बातमी… थोडक्यात…!

डोळ्यांच्या डॉक्टरांना ऐका आकाशवाणीवर
रत्नागिरी :
इन्फिगो आय केअर हॉस्पिटल आता रत्नागिरीकरांना सुपरिचित झाले आहे. या हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनाही आकाशवाणीच्या श्रोत्यांनी अनेक वेळा ऐकले असेल. त्यांनाच पुन्हा एकदा वेगळ्या कार्यक्रमात ऐकण्याची संधी रत्नागिरी आकाशवाणीच्या श्रोत्यांना मिळणार आहे. मात्र यावेळी ते डोळे त्यांचे आजार आणि उपचार याविषयी बोलणार नाहीत, तर तो ज्ञान आणि मनोरंजनपर कार्यक्रम असणार आहे.

‘याचि देही हाचि डोळा’ असे या कार्यक्रमाचे नाव आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, २५ डिसेंबर २०२०पासून आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित होणार आहे. शनिवार आणि रविवार वगळता दररोज सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.

डॉ. ठाकूर नेत्रोपचार तज्ज्ञ आहेत. रुग्णालयाच्या उभारणीच्या निमित्ताने त्यांनी जगाला गवसणी घातली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जगभरातील असंख्य अनुभव आहेत. याच अनुभवांची शिदोरी ज्ञान आणि मनोरंजनपर स्वरूपाच्या ‘याचि देही हाचि डोळा’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते उघड करणार आहेत त्याचा आस्वाद रसिकांना घेता येईल.

रत्नागिरीतील पहिल्या ‘अटल वायफाय झोन’चे २५ डिसेंबरला उद्घाटन

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील पहिला वाय-फाय झोन स्टेट बँक कॉलनी परिसरात सुरू करण्यात येणार आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस प्रवीण देसाई यांच्या संकल्पनेतून दिवंगत पंतप्रधान व भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी (२५ डिसेंबर) ‘अटल वाय-फाय झोन’ सुरू होणार आहे. त्याचे उद्घाटन भाजपचे द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस राजेश सावंत, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, रत्नागिरी शहर अध्यक्ष सचिन करमरकर, भाजयुमो शहर अध्यक्ष विक्रम जैन उपस्थित राहणार आहेत.

सौ. रेखा इनामदार यांच्या काव्यरेखा-अभ्यास कवितासंग्रहाचे प्रकाशन

रत्नागिरी : वरवडे (ता. रत्नागिरी) येथील हायस्कूलच्या शिक्षिका आणि रत्नागिरी जिल्हा संस्कृत शिक्षक मंडळाच्या अध्यक्षा सौ. रेखा रवींद्र इनामदार यांच्या काव्यरेखा-अभ्यास या कवितासंग्रहाचे प्रकाशन समारंभपूर्वक झाले. रत्नागिरीच्या फाटक प्रशालेत हा कार्यक्रम झाला. जिंदालचे माजी पीआरओ राजीव लिमये, फाटक हायस्कूलचे मुख्याध्यापक किशोर लेले, जागुष्टे हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक रवींद्र इनामदार यांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले. काव्यसंग्रहात मराठी कविता, आरत्या, हिंदी कविता, संस्कृत भाषेतील कोडी, संस्कृत भाषेची माहिती, नाट्यछटा, वन्दे मातरम्, हिंदी भाषेची माहिती आदींचा समावेश आहे. कवितासंग्रहाची प्रस्तावना गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांनी लिहिली आहे. काव्यरेखा-अभ्यास हे पुस्तक विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास श्री. लिमये यांनी व्यक्त केला. श्री. लेले यांनीही कवितासंग्रहाला शुभेच्छा दिल्या.

देवरूख चिंचवड शयन-आसनी बससेवा सुरू
देवरूख :
एसटीच्या देवरूख आगारातर्फे २६ सप्टेंबर २०२०पासून देवरूख पुणे चिंचवड मार्गावर शयन-आसनी बससेवा सुरू होत आहे. देवरूख चिंचवड गाडी दररोज सकाळी आठ वाजता सुटेल. आज (ता. २६) पहिली फेरी रवाना झाली. परतीच्या प्रवासासाठी चिंचवड देवरूख गाडी रोज रात्री सव्वाआठ वाजता सुटेल. गाडीत बसण्यासाठी ३० तर १५ शयनआसने आहेत. गाडीत ज्येष्ठ नागरिकांसह कोणतीही सवलत उपलब्ध नसल्याची माहिती देवरूखच्या आगार व्यवस्थापक मृदुला जाधव यांनी दिली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media