ज्येष्ठ पत्रकार, माजी नौसैनिक अरुण कृष्णनाथ आठल्ये यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार, माजी नौसैनिक अरुण कृष्णनाथ आठल्ये यांचे निधन

रत्नागिरी : खानू (ता. जि. रत्नागिरी) येथील ज्येष्ठ पत्रकार, माजी नौसैनिक आणि समाजसेवक अरुण कृष्णनाथ आठल्ये यांचे शनिवारी, दि. २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर रविवार, दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता खानू येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी व पुतणे असा परिवार आहे. अरुण कृष्णनाथ आठल्ये यांचा जन्म ११ जानेवारी १९४९ रोजी रत्नागिरीजवळील खानू येथे झाला. प्राथमिक शिक्षण खानू येथेच झाले. त्यानंतर मुंबईतील विल्सन हायस्कूल आणि पोतदार हायस्कूल येथे त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले. १९६८ मध्ये भारतीय नौदलात नौसैनिक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. पहिले पोस्टिंग अंदमान येथे झाले. त्यानंतर INS म्हैसूर, नीलगिरी, हिमगिरी, द्रोणागिरी अशा विविध युद्धनौकांवर त्यांनी सेवा बजावली. १९७१ च्या भारत-पाक युद्धात वेस्टर्न नेव्हल कमांडमधून त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. युद्धातील सहभागाबद्दल भारतीय नौदलाकडून त्यांना ‘पश्चिम स्टार मेडल’ देऊन सन्मानित करण्यात आले होते. नौदलातील सेवेदरम्यान विविध देशांतील युद्धसरावांमध्येही त्यांनी सहभाग घेतला. यानिमित्ताने त्यांना रशिया, सिंगापूर, बँकॉक, मलेशिया, इंडोनेशिया (जकार्ता व बाली) आणि ग्रीसमधील अथेन्स येथे जाण्याची संधी मिळाली. १९७८ मध्ये भारतीय नौदलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी काही काळ परदेशात काम केले. १९८१ मध्ये इराण तसेच जलदूत शिपिंग कंपनीत इलेक्ट्रिकल ऑफिसर म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर ते आपल्या जन्मगावी खानू येथे परतले. गावात परतल्यानंतर सामाजिक कार्यात सक्रिय होत त्यांनी खानू ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषविले. याच काळात त्यांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीलाही सुरुवात झाली. रत्नागिरीतील दै. रत्नभूमी, दै. रत्नागिरी टाइम्स आणि तरुण भारत या दैनिकांमध्ये त्यांनी बातमीदार म्हणून काम केले. पत्रकार म्हणून काम करताना संरक्षण विषय हा त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय होता. भारतीय संरक्षण दलाच्या तिन्ही दलांवर त्यांनी सविस्तर माहितीपर लेखमाला प्रसिद्ध केली. त्यांच्या लेखनातून संरक्षण दलाविषयीची माहिती सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम झाले. समाजसेवेच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय होते. खानू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी त्यांनी मोफत जागा उपलब्ध करून दिली. सैनिकांविषयी त्यांच्या मनात असलेला आदर आणि देशसेवेची भावना त्यांच्या सामाजिक कार्यातूनही प्रकर्षाने जाणवत असे. पत्रकारिता, समाजसेवा आणि माजी सैनिक म्हणून केलेल्या कार्याबद्दल त्यांना विविध संस्थांकडून गौरविण्यात आले. राज्य सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या वतीने उत्कृष्ट पत्रकार म्हणून त्यांचा रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. तसेच संकल्प कला मंच, कुमार शेट्ये मित्रमंडळ, राजरत्न प्रतिष्ठान, कीर्तनसंध्या परिवार आदी संस्थांनीही त्यांचा गौरव केला होता. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचा दर्पण पुरस्कार त्यांना मिळाला होता.

देशसेवेतून पत्रकारितेकडे आणि त्यानंतर गावाच्या सामाजिक कार्यात सक्रिय राहिलेल्या अरुण कृष्णनाथ आठल्ये यांच्या निधनाने एक ज्येष्ठ पत्रकार, माजी नौसैनिक आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply