दापोलीत सायकल फेरीतून स्वच्छतेचा संदेश

दापोली : स्वच्छ्ता हीच सेवा उपक्रमाच्या जनजागृतीसाठी दापोलीत सायकल फेरी काढून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. भर पावसात निघालेल्या या फेरीला उत्तम प्रतिसाद मिळाला.

स्वच्छ भारत ही एक सामायिक जबाबदारी आहे आणि त्यासाठी केला जाणारा प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा आहे. अधिक स्वच्छ भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी स्वच्छता हीच सेवा- स्वच्छतेसाठी एक तास हा उपक्रम राबवत लोकसहभागातून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. काल (दि. १ ऑक्टोबर) रोजी याबाबत जनजागृती करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लब, संतोषभाई मेहता फाउंडेशन आणि ज्ञानदीप संस्थेतर्फे दिवंगत संतोषभाई फुलचंद मेहता यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्ताने सायकल फेरी काढण्यात आली.

आझाद मैदानातून सुरू झालेली ही फेरी केळस्कर नाका, एसटी आगार, पोलीस ठाणे, बाजारपेठ, फॅमिली माळ, बुरोंडी नाका, ज्ञानदीप शाळा या मार्गाने ५ किलोमीटरचा टप्पा पार करून पुन्हा आझाद मैदानावर आली. यामध्ये
ज्ञानदीपच्या अध्यक्षा सरोज मेहता, नगराध्यक्षा ममता मोरे,
गटशिक्षणाधिकारी आण्णासाहेब बळवंतराव, लायन्स क्लब, जेसीआय, रोटरी क्लबचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. ते पटवून देण्यासाठी या सायकल फेरीच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेची गरज, त्याचे फायदे आणि महत्त्व याबद्दलचे प्रबोधन करण्यात आले. स्वच्छता, साफसफाई श्रमदान मोहीम राबवण्यात आली. घर आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची शपथ घेण्यात आली.

या सायकल फेरीचे नियोजन सुजय मेहता, सुयोग मेहता, संकेत मेहता, सूरज शेठ, विनय गोलांबडे, अंबरीश गुरव, संदीप भाटकर, ज्ञानदीप शाळेचे शिक्षकवर्ग इत्यादींनी केले. दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करुया आणि आरोग्य तंदुरुस्त ठेवू या, असे आवाहन आयोजकांनी केले.

सायकल फेरीची झलक पुढच्या व्हिडीओमध्ये –

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply