रत्नागिरी : ‘एनटीए’मार्फत या वर्षी (२०२२) घेण्यात आलेल्या नीट (NEET) परीक्षेत रत्नागिरीतील दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कै. त्रि. प. केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील (द्वारा फाटक हायस्कूल) विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादित केले आहे. कौशिक सत्यवान रेडीजने ६७० गुणांसह १६१३ ऑल इंडिया रँक आणि ४४० कॅटेगरी रँक प्राप्त केली. त्यामुळे देशातील पहिल्या पाच शासकीय मेडिकल कॉलेजपैकी एका कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी त्याला मिळाली आहे. निरंजन हाके याने नीट परीक्षेत ६२५ गुणांसह ११,००४ ऑल इंडिया रँक आणि ४२७७ कॅटेगरी रँक प्राप्त केली. त्यालाही नामांकित शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार आहे.
‘व्हीआयटी, वेल्लोर’च्या प्रवेश परीक्षेत अंश निर्मल गांधीने २९४६वी रँक मिळवली. त्यामुळे व्हीआयटीमध्ये त्याला कम्प्युटर सायन्सला प्रवेश मिळाला असून, तो वेल्लोरला रवाना झाला आहे. आकांक्षा रविप्रकाश हिने जेईई परीक्षेत 98.50 पर्सेंटाइल मिळविले. त्यामुळे तिला ‘एनआयटी’सारख्या नामांकित शासकीय इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळणे सहज शक्य झाले आहे.
संस्थेच्या कार्याध्यक्षा ॲड. सौ. सुमिता भावे, उपकार्याध्यक्ष ॲड. सचिन शिंदे, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य किशोर लेले यांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. कोरोनासारख्या संकटाचा कठीण काळ असूनही, विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कठोर मेहनतीमुळे हे यश मिळाले. त्याबद्दल दी न्यू एज्युकेशन सोसायटी, फाटक हायस्कूल, केळकर ज्युनिअर कॉलेज आणि कोटा येथील कॅपसन इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक, मार्गदर्शक आणि पालकांचे कौतुक करण्यात आले. या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना कोटा येथील कॅपसन इन्स्टिट्यूटमधून मार्गदर्शन मिळाले होते. रत्नागिरी येथे या परीक्षांसाठीचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिल्याबद्दल यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी संस्थेचे, केळकर कनिष्ठ महाविद्यालयाचे आणि शाळेचे आभार मानले आहेत.
या कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक आनंद पाटणकर, पर्यवेक्षक कीर सर, गोगटे सर, आठल्ये मॅडम, म्हाब्दी मॅडम, निकम सर आणि इतर मार्गदर्शक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
