बाळासाहेब ठाकरे स्मृति राज्यस्तरीय व्यंग्यचित्र स्पर्धा

मुंबई : ज्येष्ठ व्यंगचित्रकार स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ फिल्मंदार संस्थेने राज्यस्तरीय खुली व्यंग्यचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

गतकालीन, समकालीन व्यक्ती-घटना-प्रसंगात दडलेल्या विसंगत स्वरूपाच्या अर्थाचा म्हणजे सूचितार्थाचा हास्यजनक मार्मिक आविष्कार करणारे चित्र म्हणजे व्यंग्यचित्र होय. संपादकीय वा राजकीय टीकाचित्रे दैनिके, साप्ताहिके यांमधून प्रसिद्ध होतात. ती व्यंग्यचित्रे म्हणजे व्यंग्यचित्रकाराची तत्कालीन घडामोडींवरची टीकाटिपणी असते. प्रत्यक्ष घडलेल्या घटनांचा या चित्रांमध्ये संदर्भ असल्यामुळे प्रत्यक्षातील व्यक्तींशी चित्रांमध्ये दाखवलेल्या व्यक्तींचे ओळखू येण्याएवढे साम्य असते. चालू घटनांबद्दलच्या वाचकांच्या प्रतिक्रियांना चालना देण्याचे काम ही व्यंग्यचित्रे करतात. अनेक वेळा या चित्रांमध्ये प्राणी, प्रतीके, इतिहासपुराणांतील दाखले, दृष्टान्त, लोकप्रिय आख्यायिका यांचा उपयोग केला जातो.
हास्यचित्रे प्रामुख्याने मासिके, वार्षिके इत्यादी नियतकालिकांतून प्रसिद्ध होतात. सभोवतालच्या जीवनातील विसंगतीवर बोट ठेवून विनोद निर्माण करण्याचा या प्रकारच्या चित्रांचा हेतू असतो. त्यामुळे त्यांना सामान्यपणे हास्यचित्रे (गॅग) म्हणता येईल. या चित्रांमधील टीकेचा रोख प्रत्यक्षातील कुणा व्यक्तीवर नसतो; तर तो वृत्तीवर असतो. त्यामुळे यामधील व्यक्तींचे प्रत्यक्षातील व्यक्तींशी ओळखू येण्याइतके साम्य नसते. ज्या चित्रांमधील आशय हसवताहसवता अंतर्मुख बनवणारा आणि म्हणून अंतिमतः गंभीरच असतो, अशी व्यंग्यचित्रे या प्रकारात मोडतात. मात्र त्यांना खऱ्या अर्थाने हास्यचित्रे म्हणता येणार नाही. चित्राच्या आस्वादकाला अधिक संवेदनाशील बनवण्यासठी आणि त्याच्यामध्ये खिलाडू वृत्ती बाणवण्यासाठी ही चित्रे हातभार लावतात.

व्यंग्यरेखने नियतकालिकांतील लेखांसाठी किंवा पुस्तकातील मजकुरासाठी किंवा जाहिरातीसाठी काढलेली असतात. पाहताक्षणीच आपला आशय वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृश्य माध्यमाच्या या अद्भुत गुणधर्मामुळे व्यंग्यरेखने सोबतच्या मजकुराला पूरक आणि उपयुक्त ठरतात. प्रतिभावंत व्यंगचित्रकार अनेकदा शब्दमाध्यमाच्या मर्यादेमुळे व्यक्त न करता आलेल्या आशयाचा पैलू चित्रातून मांडून रसिकाचा अनुभव अधिक संपन्न बनवू शकतो. विनोदी साहित्य अधिक प्रत्ययकारी होण्यासाठी व्यंग्यरेखने जशी मदत करतात, तशीच ती व्यवस्थापनशास्त्र, समाजशास्त्र, गणित, खगोलशास्त्र यांसारखे गंभीर आणि रुक्ष विषय सुलभतेने समजावून देण्यासाठीही उपयुक्त ठरतात.

वरील तिन्ही प्रकारांत कालप्रवाहातील एखादा क्षण पकडून तो एका व्यंग्यचित्रात विनोदी चित्रपट्टी, व्यंग्यचित्रमालिकेद्वारे चित्रबद्ध केलेला असतो. विनोदी चित्रपट्टीमध्ये एकाहून अधिक व्यंग्यचित्रे कालानुक्रमाने एकामागून एक मांडून घटनेचा कालखंड त्यामधून सादर केला जातो. प्रथमपासूनच त्यांच्या विषयांमध्ये विनोदाच्या बरोबरीनेच साहसकथा, हेरकथा, ऐतिहासिक वा पौराणिक कथा, विज्ञानकथा इत्यादी विविध प्रकारांचा समावेश आहे. व्यंग्यचित्रमालिकेमध्ये एकाच विषयाभोवतीचे विविध पैलू अनेक चित्रांतून सादर केलेले असतात. सर्वांची मिळून एक व्यंग्यचित्रमालिका बनलेली असली, तरी प्रत्येक व्यंग्यचित्र त्याच्यापुरते स्वतंत्र असते व त्याचा स्वतंत्रपणे आस्वाद घेता येतो.

अशा सर्व प्रकारांची एकत्रित स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा १५ वर्षांखालील शालेय गट आणि १६ वर्षांपुढील खुला गट अशा दोन गटांत घेण्यात येईल. चित्र पाठविण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२३ ही असून २१ व २२ जानेवारीला स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहूनदेखील चित्रे काढता येईल. स्पर्धेचे बक्षीस वितरण २२ जानेवारी रोजी होईल. दोन्ही गटांमधील पहिल्या तीन विजेत्यांना मानचिन्ह, रोख रक्कम आणि प्रमाणपत्र, तर उत्तेजनार्थ पारितोषिकेही दिली जाणार आहेत. बक्षीस समारंभ मुंबईत विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात होणार आहे.

स्पर्धेचे व्यंगचित्र ए 3 किंवा ए 4 आकाराच्या ड्रॉइंग शीटवर असावे. कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा, व्यक्तीचा अपमान होईल, असे चित्र बाद करण्यात येईल. स्पर्धा ऑनलाइन नसून चित्र स्पर्धकाला काढून ते पाठवावे लागेल. प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र मिळेल. स्पर्धेसाठी विषयाचे कोणतेही बंधन नाही. स्पर्धेकरिता शालेय गटाकरिता ५० रुपये आणि खुल्या गटाकरिता १०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येईल. प्रवेश फी ऑनलाइन स्वीकारली जाईल. त्याची माहिती प्रवेश अर्जावर देण्यात येईल.

चित्राच्यामागे स्पर्धकाचे नाव, वय, संपर्क क्रमांक, मेल आणि पत्ता इत्यादी माहिती असावी. चित्र फ्रेम करून देऊ नये. चित्र नामांकित कुरियर संस्थेमार्फत अथवा पोस्टाने पाठवावे. फाटलेले किंवा खराब झालेले चित्र स्वीकारण्यात येणार नाही. एकदा भरलेली फी परत केली जाणार नाही.

अधिक माहिती आणि विहित नमुन्यातील प्रवेश अर्जासाठी फिल्मंदार, २३, पहिला मजला, त्रिमूर्ती कृपा, मालवीय रोड, पोस्ट ऑफिसजवळ, विलेपार्ले (पूर्व), मुंबई ४०००५७ (संपर्क क्रमांक – ७२०८६९३९३३ किंवा ९०२८२३७५३८३) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply