ग्रामीण साहित्य संमेलनामुळे कोकणाचा जगात प्रचार : रवींद्र प्रभुदेसाई

तळवडे (ता. राजापूर) : ग्रामीण मराठी साहित्य संमेलनामुळे ग्रामीण भागातील नवोदित साहित्यिकांच्या प्रतिभेला अंकूर फुटेल. त्यातून स्वर्गीय कोकणभूमीचा जगभरात प्रचार व्हायला मदत होईल, असा आशावाद पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी व्यक्त केला.

राजापूर लांजा तालुका नागरिक संघ आणि तळवडे (ता. राजापूर) येथील ग्रामवाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला गुरुवर्य स्व. महादेव कुंडेकर साहित्यनगरीतील मुख्य सभागृहात श्री. प्रभुदेसाई यांच्या हस्ते पहिल्या सत्रात आयोजित केलेल्या पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धांचे उद्धाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. राजापूर लांजा नागरिक संघाच्या कार्याने आणि कोकणातील खेड्यांमध्ये राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांनी आपण भारावून गेलो असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, तळवडे गावच्या सरपंच सौ. गायत्री साळवी, उपसरपंच यशवंत साळवी, सुहास प्रभुदेसाई, सामाजिक कार्यकर्ते आप्पा साळवी, प्राथमिक शाळा केंद्रप्रमुख सीताराम कोरगावकर, पाचलच्या सरस्वती विद्या मंदिरचे उपमुख्याध्यापक सिद्धार्थ जाधव, स्पर्धेचे परीक्षक वि. धा. कोंडगेकर, लांज्यातील कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट चे संस्थापक मंगेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. लाड यांनी संघाची भूमिका विशद केली. कोकणातील नवप्रतिभेला व्यासपीठ मिळावे म्हणून सुरू केलेल्या या संमेलनाला ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आस्था असलेल्या सहित्य रसिकांनी ११ आणि १२ फेब्रुवारीला संमेलनाला उपस्थित राहून साहित्यानंदाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

आज सायंकाळच्या दुसऱ्या सत्रात राजापूर तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या आणि तळवडे गावाला सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या अर्जुना नदीचे पूजन करण्यात येणार असून यावेळी हजारो दिवे प्रज्वलित करून अर्जुनेच्या नदीपात्रात सोडले जाणार आहेत. भारतीय संस्कृतीत नदीला मातेचे स्थान दिले असल्याने अर्जुना नदी स्वच्छ आणि सुंदर बनविण्याचा संकल्प सोडला जाणार आहे. रात्रीच्या तिसऱ्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम होऊन पहिल्या दिवसातील कार्यक्रमाची सांगता होईल.

चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्वर्यु प्रकाश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply