रत्नागिरी : शिक्षक हा सदैव एक विद्यार्थी असतो. विद्येचा ध्यास घेऊन जगणारे कधीच थांबत नाहीत, अशा विनम्र शब्दांत निरबाडे (ता. चिपळूण) येथील श्री रामवरदायिनी शिक्षण मंडळ संचालित श्री रामवरदायिनी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक मोहन कोंडीबा पाटील यांनी आपल्याला असलेल्या जबाबदारीची जाणीव व्यक्त केली.
श्री. पाटील यांनी सलग ३६ वर्षे सेवा केली. नियत वयोमानानुसार निवृत्त होत असल्याने त्यांना चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत निरोप देण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. मुख्याध्यापक या जबाबदारीच्या पदावरून सेवानिवृत्ती म्हणजे एक औपचारिकता आहे. सेवेची जबाबदारी पूर्वी होती, तेवढीच असेल. सामाजिक कार्यात मी सदैव कार्यरत राहणार आहे, असे आश्वासक उद्गारही श्री. पाटील यांनी यावेळी काढले.
निरोप समारंभात बोलताना श्री. पाटील यांच्याविषयी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्याध्यापक श्री. पाटील यांनी विज्ञान विषयाबाबतची आवड आणि महत्त्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पटवून देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केला. त्यातून तालुका विज्ञान शिक्षण मंडळाचे अध्यक्ष या नात्याने विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक आदर्श विद्यार्थी घडविले. विज्ञान प्रदर्शन, विज्ञान मेळावे, विज्ञान शिबिरे, नाट्यस्पर्धा, विज्ञान कार्यशाळा, पर्यावरणविषयक उपक्रम याद्वारे त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्याचा नावलौकिक वाढविण्यात मोलाची कामगिरी बजावली. जिल्हास्तरावर समन्वयकाचे काम त्यांनी सेवाभावी वृत्तीने केले. माझी शाळा माझी जबाबदारी. संकल्प काकांच्या विचारांचा, शाळामाऊलीच्या हाकेला उदंड प्रतिसाद, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती असे अनेक प्रोत्साहनात्मक उपक्रम त्यांनी राबविले. अलीकडेच त्यांना तालुका विज्ञान शिक्षक मंडळाचा विज्ञान मित्र पुरस्कार देण्यात आला. श्री. पाटील सर यांच्या अशा वैविध्यपूर्ण कार्याचा उल्लेख काहींनी केला. अनेकांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत.
जबाबदारीची जाणीव असलेले असे शिक्षकच उद्याची पिढी घडवत असतात. सेवानिवृत्तीनंतरही श्री. पाटील यांनी कार्यरत राहणार असल्याचा दिलेला दिलासा समाजासाठी उपयुक्त आहे, अशा शब्दांत आमदार श्री. निकम यांनी आपले विचार व्यक्त केले.
निरोप समारंभाला शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिलीप महाडिक, कार्याध्यक्ष राजेंद्र महाडिक, चिटणीस अजय महाडिक इतर पदाधिकारी, माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, देवस्थान ट्रस्ट, चारगाव समाजसेवा मुंबई मंडळाचे पदाधिकारी, हायस्कूलचे शिक्षक, श्री. पाटील सरांचा मित्रपरिवार आणि माजी विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

