लोकमान्यांच्या काही आठवणी…!

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज जयंती. त्या निमित्ताने, त्यांच्या समकालीन व्यक्तींनी सांगितलेल्या त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी येथे प्रकाशित करत आहोत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा अंदाज त्यावरून येऊ शकेल.
………..

गजानन विश्वनाथ केतकर (लोकमान्यांचे नातू, उपसंपादक, केसरी, मराठा)
लोकमान्यांच्या शेवटच्या आजारातील एक आठवण
रात्री व दुपारी बेशुद्धीत ते पुष्कळच बोलत असत. कधी संभाषणासारखे, तर कधी व्याख्यानाच्या आवाजात, व्याख्यान दिल्यासारखे बोलत. त्यांची सर्वच वाक्ये लक्षात राहणे अशक्य आहे. सर्वसाधारणरीत्या एवढे सांगता येईल, की या चार दिवसांत खासगी सांसारिक गोष्टीविषयी ते एक शब्दही बोलले नाहीत. त्यांच्या डोक्यात सर्व सार्वजनिक गोष्टीच घोळत होत्या. अंतकालच्या बेशुद्धीतसुद्धा आपल्या अंगीकृत कार्यांशिवाय इतर कोणतीहि गोष्ट मनात न येणे ही कर्मयोगातल्या समाधीची पराकाष्ठा होय. आम्हांस जी वाक्ये कळली ती यापुढे दिली आहेत.

ता. २८ जुलै रोजी रात्री –
‘१८१८ सालीं असें झाले-परवां हे १९१८ साल आलें-A hundread years history आम्ही हे असे हीन झालों.’

‘पंजाब Matter मध्यें तुम्ही काय करणार? पटेल यांस तार केली काय? आम्ही Special काँग्रेस भरवणार आहोंत.’

ता. २९ जुलै रात्रौ ९ वाजतां व्याख्यानाच्या भाषेंत –

‘माझी अशी खात्री आहे आणि आपणही विश्वास बाळगा, की हिंदुस्थानाला स्वराज्य मिळाल्याखेरीज तरणोपाय नाही.’

रात्रौ २ वाजतां व्याख्यानाच्या भाषेंत –

‘आपण व जनता यांनीं जे परिश्रम केले त्याबद्दल मी आपले आभार मानतो.’

ता. ३० पुढें त्यांचें बोलणें अस्पष्ट होऊ लागले व ते अगदी जवळच्या माणसास देखील समजेनासे झाले. ते शेवटपर्यंत शुद्धीवर आले नाहीत. मरणसमयी त्यांची मुद्रा अत्यंत शांत होती.
………
बॅ. विनायक दामोदर सावरकर
अंदमानाच्या कारागृहांत असतांना लोकमान्य वारल्याची बातमी आली. प्रथम उडत उडत रात्री कळली. सकाळीं निश्चित झाली. त्या वेळीं लोकमान्यांच्या मृत्यूविषयीं आत्मा तळमळूं लागला. ती तळमळ व्यक्त तरी कशी करणार? अंती आठ वाजण्याचे संधीस निश्चय ठरला कीं, त्या दिवशीं सर्व अंदमानभर सर्वांनी उपवास पाळावा. तत्काळ आमच्या संस्थेतील सहकारी मंडळींना मी तें कळविले. त्यांनीं पुढच्यांस, त्यांनीं त्या पुढच्यांस असें करतां करतां एखाद्या तारेच्या गतीनें ती वार्ता पसरली आणि जेवणाचे वेळेस बसतात तों कारागारापासून तों दूर रासबेटापर्यंत आणि इतर भागांतून शेंकडों लोकांनीं आपापलीं जेवणें घेण्याचें नाकारले! अधिकाऱ्यास घोटाळा पडला, हें काय? पण कोणी कारण सांगेना. कारण लोकमान्यांचे मृत्यूसाठीं दु:ख वाटण्याचा बंदिवानास अधिकार नव्हता. त्यासाठीं जेवण सोडलें म्हणून म्हटलें तर त्वरित राजद्रोह्यांशी संबंध ठेवल्याचा खटला आणि बेडी! हळूहळू आपण होऊन अधिकाऱ्यांस कळलें कीं, लोकमान्यांसाठी हे हजारों बंदिवान आज उपवास आचरीत आहेत. एक-दोन तासांत ही बातमी चोहोंकडे पसरून संघटित उपवास हजारों बंदिवानांनीं केला कसा, याचें अधिकाऱ्यांस सक्रोध आश्चर्य वाटलें, आणि तें आश्चर्य होतेंहि. नऊ वर्षांपूर्वी टिळकांचें नांव माहीत असणारा जेथें शेंकडा एकहि असता नसता आणि राष्ट्रीय दु:खासाठीं एक दिवस उपवास करून रिकाम्या पोटीं दिवसभर राबत ते कठोर परिश्रम करण्याइतका राष्ट्रीय वळणाचा मनुष्य तर हजारांत एकच मिळता, त्याच अंदमानांत आठनऊ वर्षांच्या प्रचाराने इतकी संघटना झाली आणि राजकीय चळवळ इतकी उत्पन्न झाली कीं, हजारों बंदिवान एकमतानें राष्ट्रीय दु:ख पाळूं शकत.
……………

दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर
टिळकांशी त्यांचा मित्र बोलता बोलता म्हणाला, ‘बळवंतराव, स्वराज्यांत तुम्ही कोणते काम पत्कराल? तुम्ही मुख्य दिवाण व्हाल, की परराष्ट्रमंत्री बनाल?’ टिळकांनी उत्तर दिलें, ‘नाही हो, स्वराज्य स्थापन झाल्यावर एखाद्या स्वदेशी कॉलेजांत गणित विषयाच्या प्रोफेसराचे काम पत्करीन व सार्वजनिक चळवळींतून अंग काढून घेईन. मला राजकारणाचा तिटकारा आहे. ‘डिफरेन्शिअल कॅल्क्युलस’वर एखादे पुस्तक लिहावें असें मला अजून वाटतें. देशाची स्थिति फार वाईट आहे आणि तुमच्यापैकी कोणी काही करीत नाही, म्हणून मला इकडे लक्ष घालावें लागत आहे.’
…………
रामचंद्र बळवंत टिळक (लोकमान्यांचे ज्येष्ठ चिरंजीव)
सिंहगडावरच त्यांनी एकदां आम्हांस असें सांगितलें की, ‘तुम्ही पाहिजे तो धंदा करा. तुम्ही जोडे तयार केले तरी मला वाईट वाटणार नाही की, माझी ब्राह्मणांची मुलें चांभार निघाली म्हणून. परंतु त्याचबरोबर हेंहि लक्षांत ठेवा की, जें कांही कराल तें इतकें उत्कृष्ट झालें पाहिजे कीं, त्या धंद्यासंबंधी कोणी विचार करूं लागला तर तुमचें नांव त्याचे मनांमध्यें पहिल्यांदा उभें राहिले पाहिजे. उदाहरणार्थ, जसें चहाची आठवण झाली की, ‘लिप्टन’ हे नाव डोळ्यापुढें उभें राहातें, बिस्किटांची आठवण झाली कीं, ‘हंटले-पामर’ हे नाव डोळ्यापुढें उभें राहाते, शारीरिक शक्तीची गोष्ट निघाली की पूर्वीचा ‘भीमसेन’ सोडून दिला तरी आधुनिक सॅन्डो अथवा ‘राममूर्ती’ हे डोळ्यापुढे उभे राहतात, तसें तुम्ही ज्या व्यवसायात पडाल त्याची गोष्ट निघाली असता तुमचे नांव लोकांच्या मन:चक्षूंसमोर प्रथम उभे राहिलें पाहिजे व अशा तऱ्हेची मनोवृत्ति ज्या देशामध्यें प्रत्येक धंद्यांत पडणाऱ्या मनुष्यामध्यें आहे त्या देशाची केव्हांहि भरभराट झाल्यावाचून राहणार नाही, हे निश्चित समजा.
………

लोकमान्य टिळक यांचे रत्नागिरी येथील जन्मस्थान

श्रीधर बळवंत टिळक (लोकमान्यांचे कनिष्ठ चिरंजीव)
सोमवार ता. ८ जून १९१४ रोजी लोकमान्यांनी मंडालेचा तुरुंग सोडला. त्यानंतर कित्येक आठवडे वाट पाहूनहि सरकारनें मंडालेच्या तुरुंगांत त्यांचेपासून काढून घेतलेल्या गीतारहस्याच्या हस्तलिखित वह्या लवकर परत मिळण्याचे चिन्ह दिसेना. जसजसे दिवस लोटूं लागले, तसतसे सरकारच्या हेतूविषयी लोक अधिकाधिक साशंक होऊ लागले. शेवटी काहीजणांनी स्पष्ट बोलून दाखविले की, ‘सरकारचें लक्षण कांहीं ठीक दिसत नाही. वह्या परत न करण्याचा विचार जवळ जवळ ठरल्यासारखा दिसतो.’’ हे तर्क-कुतर्क लोकमान्यांच्या कानांवर पडताच ते म्हणाले, ‘‘भिण्याचें कांहीएक कारण नाही. वह्या सरकारच्या कबजात असल्या तरी ग्रंथ माझे डोक्यांत आहे. फुरसदीचे वेळी महिना – दोन महिने सिंहगडावर बसून मी तो पुनः समग्र लिहून काढीन.’
…………
(माहिती स्रोत : श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्था, केशवजी नाईकांच्या चाळी, गिरगाव (मुंबईतील पहिला गणेशोत्सव) यांनी प्रसिद्ध केलेल्या ‘आठवणी लोकमान्यांच्या’ या पुस्तकातून या आठवणी घेतल्या आहेत. http://lokmanyatilak.org/)
……

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply