Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

तासभर स्वच्छता केल्यावर रत्नागिरीचे प्रशासन गेले झोपी

Advertisements

रत्नागिरी : देशभर आज एक ऑक्टोबर रोजी राबविण्यात आलेला एक तारीख एक तास स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविल्यानंतर रत्नागिरीचे प्रशासन पूर्णपणे झोपी गेले आहे. दिवसभर कोसळणारा पाऊस, अनेक ठिकाणी निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती आणि दिवसभर खंडित झालेला वीजपुरवठा याबाबत प्रशासनाकडून कोणतीही माहिती जनतेला देण्यात आलेली नाही.

स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून एक तारीख एक तास स्वच्छता ही सेवा हा उपक्रम देशभरात राबविला जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही तो राबविण्यात आला. एका हातात छत्री आणि दुसऱ्या हातात झाडू घेऊन संततधार पावसात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली, पण उपचारापुरता हा उपक्रम राबविल्यानंतर जिल्ह्याचे संपूर्ण प्रशासन जनतेच्या दृष्टीने झोपी गेल्यासारखी परिस्थिती आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. आज दिवसभरही पाऊस सुरूच आहे. त्यामुळे काही ठिकाणी झाड कोसळणे, दरड कोसळणे, पूर अशी आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. शिवाय दिवसभर महावितरणचा विद्युतपुरवठाही खंडित झाला आहे. पण याबाबत अधिकृत माहिती देण्याबाबत प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. विविध खासगी प्रसारमाध्यमांवर याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध होत असल्या तरी नेमकी वस्तुस्थिती काय आहे, प्रशासन काय करत आहे, उपाययोजना सुरू आहेत का, दिवसभर खंडित झालेला महावितरणचा वीजपुरवठा कोणत्या कारणामुळे झाला आहे, तो नेमका कधी सुरू होणार आहे, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

जिल्हा माहिती कार्यालयाकडून सकाळी अकरा वाजता स्वच्छतेविषयीची बातमी आली. शासकीय अधिकारी आणि कर्मचारी पावसात भिजून स्वच्छता कशी करत आहेत, याची छायाचित्र प्रसिद्ध झाली. सेल्फी पॉइंटवर काढलेले फोटो प्रसिद्ध झाले. पण त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत म्हणजे सुमारे साडेसहा तास जिल्हा माहिती कार्यालयाकडून जिल्ह्यातील स्थितीविषयीची कोणतीही माहिती अधिकृतपणे उपलब्ध झालेली नाही. कोणतीही छायाचित्रे आलेली नाहीत. कोणते मदतकार्य सुरू आहे, त्यात कोणते अडथळे आहेत, परिस्थिती पुन्हा कधी सुरळित होणार आहे, याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. महावितरणच्या वीजपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांना ई-मेलच्या माध्यमातून माहिती दिली जाते. ती माहितीही महावितरणने आज दिलेली नाही.

अशा स्थितीत नागरिकांना दिवस संततधार पावसामुळे आणि रात्री विजेअभावी अंधारात काढावा लागणार आहे का, विजेअभावी तो पाण्याविनाही काढावा लागणार आहे का, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version