देवगडच्या सौ. ममता धुपकर यांना महिला उद्योगरती पुरस्कार प्रदान

देवगड : जामसंडे (देवगड) येथील श्रीकृष्ण भोजनालायच्या संचालिका सौ. ममता प्रसाद धुपकर यांना महिला उद्योगरती पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे प्रदान करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्हा कऱ्हाडे ब्राह्मण संघाचा अडतिसावा वर्धापनदिन आचरा (ता. मालवण) येथील मांगल्य मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. संघातर्फे दरवर्षी महिला उद्योगरती पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा बहुमान सौ. ममता धुपकर यांना मिळाला. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. सावंतवाडी येथील उद्योजक विहंग देवस्थळी यांनी संघाला दिलेल्या ठेवीतून हा पुरस्कार देण्यात येतो.

कार्यक्रमाची सुरुवात वैदिक मंत्रपठण आणि दीप प्रज्वलनाने झाली. सचिव विनायक उमर्ये यांनी प्रास्ताविक केले. ज्ञातीतील पदवी, पदव्युत्तर आणि विशेष कौतुकास्पद यश प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष प्रदीप जोशी, उपाध्यक्ष सतीश शेजवलकर, सचिव विनायक उमर्ये, कोषाध्यक्ष सुधाकर देवस्थळी, अतिथी नीलेश सरजोशी तसेच संघाचे सल्लागार सदस्य सुधाकर जोशी उपस्थित होते.

पुरस्कार वितरण समारंभानंतर कवींच्या निवडक कविता वाचनाचा कार्यक्रम झाला. त्यात ६ कवींनी आपल्या कविता सादर केल्या. हौशी कलावंतांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमात एकपात्री अभिनय, नाट्यप्रवेश, लाठी काठी प्रात्यक्षिक तसेच गाणी सादर करण्यात आली. उपस्थितांनी सर्व कलाकारांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे निवेदन सौ. धनश्री देऊसकर यांनी केले.

प्रदीप जोशी यांनी अध्यक्षीय भाषण, तर कोषाध्यक्ष सुधाकर देवस्थळी यांनी आभार प्रदर्शन केले. श्रवण योगी याने तोंडाने शीळ वाजवून वंदे मातरम सादर केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे सहसचिव राहुल जोशी यांनी केले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply