Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

वाहतूक सुरक्षिततेकरिता ज्येष्ठ नागरिकांनी प्रबोधन करावे : मसुरकर

Advertisements

रत्नागिरी : अलीकडे अल्पवयीन आणि मद्यधुंद, बेदरकार आणि विशिष्ट वाहनचालकांमुळे हिट अँड रनसारख्या घटना वाढीस लागल्या आहेत, त्यामुळे निष्पाप लोकांचे नाहक बळी जात आहेत. भारतातील अपघात व अपघाती मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी आवश्यक त्या प्रबोधनाच्या कार्यात ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘मोटार जगत’चे संपादक आणि वाहतूक क्षेत्राचे अभ्यासक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केले.

‘कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक स्नेहमेळाव्यात श्री. मसुरकर यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’द्वारे ‘ज्येष्ठ नागरिकांची रहदारीतील सुरक्षा’ याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. श्री. मसुरकर गेली २५ वर्षे सुरक्षित वाहतुकीविषयी विविध व्यासपीठावरून प्रबोधन करीत असून हा त्यांचा १३२ वा कार्यक्रम होता. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष मारुती अंबरे होते.

सुरक्षेच्या दृष्टीने वाहतुकीच्या परिस्थितीविषयी प्रबोधन करताना श्री. मसुरकर म्हणाले की जगातील सर्वाधिक रस्ते अपघाती मृत्यू भारतात होतात. रस्ते अपघातात बळी जाणाऱ्यांपैकी सर्वाधिक ४१.९ टक्के व्यक्ती २४ ते ६५ वर्षे वयोगटातील असतात. दर मिनिटाला एक अपघात आणि साडेतीन मिनिटांनी एक अपघाती मृत्यू अशी भयानक अवस्था आहे. चालकांमधील बेदरकार वृत्ती, वाहनांची वाढती गर्दी, नियम पाळण्याबाबत अनास्था इत्यादी कारणांमुळे अपघातांची संख्या वाढते. म्हणून ज्येष्ठ नागरिकांनी मॉर्निंग वॉक, बागेत तसेच बाजारपेठेत जाताना अथवा नातवंडांना शाळेत सोडायला जाताना पुरेशी काळजी घेऊन स्वतःची सुरक्षितता पाहावी. आपली मुले आणि नातवंडासह कुटुंबाचे आणि त्यायोगे समाजाचे मार्गदर्शक होण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

वाढत्या वयानुसार शारीरिक क्षमता कमी होणे, मधुमेह, रक्तदाब अशा विकारांचा शरीरात शिरकाव होणे याबरोबरच औषधांमुळे विशिष्ट वेळ झोप लागणे इत्यादी बाबी लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जुलै महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचा शुभेच्छापत्र आणि आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. प्रारंभी संघाचे पदसिद्ध मार्गदर्शक श्यामसुंदर सावंतदेसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केल्यानंतर तसेच प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर कासेकर यांनी मार्गदर्शक श्री. मसुरकर यांच्या कार्याचा परिचय करून दिला. तसेच त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनसाठी निवृत्त मुख्याध्यापक रवींद्र इनामदार यांनी प्रोजेक्टर साहित्य उपलब्ध होण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांना धन्यवाद देण्यात आले.

संघाचा पुढील मासिक स्नेहमेळावा शनिवार, ३१ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी चार वाजता आयोजित केल्याचे अध्यक्ष अंबरे यांनी जाहीर केले. संघाचे कोषाध्यक्ष मुकुंद जोशी, सचिव सुरेश शेलार, सुधाकर देवस्थळी, नारायण नानिवडेकर व कार्यकारिणी सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर मनोहर चांडगे यांच्या आभार प्रदर्शनानंतर पसायदानाने या मेळाव्याची सांगता झाली.कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version