रत्नागिरीतून चांगले अधिकारी तयार व्हावेत- उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात चांगले अधिकारी तयार व्हावेत, यासाठीच मुंबई विद्यापीठाच्या उपपरिसरात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसरात स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन श्री. सामंत आणि मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उपपरिसराचे प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग आणि विशेषत: राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तयारी करण्यासाठी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना या केंद्राचा चांगला उपयोग होईल, असे यावेळी श्री. सामंत म्हणाले. स्पर्धा परीक्षांची चळवळ गावागावात पोहोचावी, यासाठी मुंबई विद्यापीठाचे हे केंद्र उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले.

मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी या केंद्रासाठी लागणारी सर्व मदत तातडीने देण्यात येईल असे अध्यक्षीय भाषणात सांगितले. शिवाजी विद्यापीठाचे सहकार्य स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी लाभेल, असेही ते म्हणाले.

प्रास्तावविकात डॉ. सुखठणकर यांनी केंद्र कशा पद्धतीने उभे राहिले, याची माहिती दिली. रत्नागिरी उपपरिसराचे प्रभारी कुलसचिव अभिनंदन बोरगावे यांनी या केंद्राची रचना कशी आहे आणि हे केंद्र पुढील काळात कशा पद्धतीने कार्य करेल, याची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री पावसकर हिने केले तर साक्षी चाळके हिने आभार मानले. कार्यक्रमाला रत्नागिरी परिसराचे प्राध्यापकवर्ग, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply