यांचे १८५७ च्या प्रसिद्ध स्वातंत्र्यसमरापूर्वीचे बलिदान मांडले. अतिशय रंगतदार झालेल्या या कीर्तनाला कीर्तनप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला.

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात कीर्तन रंगले. त्यांना तबलासाथ विश्वनाथ दाबके आणि हार्मोनियमसाथ चैतन्य पटवर्धन आणि तालवाद्य साथ किरणबुवा जोशी यांनी केली. सुरवातीला राणी लक्ष्मीबाई आणि भारतमातेचे पूजन श्री. कर्वे बुवा, ज्येष्ठ हभप भालचंद्र हळबेबुवा, कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, कीर्तन कुलचे हभप किरणबुवा जोशी यांनी केले.

घरातूनच भजन, कीर्तनाचा वारसा हभप कर्वे बुवांना लाभला. त्यांच्या कीर्तनातून याची झलक पाहायला मिळाली. रागदारी गायनासह कीर्तन करताना त्यांच्या भारदस्त आवाजाची जोड मिळाली. हार्मोनियम वादनात संगीत विशारद, संगीत अलंकार असल्याने त्यांचे कीर्तन उत्तरोत्तर रंगत गेले.

भारतीय स्वातंत्र्यासाठी देशभरातील विविध ठिकाणच्या देशभक्तांचे योगदान होते. त्यामध्ये गोंडवन संस्थानच्या राजघराण्यातील पिढ्यांचेही योगदान होते. या तीन पिढ्यांचे बलिदान त्यांनी मांडले. नर्मदा खोऱ्यातील गोंडवन संस्थान इंग्रजांनी खालसा केले. त्यावेळी तेथील राजा नरहरशहाचा संघर्ष तोकडा पडला आणि पुढे त्याला अरण्यवास पत्करावा लागला. एका गुहेत राहून बिकट परिस्थितीत जीवन जगत असताना आपला १२ वर्षांचा मुलगा शंकरशहा याला स्वराज्यप्राप्तीचे महत्त्व पटवून देत असतानाच युद्धकलेचे शिक्षणही नरहरशहाने दिले. वयोमानानुसार स्वराज्यप्राप्तीचे स्वप्न अर्धवट ठेवून नरहरशहा गतप्राण होतो.

पुढे शंकरशहा आदिवासी सैन्य संघटन करून आसपासच्या अनेक संस्थानांच्या राजांना घेऊन इंग्रजांविरुद्ध मोठा लढा देतो. या शंकरशहाला पकडण्याकरिता अरण्यात आलेल्या जेकिन्स साहेबाच्या अधिपत्याखाली तीन हजार फौजेचा खातमा शंकरशहा करतो. इंग्रजांचा एकही सैनिक जिवंत सोडत नाही. या पराभवाचा प्रचंड धसका इंग्रज सरकार घेते.

कालांतराने शंकरशहाला एक सुपुत्र होतो. त्याचे नाव रघुनाथशहा. तोही राष्ट्राभिमानी होता. इंग्रजांच्या दुसऱ्या हल्ल्यात शंकरचा एक सहकारी राजा चैनशहा पकडला जातो. या हल्ल्यात शंकरशहाच्या अनुपस्थितीत पराभव पत्करावा लागतो. चैनशहाला तुरुंगवास पत्करावा लागतो. तेथे हाल हाल होऊन त्याचा मृत्यू होतो. पुढे रघुनाथशहा जबलपूर रेजिमेंटमध्ये दाखल होतो आणि शत्रूच्या सर्व हालचालींच्या बातम्या गुप्तपणे वडिलांना पुरवतो. असाच एकदा एका समारंभात सहभागी होणाऱ्या मॅगग्रेगर साहेबाला मारण्याकरिता शंकरशहा येतो आणि नियोजन केल्याप्रमाणे त्याला मारतो. मात्र पुढे एकदा मुलाबरोबर सल्लामसलत करत असताना फितुरीमळे दोघेही राहत्या गुहेत पकडले जातात. त्यांच्याविरुद्ध इंग्रज सरकार राजद्रोहाचा खटला भरते. दोघांनाही तुरुंगवास होतो आणि शेवटी १८ सप्टेंबर १८५७ रोजी शंकरशहा आणि रघुनाथशहा या दोघांनाही तोफेच्या तोंडी दिले जाते. एकाच राजघराण्यातील तीन पिढ्यांनी बलिदान स्वातंत्र्याकरिता केले. आजही गोंडवन संस्थानच्या गढमंडला या राजधानीत त्यांचा स्मृतिदिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. असे हे नरहर-शंकर-रघुनाथशहा यांचे पराक्रमी राजघराणे होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला शाल, श्रीफळ व पुस्तक भेट देऊन कर्वेबुवांचा सत्कार ज्येष्ठ कीर्तनकार भालचंद्र हळबेबुवा यांच्या हस्ते करण्यात आला. अन्य कलाकारांचा सत्कार अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केला. कार्यक्रमाचे निवेदन किरण जोशीबुवा यांनी केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply