कोकणात कोकणाचे प्रश्न असतील, तसेच विदर्भात विदर्भाचे म्हणून काही प्रश्न असतील, मराठवाड्याचेही काही प्रश्न असतील. सर्वच ठिकाणी स्थानिक उद्योगांना, लघुउद्योगांना गरज असलेल्या तरुणांची उपलब्धता करून देण्यासाठीही उद्योग विभागाने तसे अभियान राबवायला हवे. मोठ्या उद्योगांप्रमाणेच या छोट्या उद्योगांनाही कामगार-कर्मचाऱ्यांची गरज असते. ती स्थानिक स्वरूपातच भागविली गेली, तर स्थलांतर रोखले जाईलच, पण त्याचबरोबर त्या त्या स्थानिक उद्योगांची आणि पर्यायाने त्या विभागाचीही भरभराट होईल. हा समन्वय साधला जाणे आवश्यक आहे.
