सायबर गुन्हे रोखण्यासाठी महाजनजागृती मोहीम; ज्येष्ठांच्या खात्यांचा उतरवला जाणार सायबर विमा

सायबर गुन्हे रोखण्यासाठी महाजनजागृती मोहीम; ज्येष्ठांच्या खात्यांचा उतरवला जाणार सायबर विमा

रत्नागिरी : सायबर फसवणुकीच्या वाढत्या प्रकारांना पायबंद घालून सायबर गुन्ह्यांचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात पुढच्या महिन्यात एकाच दिवशी सर्व ८४९ ग्रामपंचायतींमध्ये महाजनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी ही माहिती दिली. या संदर्भात आज (२७ ऑगस्ट

  1. घेतलेल्या विशेष आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी

मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक स्मिता सुतार, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे यांच्यासह प्रमुख बँकांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या एका सायबर गुन्ह्यात गुन्हेगारांनी ८७ लाख रुपयांची रक्कम अवघ्या दोन मिनिटांत मुंबई आणि तमिळनाडूतल्या खात्यांमार्फत तब्बल १४०० विविध खात्यांमध्ये वळती केली. अशा गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी सामान्य नागरिकांनी सावधानता बाळगणं, हाच सर्वांत मोठा उपाय असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी या वेळी सांगितलं. असे प्रकार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, महाजनजागृती मोहिमेद्वारे पोलीस, बँक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी थेट गावागावांमध्ये जाऊन महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षिततेचे धडे द्यावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

तंत्रज्ञानाची फारशी माहिती नसलेले ज्येष्ठ नागरिक अशा गुन्ह्यांना बळी पडण्याचं प्रमाण मोठं असून, बँकांनी त्यांच्या खात्यांचा सायबर विमा उतरवावा, अशी सूचना सामंत यांनी केली. कोणत्याही खात्यातून अचानक मोठी रक्कम हस्तांतरित होत असल्यास बँकेने तत्काळ खातेदार आणि पोलिसांना माहिती द्यावी. खातेदारांची वैयक्तिक आणि गोपनीय माहिती बँकेतून बाहेर फुटणार नाही याची संपूर्ण खबरदारी बँकांनी घ्यावी. सायबर गुन्ह्यांच्या तपासात बँकांनी पोलिसांना विनाविलंब माहिती आणि तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून द्यावं, अशा सूचनाही सामंत यांनी दिल्या. सायबर भामट्यांविरोधातली ही लढाई केवळ पोलिसांपुरती मर्यादित न राहता लोकचळवळ बनली पाहिजे, असंही पालकमंत्री सामंत म्हणाले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply