ये दिल अभी भरा नहीं…!

मुंबई : वयाच्या नव्वदीतही तरुणांना लाजवेल अशा ऊर्जेने कार्यरत असलेल्या चिरतरुण, सदाबहार गायिका आशा भोसले यांनी आज (१२ एप्रिल २०२६) मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्या ९२ वर्षांच्या होत्या. ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगलीत जन्मलेल्या आशा भोसले यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून गायला सुरुवात केली आणि हिंदी, मराठीसह वीस भाषांमध्ये जवळपास १२ हजार गाणी गायली. ‘संगीत हा माझा श्वास आहे,’ असे म्हणणाऱ्या आशाताईंनी बहुरंगी छटांची, वेगवेगळ्या प्रकारच्या भावना दर्शवणारी आणि वेगवेगळ्या बाजाची गीते तितक्याच ताकदीने पेश केली. भक्तिगीते, गझलांपासून शास्त्रीय संगीतापर्यंत आणि उडत्या चालीच्या गाण्यांपासून पॉप संगीतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची गीते त्यांनी अजरामर केली. ग्रामोफोन रेकॉर्डिंगच्या काळात सुरू झालेला त्यांचा प्रवास आजच्या स्ट्रीमिंगच्या युगापर्यंत सुरू होता आणि सर्व युगांमध्ये त्यांचे रसिकांच्या मनावरचे अधिराज्य कायम आहे. लतादीदींनी तर आपल्या स्वर्गीय सुरांनी कीर्ती प्राप्त केलीच; मात्र आशाताईंनीही अंगभूत प्रतिभेने स्वतःला पैलू पाडून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आणि लोकप्रियता मिळवली. साहजिकच किती तरी पुरस्कार त्यांना मिळाले. महाराष्ट्रभूषण पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले आहे. वैयक्तिक जीवनातील अडचणींनी त्यांचा अक्षरशः पिच्छा पुरवला; मात्र त्या आपल्या तेजाने तळपत राहिल्या. पाककलेची आपली आवडही त्यांनी जोपासली आणि २००२पासून रेस्तराँची साखळी जगभरात उघडली. त्यांच्या निधनामुळे एका युगाचा अस्त झाला असून, ‘अभी ना जाओ छोडकर, ये दिल अभी भरा नहीं…’ अशीच साऱ्या रसिकांची भावना आहे. १३ एप्रिलला सायंकाळी चार वाजता मुंबईत शिवाजी पार्क इथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
आशा भोसले यांनी स्वतःविषयी लिहिलेली एक नोंद येथे देत आहोत.

सुधीर फडके आणि गदिमा यांच्याबरोबर मी खूप कामं केली. आम्ही शनिवारी-रविवारी पुण्यात येऊन मराठी चित्रपट केले आहेत. मराठीचा मामला त्या मानानं थोडा ‘स्लो’ असायचा. स्पष्ट, आग्रही वळणाचं, सुसंस्कृत असं सुधीर फडके यांचं संगीत, तर वसंत पवार, रामभाऊ कदम यांचं मराठमोळ्या थाटाचं, साधंसुधं संगीत…
ओ. पी. यांनी उर्दूचे उच्चार शिकवले. माझ्या आवाजाचा उपयोग करून तहेतऱ्हेची गाणी दिली. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे मी कधी सुचवलं तर ते ऐकायचे. अर्थात, योग्य वाटलं तर. इतर संगीतकारांना म्हणजे सी. रामचंद्र वगैरेंना तसं चालत नसे.
‘ढाके की मलमल’मधलं ‘जादूगार सांवरिया’ मला आवडतं. ‘भागमभाग’मधलं ‘छलके चंदा का पैमाना,’ तर ‘हावडा ब्रिज’ मधलं ‘आईये मेहरबाँ आवडतं..’
‘मी मज हरपून बसले ग’, ‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे…’ ही गाणी मला आवडतात.
इतक्या वर्षांनंतर आजही माझा गाण्याचा रोजचा रियाज चुकलेला नाही.
सुरुवातीला मा. नवरंग यांच्याकडे शिकले. नंतर गोविद प्रसाद जयपूरवाले यांच्याकडेही गाण्याचे पाठ घेतले.
पण पहिला गाण्याचा खोल संस्कार बाबांचाच आहे. ते आम्हां भावडांना घेऊन गायला बसल्याचे दृश्य अजूनही स्पष्ट आठवते..
आम्हांला घडवलं लेखकांनी, कवींनी. हे लोक नसते तर आमचं काय झालं असतं कुणास ठाऊक? मी विपुल वाचन केलं. आजही करते. पूर्वी मी पेंटिंग करायची; पण भोसल्यांनी ते साहित्य फेकून दिलं. वाचन मात्र माझं सुटलं नाही. म्युनिसिपालटीच्या दिव्याच्या उजेडातही मी वाचत असे. एकदा शेगडीवर शिजत ठेवलेली डाळ करपली, एवढी वाचनात दंग झाले होते. भोसल्यांनी खूप मना केलं, तरी हे चुकलं नाही. मी शरत्साहित्य वाचलं आहे. पु. भा. भावे, खांडेकर, अप्पा दांडेकर, सुमती क्षेत्रमाडे यांचं साहित्य वाचून काढलं आहे. पु. ल. देशपांडे, चिं. वि. जोशी खूप आवडतात; तसेच आशापूर्णादेवीचं साहित्यही माझ्या संग्रही असतं. मी एकदा कार्लाइलसंबंधी काही तरी बोलल्यावर माझ्या मुलीनं चमकून पाहिलं. मी भाषांतरित चार्ल्स डिकन्स वगैरे साहित्यही वाचते.
या कहाणीच्या दोन बाजू आहेत. एक दुःखी व दुसरी आनंददायी, नाव, पैसा, गाणं आणि मूल ही आनंदाची बाजू. आजच्या क्षणी माझं गाणं आणि माझी मुलं हेच माझं विश्व आहे. आई, बहिणी, भाऊ आपापल्या जगात. आयुष्याचा जोडीदार दुःखच देऊन गेलेला. आपलं म्हणणारं कुणी नाही. माझी मुलं मात्र माझं सर्वस्व आहेत.
परमेश्वराजवळ मागेन, काहीही सहन करण्यासाठी शक्ती दे. लाचारी म्हणजे मरण. त्याची वेळ नको, माझी कुणी कीव करावी, हे सहन होत नाही. ताठ मानेनं जगण्याची हिंमत मात्र द्यावी..
.
– आशा भोसले
(स्रोत : ‘आशा भोसले : नक्षत्रांचे देणे’ (मोरया प्रकाशन)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply