रत्नागिरी : ‘झोंपाळ्यावरची गीता’ या मराठी ओवीरूप पुस्तकाच्या राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केलेल्या इंग्रजी अनुवादाचे गीता जयंतीच्या औचित्याने तीन डिसेंबर २०२२ रोजी रत्नागिरीत प्रकाशन झाले. चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे कार्याध्यक्ष, व्याख्याते-प्रवचनकार धनंजय चितळे या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘अणुबॉम्बचा पहिला प्रायोगिक स्फोट होताच निर्माण झालेला प्रचंड प्रकाश पाहून प्रमुख संशोधक ओपनहायमर यांनी ‘सहस्र सूर्यांचे तेज’ या अर्थाचा भगवद्गीतेमधील श्लोक म्हणून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. परदेशी विद्वान अर्थासह गीता पाठ करत असताना आपल्याकडे मात्र जे आमचे आहे ते अभिमानाने मिळवावे असे आपल्याला वाटत नाही, हे दुर्दैव आहे,’ असे प्रतिपादन चितळे यांनी केले. ‘नित्यनूतन गीता’ या विषयावर त्यांचे या वेळी व्याख्यान झाले.
‘मराठी माणसांच्या नव्या पिढ्या वाढत्या प्रमाणात इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेऊ लागल्या आहेत, त्यांच्यासाठी हे पुस्तक उपयोगी पडेल,’ असा विश्वास मसुरकर यांनी या प्रसंगी केलेल्या भाषणात व्यक्त केला. ‘पाश्चात्य विद्वानांनी भगवद्गीतेचा सखोल अभ्यास केला. आपण मात्र आपल्याच देशात जन्मलेल्या या उत्तुंग तत्त्वज्ञानाकडे पाठ फिरवू लागलो आहोत,’ असे म्हणून त्यांनी मानवी जीवनात आजही गीता मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन केले. (या कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडिओ शेवटी दिला आहे.)
१९१७ साली दत्तात्रय अनंत आपटे ऊर्फ अनंततनय यांनी ‘झोंपाळ्यावरची गीता’ हे ओवीबद्ध मराठी पुस्तक लिहिले. ‘The Geeta in Leisure’ या नावाने रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी त्या गीतेचा समश्लोकी इंग्रजी अनुवाद केला. रत्नागिरीतील सत्त्वश्री प्रकाशनाने (कोकण मीडिया) हे अनुवादित पुस्तक प्रकाशित केले आहे. पुस्तकाचे मूल्य २०० रुपये असून, हे पुस्तक गुगल प्ले बुक्सवर ‘ई-बुक’ स्वरूपातही उपलब्ध आहे. (ई-बुक लिंक, तसेच पुस्तक घरपोच मागवण्यासाठी संपर्क क्रमांक शेवटी दिला आहे.)
साप्ताहिक कोकण मीडियाने दिवाळी अंकासाठी अशोक प्रभू स्मृती लेख आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. त्या स्पर्धांतील विजेत्यांना या वेळी पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. कुडाळच्या प्रभूज नेचर क्युअर सेंटरचे डॉ. प्रणव अशोक प्रभू यांच्या, तसेच धनंजय चितळे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. डॉ. प्रणव प्रभू यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. तसेच, चित्रकला स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेती श्वेता केळकर आणि लेख स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेते श्रीनिवास सरपोतदार यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक भाषणात साप्ताहिक कोकण मीडियाचे संपादक प्रमोद प्रमोद कोनकर यांनी या स्पर्धा, तसेच पुस्तक प्रकाशनामागची भूमिका स्पष्ट केली. या पुस्तकाचे संपादक अनिकेत कोनकर यांनी झोंपाळ्यावरची गीता या दुर्मीळ पुस्तकाच्या शोधापासून आता त्याच्या इंग्रजी अनुवादापर्यंतचा प्रवास थोडक्यात विशद केला. महाराष्ट्र शासनाच्या ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्काराने नुकतेच गौरविले गेलेले मंडणगडचे सुपुत्र मोहन महाडिक या कार्यक्रमाला श्रोते म्हणून आवर्जून उपस्थित राहिले. हा योग साधून त्यांचा या समारंभात शाल व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.

पुस्तक घरपोच मागवण्यासाठी संपर्क :
मोबाइल : 9423292162
फक्त व्हॉट्सअॅप : 9850880119 (व्हॉट्सअॅप नंबरवर आपलं नाव, संपूर्ण पत्ता आणि प्रतींची संख्या कळवावी.)
ई-बुक खरेदीसाठी लिंक :
गुगल प्ले बुक्स – https://play.google.com/store/books/details?id=LzaVEAAAQBAJ