विद्यार्थ्यांना घडविण्यात पालकांची भूमिकाही महत्त्वाची – शिर्के

लांजा : गुरुपौर्णिमा साजरी करताना आज शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांना घडविण्यात पालकांनाही महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल, असे प्रतिपादन लांजा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक गणपत शिर्के यांनी केले.

देवपूजा करावी, त्याच पद्धतीने सुभाष लाड यांनी त्यांचे गुरुवर्य फापे गुरुजींचे पाद्यपूजन करून त्यांना वंदन केले.

राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ(मुंबई) आणि माझी मायभूमी प्रतिष्ठान(मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने लांजा तालुक्यातील आडवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ च्या सभागृहात गुरुपौर्णिमा सोहळ्याचे आयोजन काल (दि. १३ जुलै) करण्यात आले होते. आडवली गावचे सुपुत्र आणि १९८० च्या दशकात आपल्या अध्यापनकौशल्याने रिंगणे परिसरातील विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम करणारे ७९ वर्षीय शिवराम फापे गुरुजी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने त्यांचे विद्यार्थी आणि कोकणातील सामाजिक कार्यकर्ते सुभाष लाड यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम झाला. आडवली गावातील प्राथमिक शाळेत हा आगळा वेगळा गुरुपौर्णिमा सोहळा झाला. त्याप्रसंगी श्री. शिर्के बोलत होते. मोबाइलच्या व्यसनापासून मुलांना दूर ठेवण्यासाठी वाचनाकडे, मातीतल्या खेळाकडे मुलांना वळवावे लागेल, असेही ते म्हणाले.

गुरुपौर्णिमा या भारतीय परंपरेतील महत्त्वाच्या दिवसाचे महत्त्व जाणून प्राथमिक आणि माध्यमिक शाळामंध्ये निबंध किंवा वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले जाते. मात्र ‘माझी देवपूजा पाय तुझे गुरुराया’ या अभंगाप्रमाणे गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूच्या पाद्यपुजनासह त्यांना नमन करून त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा कृतीपाठ शिवराम श्रीपत फापे गुरुजी कृतज्ञता सोहळ्याने विद्यार्थ्यांना अनुभवता आला, असे कौतुकोद्गार प्रमुख पाहुणे साप्ताहिक कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांनी यांनी यावेळी काढले.

यावेळी आयोजक सुभाष लाड यांनी सांगितले की, फापे गुरुजींच्या रूपात मला संस्कारांचा कुबेर भेटला. या कुबेराने त्याच्याकडील सर्व ज्ञानरूपी धन आम्हा विद्यार्थ्यांवर त्या काळात उधळले. त्यातील मला जे काही घेता आले, तेवढे मी घेतले. त्या ज्ञानरूपी संपत्तीमुळे आणि संस्कारांमुळेच मी श्रीमंत झालो आहे. श्रीमंती माझ्या अवतीभोवती असलेल्या चांगल्या लोकसंग्रहाची आहे. श्री. लाड यांनी बालपणीच्या शैक्षणिक आठवणींना उजाळा दिला. शाळेविषयी गोडी लावण्याचे काम करणाऱ्या फापे गुरुजींनीच अभिनय, वक्तृत्व यांविषयी मूलभूत मार्गदर्शन केले. पुढे दहावी झाल्यानंतर गावात महाविद्यालयीन शिक्षणाची व्यवस्था नसल्याने शिपोशी येथील न्यायमूर्ती वैजनाथ विष्णु आठल्ये कनिष्ठ महाविद्यालयात मला दाखल केल्यानेच पुढील जीवनात मी शिक्षक होऊन गुरुजींनी दाखविलेल्या वाटेवर चालू शकलो. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हा सोहळा आयोजित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाची सुरवात सुप्रसिद्ध संगीतकार सुनील जाधव यांच्या सुरेल भजनांनी करण्यात आली. त्यानंतर सुभाष लाड यांनी गुरुवर्य फापे गुरुजी यांचे पाद्यपूजन केले. यावेळी गुरुजींना सन्मानाचा फेटा बांधण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी उपस्थितांनी फापे गुरुजींना शुभेच्छा दिल्या.

यावेळी साप्ताहिक आंदोलनचे संपादक गजाभाऊ वाघदरे, सरपंच मनाली महेंद्र दरडे, मुख्याध्यापिका सौ. रावले, संजय डांगे, सौ. डांगे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर आग्रे, जनसेवक सुधाकर पेडणेकर, प्रभाकर सनगरे, प्रकाश हर्चेकर, गावकर शांताराम खाके, ग्रामपंचायत सदस्या मनाली मंगेश दरडे, विजया दरडे, नम्रता सुतार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते. फापे गुरुजींचे जावई श्री. सुवारे आणि मुलगी सौ. पूजा सुवारे (देवरूख) यांनी कार्यक्रमात मोलाचा सहभाग घेतला.

यावेळी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनीही गुरुपौर्णिमेविषयी उत्स्फूर्तपणे भाषणे केली. फापे गुरुजींच्या हस्ते शाळेतील सर्व मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय हटकर यांनी केले, तर आभार संजय डांगे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेंद्र साळवी, प्रकाश हर्चेकर यांनी मेहनत घेतली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply