
१९७९पासून मुंबई, कोल्हापूर आणि रत्नागिरीसारख्या शहरांत केलेल्या पत्रकारितेच्या गाठीशी असलेल्या अनुभवाच्या आधारे मी गुढीपाडव्याच्या शुभदिनी (२१ मार्च २०१५) कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस ही पत्रकारितेशी संबंधित व्यावसायिक सेवा सुरू केली. मुद्रितशोधन, वृत्त-वृत्तांतलेखन, विविध विषयांवरच्या पुरवण्यांचं संकलन, लेखन अशा स्वरूपाची कामगिरी मी केली. आकाशवाणीसाठीही वृत्तलेखन, तसंच विविध मालिकांसाठी मी लेखन केलं. काही शासकीय स्मरणिका आणि अंकांचं संकलन-संपादनही मी केलं असून, पत्रकारितेच्या क्षेत्रातील या कामगिरीसाठी स्थानिक ते राज्य पातळीपर्यंतच्या विविध पुरस्कारांनी माझा गौरव झाला आहे.
माध्यमांच्या या युगात देशविदेशातील बातम्या सहज उपलब्ध होत असताना आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या छोट्याशा, पण महत्त्वाच्या घटनाही दुर्लक्षित राहतात. या घटनांना बातमीचं मूल्य असतं. ते मूल्य समाजातील व्यक्ती, संस्था-संघटनांचे कर्मचारी-अधिकारी, सदस्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे त्या घटना इतरांपर्यंत पोहोचत नाहीत. वृत्तपत्रांसह विविध माध्यमांशी संपर्क साधताना सर्वसामान्यांबरोबरच विशेष व्यक्ती आणि संस्थांनाही अडचणी येतात. प्रसिद्धीपत्रकं, नियोजित कार्यक्रमांची निवेदनं, कार्यक्रमांच्या बातम्या तयार करून देताना त्या लिहिणं (Drafting) सर्वांनाच जमतं असं नाही. त्यामुळे अनेकदा व्यक्ती आणि संस्थांना अपेक्षित असलेला महत्त्वाचा मुद्दा बाजूलाच राहतो. अशा संस्था आणि व्यक्तींना बातम्या, वृत्तांत लिहिण्यासाठी त्यांना मदत करणं हा या व्यवसायाचा एक भाग आहे.

२०१५ साली झोंपाळ्यावरची गीता ही अनंततनय यांनी केलेली १०० वर्षं जुनी रचना संकलित करून कोकण मीडियातर्फे प्रकाशित करण्यात आली. गीतेचा हा अत्यंत सुलभ मराठीत केलेला बाळबोध, रसाळ भावानुवाद आहे.

यानंतर त्याचा टप्पा म्हणून कोकणातल्या सर्व क्षेत्रांतल्या घडामोडींचा परामर्श घेणारे आणि पालघरपासून सिंधुदुर्गापर्यंत पसरलेल्या आणि राज्याची राजधानी असलेल्या मुंबईचाही समावेश असलेल्या कोकणाचा सर्वंकष धांडोळा घेणारे कोकण मीडिया हे साप्ताहिक सुरू केले. २०१६च्या दीपोत्सवाच्या मुहूर्तावर या साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. तो गेल्या शतकाचा मागोवा घेणारा विशेषांक होता. त्याला चांगला प्रतिसाद तर मिळालाच, पण मुंबईतल्या महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघातर्फे सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकासाठी दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र दीप पुरस्कारासाठी कोकण मीडियाच्या या पहिल्याच दिवाळी अंकाची निवड झाली. आपले प्रयत्न योग्य मार्गावर आहेत, याची ती पावती होती.


२०१७चा म्हणजेच दुसरा दिवाळी अंक वास्तुसौंदर्य विशेषांक होता. कोकणातील निरनिराळ्या वास्तूंच्या सौंदर्याचा वेध त्यातून घेण्यात आला होता.

२०१८चा दिवाळी अंक कोकणातील जलवैभवाला वाहिलेला होता. या अंकाला मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचा उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार मिळाला.

२०१९ हे आंतरराष्ट्रीय बोलीभाषा वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर कोकणातील बोलीभाषांमधील कथांची स्पर्धा घेण्यात आली आणि २०१९च्या दिवाळी अंकात त्या कथा प्रसिद्ध करण्यात आल्या. पालघर ते सिंधुदुर्ग अशा संपूर्ण कोकणातील अनेक बोलीभाषांतील कथालेखकांनी यासाठी कथा पाठवल्या होत्या. आतापर्यंतच्या सर्वच दिवाळी अंकांना वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तो आमचा उत्साह वाढवणारा आहे. आता २९ फेब्रुवारी २०२० रोजी आमची वेबसाइट सुरू करत आहोत. कोकणातील घटना-घडामोडी, समृद्धीची माहिती देणारे, समस्या मांडणारे लेख आदी साहित्य जगभर पोहोचावे, असा त्यामागचा उद्देश आहे.

दिवाळी अंकांव्यतिरिक्त दर आठवड्याच्या अंकातही कोकणाशी संबंधित वेगवेगळे आणि दुर्लक्षित विषय प्रसिद्ध करण्याचा आमचा प्रयत्न असतो. या प्रयत्नांना कोकणाशी संबंधित सर्वच घटकांची साथ आवश्यक आहे. ती मिळेल असा विश्वास वाटतो. आमच्या या उपक्रमाबद्दलचे अभिप्राय, सूचना आदींचे स्वागतच आहे.
धन्यवाद…
- प्रमोद कोनकर
संपादक,
साप्ताहिक कोकण मीडिया, रत्नागिरी
ई-मेल : pramodkonkar@kokanmedia.in
मोबाइल/व्हॉट्सअॅप : 9422382621
साप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी फक्त ६०० रुपये - गुगल प्ले बुक्सवरून साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
- इन्स्टामोजो स्टोअरवरून अंक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
- बुकगंगा डॉट कॉमवरून साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकांची ई-बुक्स, तसेच अन्य पुस्तके खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
- साप्ताहिक कोकण मीडियाच्या सोशल मीडिया हँडलच्या लिंक्स खाली दिल्या आहेत.