लांजा : आजच्या काळात महिला सक्षम झाल्या आणि त्या स्वतःचे संरक्षण करू शकल्या, तरच झाशीची राणी लक्ष्मीबाईंची जयंती साजरी करायला काही अर्थ आहे, असे मत विश्व हिंदू परिषदेच्या प्रियंवदा जेधे यांनी व्यक्त केले.
कोट (ता. लांजा) या राणी लक्ष्मीबाईंच्या मूळ गावी जयंतीच्या निमित्ताने १९ नोव्हेंबर रोजी झाशीची राणी लक्ष्मीबाई स्मारक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी महिलांकरिता सुरक्षाविषयक मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, केवळ आर्थिक आत्मनिर्भरता नव्हे, तर शारीरिकदृष्ट्याही महिलांनी सक्षम झाले पाहिजे. त्यांना स्वतःचे संरक्षण करता आले पाहिजे. आधुनिकता आणि नवनव्या भौतिक सोयीसुविधा निर्माण झाल्या तरी महिला अजूनही सुरक्षित नाही. महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही बुरसटलेलाच आहे. त्यामुळेच महिलांवर अत्याचार घडतात. त्याच्या अनेक बातम्या दररोज ऐकू येतात. अशा वेळी महिलांनी स्वतःच पुढाकार घेऊन, स्वसंरक्षणाचे कौशल्य शिकून सक्षम झाले पाहिजे.
यावेळी आयोजित केलेल्या महिलांच्या मेळाव्याला सुमारे १७५ महिला उपस्थित होत्या. त्यांच्यासह पुरुषांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली. सर्वांनी मिरवणुकीने जाऊन राणीच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी झाशीची राणी लक्ष्मीबाई स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू नेवाळकर, उपाध्यक्ष यशवंत वाकडे, सचिव मिलिंद पाध्ये, स्मारकसाठी जमीन मोफत देणारे बाळूकाका नेवाळकर, सरपंच संजय पाष्टे, दत्ताराम गोरुले, प्रभाकर पांचाळ, दिलीप मेस्त्री, बावा आग्रे, कोलधे येथील राणीच्या माहेरच्या तांबे कुटुंबातील सदस्य अनिल तांबे, गावातील सर्व गावकार, मानकरी आणि महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या.




कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

