रत्नागिरी/मुंबई : भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचे अखेर चक्रीवादळात रूपांतर झाले असून, ते तीन जून रोजी दुपारी ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने अलिबागच्या जवळ किनाऱ्यावर धडकणार आहे. याबद्दलचा ‘ऑरेंज मेसेज’ (चक्रीवादळाची पूर्वसूचना/दक्षतेचा इशारा) हवामान विभागाने जाहीर केला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या उत्तर कोकणातील जिल्ह्यांसह दक्षिण गुजरातमधील जिल्ह्यांना या वादळाचा थेट फटका बसणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे वाहणार आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या जिल्ह्याच्या मंडणगड, दापोली, गुहागर या तीन तालुक्यांमधील चार हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले असून, खबरदारीचा उपाय म्हणून तीन जूनला सकाळी नऊ ते दुपारी १२ या वेळेत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.