जबलपूर-कोईमतूर सुपरफास्ट एक्स्प्रेस गणेशोत्सवातही धावणार

नवी मुंबई : पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वेमार्गावरून सुरू असलेली जबलपूर-कोईमतूर सुपरफास्ट एक्स्प्रेस गणेशोत्सवाच्या काळातही धावणार आहे. दर शुक्रवारी धावणाऱ्या या गाडीचा कोकणातील चाकरमान्यांना उपयोग होणार आहे.

जबलपूर-कोईमतूर-जबलपूर (क्र. 02198/02197) गाडी ५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत दर शुक्रवारी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी जबलपूरहून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी, रविवारी सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी कोईमतूरला पोहोचेल. कोकणातील पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि कुडाळ या स्थानकांवर ती थांबणार आहे.

या गाडीचे कोकणातील स्थानकांचे वेळापत्रक असे – पनवेल (दुपारी ३.२०), रोहा (४.४५), खेड (६.१०), चिपळूण (६.५२), रत्नागिरी (८.३५), कणकवली (१०.५०) आणि कुडाळ (रात्री ११.२०).

परतीच्या प्रवासात ही गाडी ८ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर या काळात दर सोमवारी सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी रवाना होईल. ही गाडी जबलपूरहून येताना शनिवारी, तर कोईमतूरहून येताना मंगळवारी कोकणातील रेल्वेस्थानकांवर असेल. परतीच्या प्रवासातील या गाडीचे वेळापत्रक असे – कुडाळ (सकाळी ७.२०), कणकवली (८.३५), रत्नागिरी (१०.५०), चिपळूण (दुपारी १.००), खेड (१.३०), रोहा (३.५०) आणि पनवेल (सायंकाळी ४.५०).

गाडीला २४ डबे असतील. त्यात एसी फर्स्ट क्लास १, टू टायर एसी २, थ्री टायर एसी ६, द्वितीय श्रेणी शयनयान ११, तर द्वितीय श्रेणी बैठकांचे २ डबे असतील.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply