मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी झाला. त्यानिमित्ताने त्यांचे कार्यकर्तृत्व आणि विचारधारा आजच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न.
………………………..
मोहनदास यांचे लहानपणी अगदी सर्वसामान्य मुलाप्रमाणे वर्तन होते. अतिशय भित्रा, लाजाळू, शालेय जीवनात अगदी सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणे बुद्धिमत्ता. वयाच्या बाराव्या वर्षी कस्तुरबा नामक एका मुलीशी त्यांचा विवाह झाला. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी कायद्याची पदवी घेण्यासाठी ते लंडनला गेले. जाताना आईसमोर स्वतःच्या पवित्र जीवन जगण्याविषयी आणि स्वतःला पवित्र ठेवण्याविषयी शपथ घेतली. परत आल्यावर राजकोटला वकिली सुरू केली. स्वतःचा वकिली व्यवसाय खूपसा यशस्वी न करता आलेल्या या माणसाने भारताची वकिली मात्र इतकी अप्रतिम केली की ब्रिटिशांनासुद्धा त्यांच्या वकिली पांडित्याची भीती वाटे. पुढे ते वकिलीच्या कामासाठी दक्षिण आफ्रिकेत गेले. तेथे गोऱ्या लोकांची वर्णद्वेषी राजवट होती. भारतीय वंशाच्या लोकांना रजिस्ट्रेशन कायद्याद्वारे स्वतःच्या नावाची नोंदणी आणि अंगठ्याचे निशाण अनिवार्य होते. अशा प्रकारच्या कायद्याला लोकांचा विरोध होता. गांधीजींनी या लोकांना एकत्र केले आणि शांततेत अहिंसक आंदोलन केले. गांधीजींच्या आंदोलनाची पद्धत बघून स्थानिक गोऱ्या सरकारने त्यांच्याशी तडजोड केली, पण ट्रान्सवाल प्रदेशातील सरकारने ही तडजोड स्वीकारली नाही. म्हणून पुढे ट्रान्सवालमध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली एक मिरवणूक काढण्यात आली. परिणामी ट्रान्सवालमध्यृसुद्धा कायदा रद्द करण्यात आला. पुढे ९ जानेवारी १९१५ रोजी ते भारतात आले. हा दिवस आपण ‘प्रवासी भारतीय दिन’ म्हणून साजरा करतो.
भारतात आल्यावर प्रथम त्यांनी त्यांचे राजकीय गुरू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांची भेट घेतली आणि त्यांच्या सल्ल्यानुसार भारत भ्रमण केले. भारत भ्रमण करताना त्यांना भारतीय जनतेच्या दारिद्र्याची, अज्ञानाची आणि मागासलेपणाची कल्पना आली. परिणामी त्यांनी स्वतःच्या सुटाबुटाच्या पोशाखाचा आणि राहणीमानाचा त्याग केला. किशोरवयात असताना त्यांना ब्रिटिशांच्या सत्तेविषयी आणि ब्रिटिशांच्या राहणीमानाविषयी कमालीची उत्सुकता होती. अशा या माणसाने इंग्लंडला जाण्यापूर्वी आपल्याला चांगले इंग्लिश यावे, म्हणून इंग्लिश बोलण्याचा आणि ब्रिटिश लोकांप्रमाणे डान्स करता यावा म्हणून क्लाससुद्धा लावले होते.
भारतभ्रमण करताना ते पुण्याला लोकमान्य टिळकांकडे गेले. टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. ते टिळकांना भगवान टिळक म्हणत. लोकमान्य टिळक ब्रिटिशांशी सनदशीर मार्गाने लढा देत होते. उत्सव, वृत्तपत्रे, राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था, संघर्षरत चळवळी आणि प्रतियोगिता सहकारिता या माध्यमातून टिळकांचे कार्य सुरू होते. याशिवाय टिळकांनी १९१७ ला रशियामध्ये साम्यवादी क्रांती झाल्यावर रशियाप्रमाणेच भारतात काही करता येईल का, म्हणून आपले काही सहकारी रशियात पाठवले होते. अफगाणिस्तानवर इंग्रजांना ताबा मिळवता आलेला नव्हता. तेव्हा टिळकांनी आपले काही सहकारी अफगाणिस्तानातही पाठवले होते. त्या माध्यमातून भारतामध्ये काही करता येईल का, याची ते चाचपणी ते करत होते.
तत्त्व म्हणून सत्याग्रहाचे सर्वोच्च स्थान गांधीजींचे, पण टिळकांना ते मान्य नव्हते. ते गांधीजींना म्हणाले की जनतेला हे मान्य असेल तर मीसुद्धा तुमचा अनुयायी होईल. पण मला या पद्धतीने स्वातंत्र्य मिळेल, असे वाटत नाही.
इंग्लंडमध्ये असताना एकदा गांधीजींची सावरकरांशी भेट झाली होती. त्यानंतर १९३७ च्या जवळपास गांधीजींनी रत्नागिरीत स्थानबद्ध असलेल्या सावरकरांची भेट घेतली. भेटीत सावरकर गांधीजींना म्हणाले, या देशाच्या अहिंसावादी तत्त्वज्ञानामुळे पूर्वी हा देश अनेक वेळा परकीयांच्या भक्ष्यस्थानी पडला. “रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले” त्यावर गांधीजी म्हणाले, आपल्या दोघांचेही उद्दिष्ट समान आहे, पण मार्ग वेगळे आहेत.
गांधीजींनी विरोधाला विरोध केला नाही. त्यांच्या मते विरोधक म्हणजे शत्रू नव्हे, मतभेद म्हणजे शत्रुत्व नव्हे, भारतीय तत्त्वज्ञानातील हे सहिष्णुतेचे तत्व त्यांनी अंगीकारले होते. आधुनिक लोकशाहीचे ते द्योतक आहे. क्रांतिकारकांबद्दल ते ‘वाट चुकलेले देशभक्त’ असा उल्लेख करत.
गांधीजींना भारतीय जनमानसाच्या नाडीचा अचूक अंदाज होता. त्यांना भारतीय संस्कृती, प्रथा, परंपरा आणि सभ्यतेचा अभ्यास होता. म्हणूनच देशासंदर्भातील सर्वच विषयांवर त्यांचे निश्चित असे मत होते आणि ते मत सार्वकालिक होते. त्यांचे शिक्षणाविषयीचे धोरण बऱ्याच अंशी आजच्या आधुनिक अंगाने आपल्याला नवीन शैक्षणिक धोरणात दिसून येते. नई तालीम, मूलोद्योगी शिक्षण म्हणजेच व्यवसायाभिमुख शिक्षण आणि स्वयंपूर्ण शाळा ही त्यांची संकल्पना आपल्याला नवीन शैक्षणिक धोरण २०२० मध्ये दिसत आहे. लोकविद्या आणि लोककलांना चालना, संस्कृत भाषेला चालना, सहावीपासून कौशल्यावर आधारित शिक्षण, नववी ते बारावी ऐच्छिक विषय निवड. थोडक्यात १०-२-३ या मेकॉलेप्रणित पॅटर्नला तिलांजलीच.
सत्य, सत्याग्रह, अहिंसात्मक लढा लढताना जुलूम आणि अन्याय यांचा अहिंसक मार्गाने प्रतिकार करणे, प्रतिकार करताना होणाऱ्या हालअपेष्टा संयमाने सहन करणे, अन्याय करणाऱ्या व्यक्तीला सत्य आणि न्याय्य बाजू याची जाणीव करून देणे आणि तिचे मतपरिवर्तन करणे हे सत्याग्रहाचे उद्दिष्ट असते. सत्याग्रहीने त्यासाठी हिंसा किंवा असत्य याचा वापर करता कामा नये. केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक हिंसासुद्धा पूर्णपणे अमान्य. हा विचार स्वीकारणे एक फार मोठे आश्चर्यच होते. तेही भारतासारख्या अनेक जाती, धर्म, संप्रदायांमध्ये विभागलेल्या समाजाला हा विचार स्वीकारण्यासाठी सिद्ध करणे सोपी गोष्ट अजिबात नाही. गांधीजींनी चंपारण्यातील नीळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची समस्या, खेडा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतसारा माफीचा प्रश्न, अहमदाबादचा गिरणी कामगार लढा सत्याग्रहाच्या मार्गाने यशस्वी केला. आइन्स्टाइनने आपल्या एका ग्रंथामध्ये असे म्हटले आहे की विसाव्या शतकात ही विचारधारा असणारा एक माणूस या भूतलावर होऊन गेला ही गोष्ट भविष्यातील अनेक पिढ्यांना केवळ चमत्कारच किंवा दैवी गोष्ट वाटेल आणि ते यावर विश्वासच ठेवू शकणार नाहीत.
