दापोली : दापोली सायकलिंग क्लब आयोजित दापोली विंटर सायक्लोथॉन सीझन ६ मध्ये दापोली परिसरातील स्पर्धकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून आयोजित केलेली शॉर्ट सिटी लूप राइड स्पर्धा आणि फन राइड सोहनी विद्यामंदिर मैदानावर उत्साहात पार पडली.
स्पर्धेत यामध्ये ७ ते ६० अधिक वर्षे वयोगटातील १५० पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. चार किमीच्या शॉर्ट सिटी लूप राइड मार्गावर स्पर्धकांनी १ ते २५ हून अधिक फेऱ्या मारत ४ ते १०० किलोमीटर अंतर सायकल चालवली.
१०० किलोमीटर अंतर सायकल चालवण्यासाठी सात तासांची वेळ मर्यादा देण्यात आली होती. पहाटे पाच वाजता सुरू झालेली ही राइड दुपारी १२ पर्यंत चालली. सहभागी सर्व स्पर्धकांना पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच ५०, ७०, १०० किमी सायकलिंग करणाऱ्यांना सर्वांना प्रत्येकी २००, ३००, ५०० रुपयांचे बक्षीस देण्यात आले. अनेकांना सन्मानार्थ चषक, शालेय भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
नितीन बर्वे, मकरंद पुजारी, सार्थक मांडवकर, अद्वैत अमृते, अथर्व मांडवकर, प्रेम भुसारे यांनी १०० हून अधिक किमी सायकल चालवली. निशा शर्मा, वेदांग करंदीकर, स्वराज मांजरे, श्रवण हांडे इत्यादींनी ७० हून अधिक किमी सायकल चालवली. मानसी फाटक, रिद्धिमा चव्हाण, अन्वय मंडलिक, वेद गोरिवले, आहान अमृते इत्यादी अनेकांनी ५० हून अधिक किमी सायकल चालवली. सात वर्षे वयोगटातील छोटे सायकलस्वार आभा फाटक, अंश पांडे, आहान अमृते, पुस्कराज कदम, आराध्य गोरिवले, मेघराज कळंबकर, आदी भांबीड, प्रेम जाडे इत्यादींनाही गौरवण्यात आले.
या सायक्लोथॉन स्पर्धेचे नियोजन करण्यासाठी अंबरीश गुरव, प्रशांत पालवणकर, राजेशकुमार कदम, रागिणी रिसबूड, राजेंद्र नाचरे, सुरज शेठ इत्यादी अनेकांनी मोलाची भूमिका बजावली. तणावविरहित तंदुरुस्त आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात सायकलचा वापर अधिक करा आणि सायकल संस्कृती जपण्याच्या कार्यात सहकार्य करा, असे आवाहन दापोली सायकलिंग क्लबतर्फे करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

