पावसाळ्यात वीज पडण्याचा धोका समजण्यासाठी दामिनी अॅप अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्याचा उपयोग नागरिक आणि शेतकऱ्यांनीही करणे आवश्यक आहे.
…………………………….
मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी किंवा परतीचा पाऊस सुरू होण्याच्या कालावधीत अनेकदा विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडतो. काहीवेळा वादळेही होतात. यात अनेकदा वित्तहानी व जीवितहानी होते. ती टाळण्याच्या उद्देशाने पुण्यातील उष्ण कटीबंधीय हवामान शास्त्र संस्था (IITM)आणि पृथ्वी प्रणाली विज्ञान संस्था (ESSO) यांच्या संयुक्त विद्यमाने दामिनी हे विजांच्या लखलखाटांचा इशारा देणारे मोबाइल ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपमुळे शेतकऱ्यांना विजांच्या कडकडाटांचा व वादळी पावसाचा अंदाज साधारणतः १५ ते ४५ मिनिटे अगोदर मिळू शकतो. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजनाही करणे शक्य होणार आहे.
मुळदे (ता. कुडाळ) येथील उद्यान विद्या महाविद्यालयातील ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाचे डॉ. यशवंत मुठाळ यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, विजेचे झटके आणि कडकडाट ही एक अशी घटना आहे की, जी घटना केवळ हानी पोहोचवत नाही, तर भयभीतही करते. प्रत्येक सेकंदाला पृथ्वीवर सुमारे ५० ते १०० विजेचे झटके येतात. अलीकडच्या काळात पृथ्वीवर इतर नैसर्गिक आपत्तीच्या तुलनेत वीज सर्वाधिक मारक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. एकट्या विजेमुळे भारतात दरवर्षी सुमारे अडीच हजार मृत्यू होतात.
लवकरच पावसाळ्याला सुरुवात होत आहे. पाऊस म्हणजे नवनिर्मिती. पाऊस म्हणजे हिरवाई अन् मनमुराद आनंद ! परंतु, पावसाच्या आधी आकाशात सौदामिनीचा कडकडाट होतोच. तिच्या कडकडाटामुळे आपसुक नुकसानही होते. वीज कोसळून होणारी हानी टाळता येण्यासाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांनी, सामान्य नागरिकांनी काय करावे, काय करू नये यासंदर्भात माहिती देण्यासाठी दामिनी हे ॲप डाऊनलोड करणे आवश्यक आहे.
दामिनी ॲपसाठी IITM ने लाइटनिंग लोकेशन नेटवर्क मॉडेल विकसित केले आहे. माहिती संकलनासाठी विविध भागात सेन्सर बसवण्यात आले आहेत. प्रत्येक सेन्सरची २०० किलोमीटर परिघातील घडामोडींचा वेध घेण्याची क्षमता असून परिसरातील क्षेत्रात आगाऊ इशारा मिळतो. सर्व सेन्सर सेंट्रल प्रोसेसिंग युनिटशी जोडण्यात आले असल्यामुळे वादळी पाऊस, विजांच्या कडकडाटाचे अचूक अंदाज आणि घडामोडी नगरिकांना घरबसल्या समजणार आहेत.
नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी हे ॲप आपल्या मोबाइलवर डाऊनलोड करून घ्यावे. त्याचबरोबर आपले नाव, मोबाइल नंबर, पत्ता, पिनकोड आदीची माहिती ॲपमध्ये नोंद करून घ्यावी.
अॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक –
https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानेही याबाबत सर्व जिल्ह्यांना पत्र पाठवून जिल्हास्तरावर वीज कोसळून होणाऱ्या हानीसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या आहेत. यात प्रामुख्याने दामिनी ॲपबाबत जागृती निर्माण करून त्याचा व्यापक प्रमाणावर प्रचार आणि वापर करण्याबाबत विशेष सूचना केली आहे. या ॲपचा नागरिकांनी जरूर वापर करावा आणि संभाव्य होणाऱ्या हानीपासून बचाव करावा, असे सूचित करण्यात आले आहे.
- प्रशांत सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी
सिंधुदुर्ग