याच दरम्यान ब्रिटिश सरकारने रौलट कायदा आणला. या कायद्याद्वारे कोणाही भारतीयाला विनाचौकशी अटक आणि तुरुंगात टाकण्याचा अधिकार सरकारला मिळाला होता. गांधीजींनी त्या कायद्याला काळा कायदा असे म्हटले आणि ६ एप्रिल १९१९ रोजी जनतेला हरताळ पाळण्याचे आवाहन केले. याच दरम्यान पंजाबमध्ये अमृतसर येथील जालियनवाला बागेत जनरल डायरने शांततेने सभा घेणाऱ्या निःशस्त्र लोकांवर बेछूट गोळीबार केला. हजारो लोक त्यात मरण पावले. या हत्याकांडाचा निषेध म्हणून गांधीजींनी त्यांना मिळालेली ‘कैसर ए हिंद’ ही पदवी सरकारला परत केली तर रवींद्रनाथ टागोर यांनी ‘सर’ ही पदवी सरकारला परत केली. अशा सरकारशी सहकार्य करणे म्हणजे सैतानाशी सहकार्य करणे असे म्हणत गांधीजींनी जनतेला सरकारशी कोणत्याही प्रकारे सहकार्य न करायचे आवाहन केले. या देशामध्ये ब्रिटिश सरकार भारतीय जनता त्यांना सहकार्य करते म्हणून आहे. मग ते भीतीपोटी का असेना, एकदा का लोकांच्या मनातील भीती नष्ट होऊन त्यांनी सरकारशी सर्व प्रकारचा असहकार पुकारला, तर हे सरकार एक दिवसही टिकू शकणार नाही, अशी त्यांची धारणा होती.
गांधीजींनी देशातील जनतेला असहकार आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. आंदोलन पूर्ण अहिंसक असावे असे गांधींजीचे मत होते. पण चळवळ ऐन भरात असताना उत्तर प्रदेशातील चौरीचोरा येथील शांतपणे निघालेल्या मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केला. लोक संतप्त झाले. लोकांनी पोलीस स्टेशनला आग लावली. त्यात २२ पोलीस मरण पावले. गांधीजींनी या हिंसक घटनेमुळे चळवळ तत्काळ थांबवली. गांधीजींवर सरकारने राजद्रोहाचा खटला भरला. त्याला उत्तर देताना गांधीजी म्हणाले, “मला गुन्हा मान्य आहे. मी ब्रिटिशांच्या राणीच्या सत्तेला न्यायाचे राज्य मानत होतो, पण जालियनवाला हत्याकांडाने माझ्या या विचाराला धक्का बसला. म्हणून असे वर्तन करणाऱ्या सैतानरूपी सत्तेविरुद्ध असहकार आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. पण हे करताना जनतेची पूर्ण तयारी केली नाही, जनतेची तयारी न करताच आंदोलन केले म्हणून मी दोषी आहे. मला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी.”
भारत मंत्री लॉर्ड बर्कनहेड यांच्या अहवानानुसार पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीयांनी सर्वसमावेशक अशी वसाहतीअंतर्गत स्वातंत्र्याची मागणी इंग्रज सरकारकडे केली आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी सरकारला एका वर्षाची मुदत दिली. या ठरावावर सरकारने एका वर्षात काहीही न केल्याने १९३० मध्ये राष्ट्रीय सभेने पूर्ण स्वराज्याची मागणी करण्याचा ठराव मांडला आणि त्यानुसार जनआंदोलन सुरू करण्यासाठी सर्व सूत्रे महात्मा गांधींकडे सोपविण्यात आली. महात्मा गांधींनी त्यानुसार देशभर सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी गांधीजींनी मिठाची निवड केली. गांधीजींच्या मते मीठ हे गरीब, श्रीमंत या दोघांनाही अत्यावश्यक आहे. मिठासारख्या जीवनावश्यक नैसर्गिक वस्तूवर कर बसवणे अन्यायकारक होते. गांधीजी आपल्या ७८ सहकाऱ्यांसोबत अहमदाबाद जवळील साबरमती आश्रमातून मिठाचा कायदा मोडण्यासाठी ३५० किलोमीटर पदयात्रा करत दांडी या ठिकाणी येऊन पोहोचले. तेथील समुद्रकिनाऱ्यावर मीठ उचलून त्यांनी मिठाचा कायदा मोडला. या त्यांच्या कृतीबद्दल ‘उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया’ असे वर्णन केले जाते.
मिठाच्या सत्याग्रहाबाबत त्यांनी सहकाऱ्यांशी चर्चा केली आणि आपला निर्णय सरकारला कळवला, तेव्हा सरकारमधील व्हाइसरॉयसह अनेकांनी गांधीजींच्या या आंदोलनाची टवाळी केली. पण पदयात्रा सुरू झाली आणि त्याला मिळणारा जनतेचा प्रतिसाद पाहिला, तेव्हा सर्वच जण आश्चर्यचकित झाले. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये या यात्रेबद्दल चर्चा होऊ लागली. तेव्हा इंग्रज सरकारला खडबडून जाग आली. जेव्हा सरकार जनतेवरच अन्याय करते आणि सनदशीर मार्गाने सरकारविरुद्ध प्रतिवाद करण्याचे सर्व मार्ग खुंटतात, तेव्हा अशा सरकारला त्याच्या चुकीच्या निर्णयांची वस्तुस्थिती निदर्शनास आणून देण्यासाठी लोकशाही मार्गाने प्रतिवाद करण्याचे हत्यार म्हणजे पदयात्रा होय. याची सुरुवात गांधीजींनी प्रथम यशस्वी केली. त्यानंतर या देशात अनेक नेत्यांनी पदयात्रा केल्या आणि पदयात्रेच्या माध्यमातून सरकारला जागृत करण्याचा प्रयत्न केला.
ब्रिटिश प्रधानमंत्री रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी भारताशी संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करण्यासाठी गोलमेज परिषदांचे आयोजन केले होते. पहिल्या गोलमेज परिषदेत राष्ट्रीय सभेचा सहभाग नसल्याने ती निष्फळ ठरली. दुसऱ्या गोलमेज परिषदेत राष्ट्रीय सभेच्या सहभागासंदर्भात पंतप्रधान मॅक्डोनाल्ड यांनी केलेल्या आवाहनानुसार व्हाइसरॉय आयर्विन आणि गांधीजी यांच्यात करार झाला. त्या कराराप्रमाणे गांधीजींनी दुसऱ्या गोलमेज परिषदेला येण्याचे मान्य केले. तसेच सविनय कायदेभंगाचे आंदोलन स्थगित केले आणि सरकारने भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपद्धतीचा स्वीकार करण्याची हमी दिली. त्याचबरोबर राष्ट्रीय सभेच्या अनेक नेत्यांची तुरुंगातून मुक्तता केली. गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी इंग्लंडला गेले. तेथे भारतातील अनेक संस्थानिकांचे आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी हजर होते. अनेक विषयांवर या भारतीय सभासदांमध्येच एकमत न झाल्याने गांधीजी निराश झाले आणि उद्विग्न मनःस्थितीत भारतात परत आले. भारतात आल्यावर त्यांनी सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाची दुसरी फेरी सुरू केली. गांधीजींना सरकारने अटक केली. यानंतर लगेचच तिसरी गोलमेज परिषद भरली. त्या गोलमेज परिषदेत राष्ट्रीय सभा सहभागी नव्हती. पण ब्रिटिश सरकारने जातीय निवाडा घोषित केला. या जातीय निवाड्यामुळे हिंदू धर्मात फूट पडणार, हे गांधीजींच्या लक्षात आल्याने गांधीजींनी येरवडा तुरुंगातच या निर्णयावर आमरण उपोषण सुरू केले. गांधींच्या प्राणाचे मोल लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधीजींसोबत पुणे करार केला. या करारानुसार दलितांना ७८ विभक्त मतदार संघ ऐवजी विधिमंडळात १४८ राखीव जागा द्याव्यात असे ठरले. पुढे याला ब्रिटिश सरकारनेही मान्यता दिली.
सविनय कायदेभंगाच्या काळात व्हाइसरॉय आयर्विन यांच्या जागेवर विलिंग्टन यांची नेमणूक झाली, तेव्हा आयर्विन यांनी नवीन येणाऱ्या व्हाइसरॉयसाठी एक सूचनापत्र लिहिले होते. त्यात त्यांनी लिहिले आहे, या मोहनदास करमचंद गांधींपासून सर्वांत जास्त सावध राहा. ही अत्यंत चतुर व्यक्ती आहे, साधूचे रूप घेणारी, पंचा गुंडाळणारी. या व्यक्तीपासून सावध राहिले नाही, तर ही व्यक्ती केव्हा खिशात घालेल, हे कळणारही नाही. सर्वसाधारण माणूससुद्धा प्रामाणिकपणाच्या जोरावर किती मोठ्या उंचीवर जाऊ शकतो, याचे हे एक उत्तम उदाहरण आपल्याला दिसून येते. गांधीजी स्वतःच्या जीवनाबद्दल स्वतः म्हणत, ‘ My life is my message ‘ माझे जीवन हाच माझा संदेश आहे.
फाळणीबद्दल गांधीजींना अंधारात ठेवले. फाळणी जिनांनी घडवून आणली किंवा ती ब्रिटिशांनीच घडवून आणली. कारण भारतीय उपखंडात कायमची अस्थिरता राहावी ही त्यामागची धारणा होती किंवा तो एक कुटिल डाव होता. ज्या देशाला आपण गुलाम बनवले, त्या देशाकडून भविष्यात आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून ही त्यांनी केलेली एक सोय होती. गांधीजींना फाळणी मान्य नव्हती. ते स्वतः अनेक वेळेला म्हणाले, मी या देशाची फाळणी होऊ नये म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न करेन. म्हणूनच आपण १४ ऑगस्ट हा दिवस स्मृती दिन म्हणून पाळण्यास सुरुवात केली कारण या दिवशी देशाचे विभाजन झाले.
गांधीजींनी स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय सभेचे विसर्जन करण्याचा सल्ला दिला होता. कारण स्वातंत्र्य हे केवळ काँग्रेस राष्ट्रीय सभेमुळेच मिळाले असे नाही. त्यासोबतच ते म्हणत, प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या गावासाठी स्वतःला वाहून घ्यावे. आधुनिक कालखंडात जे राळेगणसिद्धीमध्ये अण्णा हजारेंनी केले. असेच काम प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या गावात केले, तर गाव समृद्ध होईल आणि गावसमृद्धीने देश समृद्ध होईल हा विचार गांधीजींनी आग्रहाने मांडला.
गांधीजींचे असे अनेक विचार आजही अमलात आणण्यासारखे आहेत. त्याबाबत आजच्या दिवशी आणि प्रत्येक दिवशी आपण विचार करायला हवा.
– प्रा. प्रशांत शिरुडे
(के. रा. कोतकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, डोंबिवली)
prashantshirude1674@gmail.com
(संपर्क – 9967817876)

