श्रावण महिन्याच्या निमित्ताने संस्कृत साहित्यातील एका अद्भुत श्लोकसंग्रहाचा परिचय आणि मराठी अनुवाद प्रसिद्ध करत आहोत. राघवयादवीयम् हे त्या श्लोकसंग्रहाचे नाव. रामकथा आणि कृष्णकथा एकाच वेळी वाचता येते, हे या राघवयादवीयम् श्लोकसंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. कांचीपुरम् येथे सतराव्या शतकात कवी वेंकटाध्वरी यांनी राघवयादवीयम् श्लोकसंग्रहाची रचना केली. या ग्रंथाला अऩुलोम-विलोम काव्य असेही म्हणतात. संपूर्ण संग्रहामध्ये रामासाठी ३० आणि कृष्णासाठी ३० असे केवळ ६० श्लोक आहेत. या श्लोकांमधील पहिली ओळ वाचली, तर रामकथा होते (त्याला अनुलोम म्हणतात.) याच श्लोकाची अक्षरे उलट्या क्रमाने वाचली, तर ती कृष्णकथा होते. याचा मराठी अनुवाद रत्नागिरीतील निवृत्त संस्कृत शिक्षिका सौ. वंदना दिगंबर घैसास यांनी केला आहे.
