देवरूख : येथील देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालयासमोर उभारलेल्या शहीद स्मारकस्थळी कारगिल विजय दिन आज साजरा करण्यात आला. कारगिलच्या युद्धात सहभागी झालेल्या सैनिकांसह विद्यार्थी आणि नागरिकांनी कारगिल हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.
तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९९ मध्ये २६ जुलै हा दिवस ‘कारगिल विजय दिन’ म्हणून साजरा केला जाईल, असे घोषित केले. ऑपरेशन विजयद्वारे कारगिल युद्धामधील पाकिस्तानवर मात करण्याचा तो आनंददायी क्षण होता. सैन्य, अर्ध सैन्यदल आणि वायुसेना मिळून ३० हजार सैनिकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कारगिल युद्धात भाग घेतला. यावेळी भारतीय वायुसेनेकडून ऑपरेशन सफेद सागर सुरू झाले. भूदल सैन्याची ने-आण करण्याची मोठी भूमिका वायुसेनेने निभावली. भारतीय नौदलाने पाकिस्तानमधील बंदरांना आपले लक्ष्य करून येणाऱ्या जहाजांची कोंडी करण्यात केली. कारगिल युद्धात भूदल, वायुसेना आणि नौसेना यांनी समन्वयाने पाकिस्तानला नामोहरम केले. कारगिल युद्धात भारतीय सेनेतील अधिकारी आणि जवानांना ४ परमवीर चक्र, ४ महावीर चक्र, २९ वीरचक्र आणि ५२ सेना मेडल देऊन गौरविण्यात आले. कारगिल विजयासाठी देशाकरिता प्राणार्पण करणाऱ्या भारतीय सैन्य दलातील शूर अधिकारी व जवानांना कारगिल दिनी सर्व भारतीय आदरांजली वाहून कृतज्ञता व्यक्त करतात. या सर्व आठवणींना देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाने शहीद स्मारक स्थळी आयोजित केलेल्या कारगिल विजय दिनी उजाळा मिळाला. कारगिल युद्धात सहभागी झालेले निवृत्त सैनिक आणि इतर माजी सैनिकांसह संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी पुष्प करंडक अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी सैनिक अमर चाळके, पुंडलिक पवार, महेश सावंत, सुनील जाधव, सुभाष मोरे, तुकाराम खेडेकर, यशवंत खरात, सूर्यकांत पवार, नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, मदन मोडक, पत्रकार प्रमोद हर्डीकर, सुरेश करंडे, संस्था पदाधिकारी कुमार भोसले, शिरीष फाटक, बबन बांडागळे, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, उपमुख्याध्यापक मधुकर कोकणी, मुख्याध्यापिका सोनाली नारकर, दीक्षा खंडागळे आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय छात्र सेनेच्या न्यू इंग्लिश स्कूल (आर्मी), तसेच आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या(आर्मी व नेव्ही) युनिटने शहीद स्थळी मानवंदना दिली. याप्रसंगी राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख सुनील कांबळे, प्रा. उदय भाट्ये आणि केअर टेकर प्रा. सानिका भालेकर उपस्थित होत्या.
श्री. भागवत यांनी आपल्या मनोगतात कारगिल युद्ध, कारगिल युद्धातील भारतीय सैन्यदलाची रणनीती, कारगिल विजयाचे महत्त्व याबाबत सविस्तर विवेचन केले. संस्थेने उभारलेल्या शहीद स्मारकाचा उद्देश आणि महत्त्व त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना संरक्षण क्षेत्रात सेवा करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध सेवा सुविधा संस्थेच्या वतीने उपलब्ध केल्या जातील. त्याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. संस्थेच्या शहीद स्मारकासाठी केंद्र सरकारने मंजूर केलेले HPT–32 या लढाऊ विमानाबाबत सविस्तर माहितीही त्यांनी दिली.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय व प्रसिद्धी विभागाने कारगिल युद्ध व कारगिल विजय दिनाच्या औचित्याने महत्त्वपूर्ण माहिती व माहितीपट उपलब्ध करून दिले.
