“खल्वायन”च्या गुढीपाडवा विशेष मैफलीत “अभंग नाट्यरंग”

रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेची गुढीपाडवा विशेष संगीत मैफल येत्या बुधवारी (दि. २२ मार्च) “अभंग नाट्यरंग” कार्यक्रमाने रंगणार आहे.

या मैफलीत देवगडची उदयोन्मुख युवा गायिका कु. सावनी प्रसाद शेवडे आणि चिपळूणचा युवा गायक वरद केळकर यांचा “अभंग नाट्यरंग” कार्यक्रम होणार आहे. कु. सावनीचे गायनाचे सुरुवातीचे शिक्षण तिचे वडील आणि गुरू प्रसाद शेवडे यांच्याकडे झाले. त्यानंतर सौ. राधा जोशी आणि स्वप्नील गोरे यांच्याकडून तिला गायनाचे मार्गदर्शन मिळाले. सध्या पुण्यातील विदुषी शाल्मली जोशी यांच्याकडून ती शास्त्रीय गायनाचे पुढील शिक्षण घेत आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची विशारद प्रथम ही परीक्षा ती उत्तीर्ण आहे. जिल्हास्तरीय सुगम संगीत आणि नाट्य गीत स्पर्धा, राज्यस्तरीय नाट्यगीत स्पर्धांमध्ये तिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. गेल्या वर्षी गानवर्धन व स्वरमयी गुरुकुल आयोजित स्वरप्रभा या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल तिला पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते विशेष उल्लेखनीय पारितोषिक देऊन गौरवण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेत तिने संगीत सौभद्र या नाटकातून आपले अभिनय व गायन कौशल्य दाखवले होते.

वरद केळकर हा चिपळूणचा गायक कलाकार असून तेथील प्रसिद्ध गायक आणि मार्गदर्शक राजाभाऊ शेंबेकर यांच्याकडून तो १५ वर्षे गायनाचे प्रशिक्षण घेत आहे. रत्नागिरी आकाशवाणीचे गायक प्रसाद गुळवणी यांच्याकडूनही गेली ५ वर्षे तो जयपूर घराणे गायकीचे शिक्षण घेत आहे. आकाशवाणीची गायनासाठी बी ग्रेड त्याला प्राप्त आहे.

या दोघांच्या मैफलीला चिपळूणचे युवा वादक प्रथमेश देवधर (तबला), तर अमित ओक (ऑर्गन) संगीतसाथ करणार आहेत. प्रथमेश यांचे तबल्यातील सुरवातीचे शिक्षण महेशकुमार देशपांडे यांच्याकडे झाले असून पुढील शिक्षण पुण्यात पं. विवेक जोशी, पं. संजय करंदीकर यांच्याकडे चालू आहे. आकाशवाणीची बी ग्रेड त्याला प्राप्त आहे. पुण्यातील भरत नाट्य मंदिरच्या काही संगीत नाटकांना त्याने साथसंगत केली आहे. अमित ओक व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटट असून, हार्मोनियम वादनात त्यांनी संगीत विशारद ही पदवी प्राप्त केली आहे. अनेक नामवंत गायकांना त्यांनी विविध संगीत महोत्सवातून हार्मोनियमची साथसंगत केलेली आहे. या कार्यक्रमाचे निवेदन प्रदीप तेंडुलकर करणार आहेत.

बुधवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत रत्नागिरीत पऱ्याच्या आळीतील गुरुकृपा मंगल कार्यालयात होणार असलेली ही मैफ फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडने प्रायोजकत्व दिले आङे. मैफल सर्व संगीत रसिकांकरिता विनाशुल्क आहे. रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन खल्वायनचे अध्यक्ष मनोहर जोशी यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply