पर्यावरण आणि प्रियश्री अभ्यागताश्रम

दापोली तालुक्यातील पंचनदी येथील वैशंपायन कुटुंबाने काही काळापूर्वी राबविलेला पर्यावरण रक्षणाचा उपक्रम आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने थोडेसे चिंतन.

………………………..

जग आकाराने जेवढे मोठे असेल, त्याच्या कितीतरी पट पर्यावरण हा विषय मोठा असेल. कारण ब्रह्मांडात जे घडतंय त्याचा गंधही मानवाला नसावा. Enviroment हा शब्द Environ या फ्रेंच शब्दापासून तयार झाला आहे. मुळात ही मानसिकता पाश्चात्य, तरीही ती आपल्या देशाला पूरक आहे. कारण सजीव आणि निर्जीव यामधील आंतरप्रवाहामुळे निर्माण झालेली परिस्थिती म्हणजे पर्यावरण! जेथे असेल हिरवळ तेथे बरसेल वरुण, नद्यांना वाहते पाणी मिळेल. जलाशय, बंधारे, तलाव, विहिरींना जीवदान मिळेल. या सर्वांचा मित्र कोण? तर तो म्हणजे एकमेव निसर्ग. त्याचे जतन करणे म्हणजेच पर्यावरण!

मानवात चैतन्य निर्माण व्हावे या हेतूने ५ जूनला जगभर साजरा केला जाणारा हा एकमेव दिवस म्हणजे ‘पर्यावरण दिवस’. त्या दिवशी जवळपासच्या नर्सरीतली उरलेली रोपे घाऊक दरात विकत घेतली जाता. मोठाले रंगीत फ्लेक्स किंवा बॅनर्स लावून सर्वत्र हिरवळीच्या नावाचा जयघोष केला जातो आणि एका दिवसात हरित क्रांती झाल्याचे समाधान मानून सोशल मीडियावर आणि जमल्यास प्रिंट मीडियातसुद्धा सचित्र बातम्या छापून आणल्या जातात. ही झाली पर्यावरणाची आधुनिक परिभाषा! क्षणिक का होईना, तेवढेच समाधान, चमकू प्रसिद्धीच्या सरींमध्ये चिंब झाल्यागत भाषणांचे सूर आसमंतात निनादले की मग जबाबदारी पूर्ण झाली, असे समजून पुढल्या ५ जूनपर्यंत विषय संपला, असे समजायल हरकत नाही. पर्यावरण दिवस जल्लोषात साजरा झाल्यावर पुढील तीच तारीख येईपर्यंत कुणी ढुंकूनही जात नसेल, लावलेली रोपे मातीत रुजलीत का निजलीत ते पाहायला! हे असे सारेच आपण सर्व कितीकाळ करत राहणार आहोत?

पर्यावरण ही एक चळवळ आहे. एका पिढीनंतर दुसऱ्या पिढीने ती आपल्या हाती घेतली पाहिजे. ही चळवळ थांबता कामा नये. जशी मानवाला भूक लागते, तो त्यासाठी अन्न मिळवण्याचा रोज प्रयत्न करत असतो, अगदी त्याच चिकाटीने आपल्या परिसरातले पर्यावरण आहे त्याहीपेक्षा जास्त आत्मीयतेने जपले पाहिजे. आज जागतिक पर्यावरण जनजागृतीची शिकवण फक्त कागदावरच अस्वस्थ का आहे? त्याचे चिंतन प्रत्यक्ष अमलात यायला नको का? असे अनेक अनुत्तरित प्रश्न आपल्यासमोर आहेत.
रेचेल लुई या समुद्री जीवशास्त्रज्ञ १९०७ मध्ये जन्मल्या. पर्यावरण चळवळीच्या त्या आद्यप्रवर्तक म्हणून ओळखल्या जातात. ‘सायलेंट स्प्रिंग’ या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकानंतर जगभरात पर्यावरण दक्षतेच्या मोहिमा हाती घेण्यात येऊ लागल्या. निसर्ग निरीक्षण, शेतात फिरणे, रानावनातील जनजीवनाचा अभ्यास करणे, त्याचबरोबर भरपूर वाचन करणे. शिवाय अनुभवकथन किंवा शब्दांकन करणे यासाठी माणूस तत्पर असावा. घरातील सारे त्याच मानसिकतेचे नसतील पण कुटुंबातून किमान एकाने तरी तसा विचार करावा आणि आपण जेथे राहतो त्याच्या आसपासचा परिसर स्वछ असावा. झाडे लावलेली असावीत. त्या झाडांची निगा राखली गेली पाहिजे. रेचेल लुई यांनी सुरू केलेली मोहीम पुढे नेण्यासाठी हातभार लावावा. ही काळाची गरज आहे. ‘दि सेन्स ऑफ वंडर’ हे त्यांनी लिहिलेल्या निबंधावरचे पुस्तक मुलांमध्ये निसर्ग संरक्षण तसेच संवर्धनासाठी आवड निर्माण करू शकले. हे त्यांच्या चळवळीचे फलित होय.

कीटकनाशकांचा परिसंस्थेवर होणारा परिणाम या विषयावरील ‘सायलेंट स्प्रिंग’ या पुस्तकामुळे कीटकनाशक कंपन्यांनी त्यांना कडाडून विरोध केला. तरीही ठिकठिकाणी जनजागृती झाल्याने DDT सारख्या घातक कीटकनाशकांना अमेरिकेत पूर्ण बंदी घालण्यात आली. रेचेल लुई यांनी आपले विचार मुलांमध्ये सहज रुजावेत, म्हणून काव्याचा आधार घेतला. त्यामुळे जगभर तो विचार पसरत गेला. त्यांनी DDTला कीटक-बॉंब म्हणून संबोधले. त्याचा योग्य तो परिणाम झाला. त्यातून निर्माण झालेल्या चळवळीमुळे जमिनीतील जैवशक्तीचे जतन केले गेले. परिणामी आज अमेरिका जगातील सर्वांत जास्त धान्योत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक आहे. रेचेल लुईचे विचार स्वीकारणारा तत्कालीन समाज, त्यांच्यात आलेली जाग हे महत्त्वाचे क्षण होत.

जगात खूप काही चालले आहे. निसर्गसमृद्ध कोकणात काय चालले आहे, याकडेही लक्ष वेधावेसे वाटते. कोकणातील सद्यःस्थितीत पर्यावरण समजून घेण्यासाठी शालेय विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनीच पुढाकार घेतला पाहिजे किंबहुना ती एक शक्ती ठरू शकते. ग्रामीण भागातील काही निवडक शाळांना पूर्वी भातलावणीची दहा दिवसांची सुटी दिली जात असे. त्या दिवसात कुटुंबीयांकडून त्यांच्या पाल्यांना आवण काढणी आणि लावणीचे प्रत्यक्ष शिक्षण दिले जायचे. पण सध्याचे बहुतेक शिक्षक जिल्ह्याबाहेरुून बदली होऊन आलेले असल्याने त्यांच्याकडून जागतिक पर्यावरण दिवस एक शासकीय दिवस म्हणून पाळला जातो. तो दिवससुद्धा समर हॉलिडेजमध्ये येत असल्याने मुले आणि शिक्षक शालेय वास्तूपासून दूरच असतात. यात बदल व्हायला हवा. कोकणातील सर्व ग्रामपंचायती, इतर प्रशासकीय मंडळी, इको-फ्रेंडली जागृत नागरिक, गावातील इतर अनुभवी मान्यवर मिळून विविध ठिकाणी वृक्षारोपण दिवस साजरा केल्याचे समाधान व्यक्त करतात. हाच खरा मानवीय श्वास होय.

त्याशिवाय भूस्खलन हा कोकणातील फार चिंतेचा विषय गेल्या पाच-सात वर्षांपासून स्थानिक रहिवाशांना भेडसावत आहे. विशेषतः डोंगराच्या पायथ्याशी जी जनवस्ती वर्षानुवर्षे राहते, त्यांच्या जीविताला भूस्खलनाच्या धोक्याला सामोरे जावे लागत आहे. याला कारण म्हणजे डोंगरावरील वृक्षतोड! होय, हेवी ड्यूटी व्हेइकल्सचा वापर करून सध्या विविध ठिकाणी वृक्ष, माती, दगड हलवून त्याजागी जमीन सपाट करून इमले सजवण्यासाठी जागा केली जात आहे. वृक्षराजी बुंध्यापासून तोडली गेल्याने त्याखालील माती सैल होते आणि ढगफुटीसारखा पाऊस झाल्यास उर्वरित टेकडी भुईसपाट होते. अशावेळी जीवितहानी होण्याची शक्यता असतेच. गेल्या काही वर्षांत अशा दुर्घटना महाड, चिपळूणसारख्या प्रगत शहरांत झाल्या. त्याकडे प्रशासकिीय यंत्रणेने जास्त लक्ष देणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर दापोली तालुक्यातील एक उदाहरण आवर्जून द्यावे, असे आहे. पंचनदी येथील शेतकरी कुटुंबातील एक विवाहित जोडप्याचा एकूण संसार सुखाचा चालला होता. सौ. वैश्यंपायन या सुशिक्षित महिला सुगृहिणी होत्या. मुळात मेहनती असल्यामुळे त्यांना विविध खाद्यपदार्थ बनविण्याची आवड होती. वार्षिक आंबा लोणचे, आंबा पोळी, आमरस, आंबापोळी, मिरची लोणचे इत्यादी चविष्ट खाद्यपदार्थ बनवून त्याची विक्री त्या करत असत. भाजकी काजूबी, आमसूल, कोकमापासून बनविलेले विविध पदार्थ त्या तयार करत असत. त्याशिवाय सौ. आणि श्री. भाऊ वैशंपायन यांनी आणखी एक इको-फ्रेंडली गृहउद्योग सुरू केला होता. त्याचे नाव प्रियश्री अभ्यागताश्रम. या आश्रमात आलेला माणूस जेवल्याशिवाय जाणे नाही, हे त्या उभयतांचे व्रत होते. प्रख्यात साहित्यिक मारुती चितन्मपल्ली हेसुद्धा या आश्रमात पाहुणचार घेऊन गेले आहेत. मुंबई, ठाणे, पुणे या शहरी भागातील पाचवी ते सातवी इयत्तेत शिकणाऱया विद्यार्थ्यांना शिक्षकांसमवेत या आश्रमात पाहुणचार दिला जायचा. पर्यावरणविषयक प्रत्यक्ष मार्गदर्शन केले जात असे. त्याकरिता भाऊंनी एक अभिनव उपक्रम सुरू केला होता. स्थानिक निर्व्यसनी निपुण व्यक्तीकडून नारळ-पोफळीच्या झाडांवर कमरेला आकडी-कोयती लावून कसे चढता येते, याचे प्रत्यक्ष कृतीतुून शिक्षण दिले जायचे. मुले खुश व्हायची. प्रसन्न वातावरण, नारळ-पोफळीच्या सान्निध्यात पाटाचे वाहणारे पाणी कसे फिरवले जाते, गाईंचे दूध कसे काढले जाते, गोठा स्वच्छ कसा करायचा, शेण, मलमूत्र पुन्हा बागेतील पाटाच्या वाहत्या पाण्यात मिसळून झाडांपर्यंत कसे दिले जाते, रासायनिक खतांऐवजी बागेत बनविलेल्या सोनखताचा वापर का आणि कसा करावा, याचे प्रत्यक्ष शिक्षण दिले जायचे.

त्यापुढे, मुले उन्हे चढण्याआधी रानात भटकंती करण्यासाठी म्हणून निपुण गाइड सोबत घेऊन जायची, ती मजा काही औरच! त्यांचा तो आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही.
त्यांच्या भटकंतीत अनेक अज्ञात रानटी फळझाडांची ओळख मुलांना व्हायची. रानात आळू, चिंच, बोर रानकेळ, आवळा, रायवळ आंबा, बरका फणस, झुडुपातील करवंदे इत्यादी फळांचे जुनाट वृक्ष निसर्गाने जतन केले आहेत . त्यांची ओळख मुलांना प्रत्यक्ष होणे हाच भाऊ वैशंपायन यांचा हेतू होता. रानातील सर्व रानफळे खरे तर रानात राहणाऱ्या पशुपक्ष्यांसाठी असतात. अशा वृक्षांची तोड सुरू झाली, तर रानातील पशुपक्षी मानवी वस्तीत येऊ लागतील. कोकणातील वानरांचा उपद्रव सर्वज्ञात आहे. याची शिकवण त्यावेळी त्या आश्रमात येऊन गेलेल्यांना नक्कीच मिळाली असणार. दोन ते तीन दिवसांचा हा उपक्रम सहलीतून अभ्यास आणि आनंद देणारा होता. हा विचारच किती वेगळा पण इको-फ्रेंडली होता!

भाऊ वैशंपायन पतीपत्नी म्हणजे एक आदर्श कुटुंब होते. दुर्दैवाने दोघेही फार लवकर कायमचे निघून गेले. अशी मेहनती आणि समाजप्रबोधन करणारी जाणकार माणसे यापुढे मिळणे कठीण. त्यांचा तो उपक्रम नंतर कुोणीही त्या परिसरात राबवल्याची माहिती नाही.

अलिीकडेच एक बातमी फेसबुकवर पाहिली अन चकित झालो. मन विचलित झाले. कोविडसारख्या जागतिक नरसंहारक रोगातून मुक्ती मिळते न मिळते तोच मध्य प्रदेशातील एका घनदाट अरण्याची क्रूरपणे छाटणी करण्यात भूगर्भ तज्ज्ञ व्यापारी मानसिकता सध्या व्यस्त आहे. का? तर म्हणे त्या अरण्यातील भूगर्भात कोट्यवधी किंमतीचे हिरे दडलेले आहेत. आता याविषयी आमचा पर्यावरण संरक्षण विभाग काय कारवाई करणार?

पर्यावरण म्हणजे काही निवडक झाडांची लागवड केली की झाली पृथ्वी सुजलाम, सुफलाम, असे आहे का? आपण सारे जाणकार आहोत, उत्तर नकोय, मातीचे ऋण समजून घेऊन नमन करू या, जेथे आपण पिढ्यान् पिढ्या राहतो त्या पृथ्वीचे रक्षण करू या. पर्यावरण हा एक दिवसाचा उत्सव नव्हे ही मानवाची पूर्ण वेळ जबाबदारी आहे, हे कृतीतून समजून घेऊ या.

  • इक्बाल मुकादम
    दापोली
    (99206 94112)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply