स्मरण द्रष्ट्या राष्ट्रपुरुषाचे

आज भारताचे नाव जगात आदराने घेत जात असेल, तर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान नक्कीच राष्ट्रनिर्माणाचे होते, हे मान्य करावेच लागेल. १४ एप्रिल या त्यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांचे स्मरण करणारा हा लेख…
………..

जगाच्या इतिहासात ज्या ज्या महामानवांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विविधांगी कार्य केले, त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर अग्रस्थानी होते. ज्या व्यवस्थेने आयुष्यभर गावकुसाबाहेर जगायला भाग पडले, त्याच व्यवस्थेच्या भल्यासाठी आपले आयुष्य वेचणारे जगातील एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर. कसे वागावे, कसे बोलावे, कसे जगावे यासह पिण्याचे पाणीदेखील आम्ही सांगितलेच प्यावे, हा अट्टहास तत्कालीन समाजव्यवस्थेचा होता. तरीही बाबासाहेब कधीही मागे हटले नाहीत आणि खचले नाहीत. रामजी आणि माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी जन्मलेल्या बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात भारतात समता, बंधुता, प्रस्थापित करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. विशेष म्हणजे त्यात ते यशस्वीदेखील झाले. हे मक्त त्यांच्यातील चिकाटी, धैर्य, प्रचंड आत्मविश्वास यांच्यामुळे शक्य झाले.

मुळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान आणि माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता, कायदे, कला अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने आणि कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रिमकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलितगात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलिंग चेतवून त्यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्कांबाबत जागृत केले.

त्यांच्या जन्मापासून ते ६ डिसेंबर १९५६ रोजी झालेल्या महानिर्वाणापर्यंतचा सर्व कालावधी भारतीय इतिहासात व्यवस्थेच्या विरोधातील संघर्षांचा आणि भारतीय समाजमनात क्रांतीच्या दृष्टिकोनातून खूपच चैतन्याचा काळ म्हणायला हरकत नाही. विद्यार्थिदशेपासून ते अगदी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत बाबासाहेबांनी कधीही भारताशी आणि भारतीय लोकांशी प्रतारणा केली नाही. उलट त्यांना जेव्हा जेव्हा संधी मिळत गेली, तेव्हा तेव्हा त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर राष्ट्रनिर्माणाचे कार्य केले. हे कार्य करताना त्यांनी कधीही ठरावीक वर्ग पाहिला नाही वा ठरावीक समाज. त्यांच्या त्या कार्यात अखंड राष्ट्राचे हित सामावले होते. म्हणूनच ते एक द्रष्टे राष्ट्रपुरुष होते.

भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी भारतातील अतिश्रीमंत वा अत्यंत गरीब व्यक्तीला स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय मिळवून देण्याचे कसब दाखवून दिले. त्यामध्ये मतदानाचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, अन्यायाविरोधात लढण्याचा अधिकार, स्वतःचे हक्क, कर्तव्याची जाणीव हे सर्व सर्वांना समान पातळीवर प्राप्त करून दिले. आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर जगातील उत्कृष्ट घटना तयार केली. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आतापर्यंत भारतीय राज्यघटनेत जवळपास शंभर च्यावर दुरुस्त्या झाल्या, तरीही भारतीय राज्यघटनेचे महत्त्व कमी झाली नाही वा कुणाच्या हक्कावर गदा आली नाही किंवा त्या घटनेचा आधार वा गैरफायदा घेऊन कुणीही वरचढ ठरले नाही. सर्वांनाच समान अधिकार या घटनेने दिला आहे.
स्त्रिया हा कुटुंबसंस्थेचा खरा आधारस्तंभ असतो, याची जाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना होती. म्हणून त्यांनी महिलांना हक्काचे आणि त्यांच्या स्वातंत्र्याला उजाळा देणारे हिंदू कोड बिल आणले. ते मक्त ठरावीक वर्गातील स्त्रियांसाठी नव्हते, तर ते समस्त भारतीय महिलावर्गासाठी होते. ते विधेयक मंजूर झाले नाही हे भारतातील स्त्रियांचे दुर्दैव. पण त्यासाठी बाबासाहेबांनी केलेले प्रयत्न खूप मोठे आणि प्रामाणिक होते. ज्यामुळे भारतातील स्त्रियांना जगण्याचा मार्ग सुकर होऊन त्यांना एक नवी दिशा मिळाली असती.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचे मूळ शेतीत आहे. त्यामुळे शेती अर्थातच शेतकरी हे आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले. त्यानुसार त्यांनी नियोजनदेखील केले. त्यांचे नियोजन अतिशय उत्तम आणि चपखल होते. म्हणूनच त्यांनी १९१८ मध्ये Small holding in india and their remedies या प्रबंधातून भविष्यात शेतीसमोर कोणकोणती आव्हाने असू शकतील आणि त्यावर काय काय उपाययोजना कराव्या लागतील, याबद्दल स्पष्ट मार्गदर्शन केले आहे. त्यांनी सांगितले की, शेतीची जोडधंद्याशी सांगड घातली पाहिजे. त्यांना सतत वीजपुरवठा, पाण्याचे नियोजन केले पाहिजे. खोतीपद्धती बंद करून शेती सगळ्यांसाठी उपलब्ध केली पाहिजे. शेतीमालाला हमीभाव दिला पाहिजे, तरच शेतकरी जगू शकतो. हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवले. पाण्याचे, विजेचे, जोडधंद्याचे नियोजन झाले नाही तर मोठ्या प्रमाणात शेतकर्यांचे हाल होतील. शेतीचे तुकडे करू नयेत, अन्यथा भारतात भविष्यात शेतकरी हतबल होऊन आत्महत्या करतील, असा इशारा त्यांनी बरोबर शंभर वर्षांपूर्वी दिला होता. पण राजकीय आकसापोटी त्यांच्या सूचना अमलात आणल्या गेल्या नाहीत. त्याचे परिणाम आजही भारतीय शेतकरी भोगत आहे. त्यांची पंचसूत्री तत्कालीन व्यवस्थेने वापरली असती तर आज सात-बारा कोरा करणार, कर्जमाफी करणार इत्यादी घोषणांची आवश्यकता भासली नसती. पण तसे झाले नाही, हे मात्र वास्तव.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्रष्टेपणाचे अजून एक महत्त्वाचे उदाहरण सांगता येईल. ते म्हणजे भारताच्या अंतर्गत आणि बाहेरील सुरक्षा व्यवस्थेविषयी केलेली उपाययोजना. भारताला तिन्ही बाजूंनी आपला शत्रूराष्ट्रांचा वेढा आहे. त्यामुळे ऐनवेळी मदत म्हणून दोन राजधान्यांची शिफारस केली होती. एक म्हणजे नवी दिल्ली आणि दुसरी म्हणजे हैदराबाद. जेणेकरून दक्षिण आणि उत्तर भारत हा संबंध सुरळीत राहील. कारण कारभार कमी-अधिक प्रमाणात दोन्ही ठिकाणाहून झाल्यामुळे एकसंधता राहायला मदत मिळेल.

भारतात विविध धर्म, असंमय जाती, अनेक पंथ असूनही भारत आजही एकसंध आहे. त्याचे कारण भारतीय संविधान. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात अशा विघातक संघटनांनी डोके वर काढू नये, यासाठी राष्ट्रपती राजवटीचे अत्यंत महत्त्वाचे अणि सुरक्षिततेचे कलम राखून ठेवले आहे. तसेच भारतीय लष्करी सामर्थ्य वाढवायचे असेल तर त्यासाठी भारताने तिन्ही आघाड्यांवर सक्षम बनले पाहिजे, असेही त्यांचे मत होते.

आजही भारतातील एक वर्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ठरावीक वर्गाचा शिक्का मारतो, जो अत्यंत चुकीचा आहे. सोबतच त्यांच्या या आणि अशा असंख्य राष्ट्रप्रेमी कामावर अन्याय करण्यासारखे आहे. कारण त्यांच्या कामात एवढी पारदर्शकता आणि प्रवाहीपणा होता की, त्या कामाचे खऱ्या अर्थाने लोकांच्या दृष्टीने उपयुक्तता सिद्ध होत असे. जेव्हा १९४२ मध्ये ते पाटबंधारे आणि ऊर्जा विभागासह मजूर मंत्री झाले, तेव्हाची त्यांच्या मजूरमंत्रिपदाची काही वर्षे भारताच्या विकासाच्या पायभरणीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहेत. याच काळात बाबासाहेबांनी ज्या ज्या नद्यांना पूर येतो, त्या त्या नद्यांवर धरणे बांधण्याची संकल्पना मांडली. ते फक्त पाणी अडविण्यापेक्षा त्याचा उपयोग शेतीसाठी, ऊर्जानिर्मितीसाठी आणि वाहतुकीसाठी करण्यात यावा, जेणेकरून त्या पाण्याचा अपव्यय होणार नाही, असा विचार मांडला. त्यातूनच भारतातील अनेक प्रकल्पांची उभारणी करण्यात आली. त्यामध्ये दामोदर खोरे योजना, महानदी खोरे योजना, हिराकूड प्रकल्प, सोननदी खोरे प्रकल्प अशा एकूण आठ धरणांचे बांधकाम त्यांनी अवघ्या चार वर्षांत पूर्ण केले. तुंगभद्रा, भाकमारा-नानगल धरण त्यांच्याच प्रयत्नातून आणि दूरदृष्टीतून बांधण्यात आले. लोकांना शिस्त लागावी, वापर योग्य व्हावा यासाठी त्यांनीच देशात प्रथम केंद्रीय ऊर्जा आयोगाची स्थापना केली. नद्यांवरील धरणे बांधण्यासाठी आणि सिंचनासाठी नद्यांच्या खोऱ्यांतील पाण्याचा वापर कसा करता येईल, यासाठी एक आयोग नेमून भारताच्या उज्ज्वल भविष्याची मुहूर्तमेढ बाबासाहेबांनी रोवली. भारताच्या काही भागात महापुराने आणि काही भागात दुष्काळाने हाहाकार उडतो. त्याच्यावरही या दूरदृष्टीच्या महामानवाने एक पर्याय सुचवला, तो म्हणजे नद्याजोड प्रकल्प. ज्याठिकाणी पावसाच्या महापुराने लोकांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे, तेथे महापूर येणार नाहीत आणि ज्या ठिकाणी दुष्काळ पडणार आहे, तेथे दुष्काळाच्या झळा पोहोचणार नाहीत, अशी ती कल्पना होती. मात्र त्यावेळी हा प्रकल्प होऊ शकला नाही, का ते इतिहासलाच माहीत! मात्र आता यावर खूप मोठ्या प्रमाणावर काम सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ती काळाची गरज आहे. तसा प्रकल्प झाला, तर पुन्हा एकदा सगळे जग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.

डॉ. आंबेडकर मजूरमंत्री होते, तेव्हा त्यांनी अनेक योजना कामगारांच्या हितासाठी सुरू केल्या. ज्या आजही उपयोगाच्या आहेत. त्यांनी यादरम्यान केलेल्या अनेक कायद्यांमुळे कामगारांची मानहानी थांबून त्यांच्या पिळवणुकीला आळा बसला. खाण कामगार, शेती कामगार, घरकामागर, वेगवेगळ्या विभागात काम करणारे कामगार, खासगी, शासकीय वा निमशासकीय क्षेत्रात काम करणारे कामगार यांचा सर्वांचा विचार करून त्यांनी सुधारणा सुचवल्या. महिला कामगारांचे प्रश्न, त्यांच्या प्रसूतीकाळातील रजा, त्यांच्या कामाच्या तासात कपात इत्यादी बाबींवर बाबासाहेबांनी लक्ष वेधत त्या त्या क्षेत्रात सूट मिळवून दिली.

सामाजिक क्षेत्रात न्याय मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी अहोरात्र काम केले. त्याचप्रमाणे त्यांनी शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात खूप मोठे बदल घडवून आणले. आजच्या अनेक आर्थिक विषयांचा समावेश त्यांनी त्या वेळी आपल्या लिखाणात केला होता. आता ती धोरणे किती वापरली जातात, हा त्या त्या सरकारचा प्रश्न आहे. पण त्यांनी मांडलेल्या आर्थिक सूचनांच्या अभ्यासावर खूप लेखन केले गेले आहे. अनेक परदेशी विद्यापीठांत त्यांचे प्रबंध संदर्भासाठी वापरले जातात. जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती त्यावेळीदेखील होती आणि आजही ती कायम आहे.

या सर्व बाबींबरोबर या देशात निर्माण झालेले विविध क्षेत्रातील स्त्रियांचे, कानाकोपऱ्यात असणाऱ्या अल्पसंख्याकांचे, शेतमजुरांचे, शेतीचे, शेतकऱ्यांचे, कामगारांचे, विजेचे, देशाच्या आर्थिक नीतीचे बीजारोपण बाबासाहेबांच्या दूरदृष्टीने झाले आहे. त्यांच्या आर्थिक तत्त्वज्ञानातून भारतीय पैशाचे मूल्य निर्धारित झाले. जीवन विमा सुरू करण्याचे पहिले काम बाबासाहेबांनीच केले. त्याचा लाभही कर्मचाऱ्यांना मिळवून दिला. हा कर्मचारी कोणत्या वर्गाचा वा कोणत्या जातीत जन्मला, हे त्यांनी तेव्हा पाहिले नाही. तो भारतीय आहे ना मग झाले! भारतात प्रशासन प्रणालीचे, विविध स्तरातील भाषावादाचे, फाळणीचे सर्व प्रश्न बाबासाहेबांनी हाताळले होते. त्यांचे सखोल चिंतन देशाच्या आधुनिक जडणघडणीच्या बांधणीचे मूलमंत्र ठरले. शिक्षण घेऊन नोकरीअभावी राहणाऱ्या बेरोजगारांना बेकारभत्ता, सर्व स्तरातील वृद्धांना पेन्शन आणि एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज कार्यालयांची निर्मिती ही बाबासाहेबांचीच देणगी आहे. निवृत्तांना पेन्शन, भविष्यनिर्वाह निधी, मजुरांना किमान वेतन, अकाली मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मदत ही धोरणेही बाबासाहेबांच्या चिंतनातून आलेल्या विचारांचे आणि कृतीचे फळ आहे. यासाठी त्यांनी कायदे केले. त्या कायद्यांच्या आधारे आजही भारताचा कार्यभार चालतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे महनीय कार्य पाहता ते एका वर्गापुरते मर्यादित नव्हते, हेच सिद्ध होते. देशाविषयीचे त्यांचे प्रेम आणि निष्ठाही त्यातून दिसून येते. त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये दूरदृष्टी दिसून येते. भविष्यात भारताला काय काय अडचणी येऊ शकतात, ते त्यांच्या द्रष्टेपणाने समजून घेतले होते.

त्यांना एकदा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी विचारले की, तुमचे आणि भारतातील राजकीय नेतृत्वाचे पटत नाही, अशावेळी तुम्ही आमच्या बाजूने येत असाल तर आम्ही तुमच्या मागण्यांना पाठिंबा देऊ. त्यांनी मनात आणले असते तर त्यांना हे शक्य होते, मात्र या महामानवाने तात्काळ नकार देत ठणकावून सांगितले की, माझे आणि माझ्या देशातील राजकीय नेतृत्वाचे संबंध याबाबतीत आम्ही निर्णय घेऊ, तुम्ही आमच्यात नाक खुपसू नका. कारण प्रथमतः आणि अंतिमतः मी भारतीय आहे. या प्रसंगातून त्यांचे भारत आणि भारतीय यांच्याशी त्यांची असणारी जवळीक दिसून येते.

या साऱ्याचे स्मरण त्यांच्या जयंतीनिमित्ताने करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे.

  • माधव विश्वनाथ अंकलगे,
    वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी
    (संपर्क – 9764886330, 9021785874)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply