जिल्हा गुंतवणूक परिषदेत रत्नागिरीत २१५९ कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक; पंचतारांकित हॉटेलदेखील होणार

जिल्हा गुंतवणूक परिषदेत रत्नागिरीत २१५९ कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक; पंचतारांकित हॉटेलदेखील होणार

रत्नागिरी : जिल्हा गुंतवणूक परिषदेत रत्नागिरी जिल्ह्यात २१५९ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये रत्नागिरीच्या पर्यटन वैभवात भर घालणाऱ्या १०० कोटींच्या पंचतारांकित हॉटेल प्रकल्पासह मोठ्या औद्योगिक प्रकल्पांचा समावेश आहे. जिल्ह्यातील पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्राला बळ देण्यासाठी महत्त्वाच्या घोषणा या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केल्या. कोकणात उद्योग येत नाहीत, हा ठपका पुसून काढून रत्नागिरीच्या स्थानिक उद्योजकांनी औद्योगिक आणि पर्यटन विकासाला नवी गती दिली आहे, असे ते म्हणाले.

विमानतळापासून दोन किलोमीटर, रत्नागिरी शहरापासून तीन किलोमीटर आणि समुद्रापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर एमआयडीसीच्या जागेत एक्स्प्रेस ग्रुप पंचतारांकित हॉटेल उभारणार आहे. जयगड येथे उभारण्यात येत असलेल्या आनंद महिंद्रा यांच्या पंचतारांकित हॉटेलचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, ते लवकरच उद्घाटनासाठी सज्ज होत आहे. रत्नागिरी विमानतळाचे कामही ९० टक्के पूर्ण झाले असून, डिसेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ‘एटीआर’ प्रवासी विमान उड्डाण घेईल, अशी माहिती सामंत यांनी दिली.

कार्यक्रमात सामंत म्हणाले, ‘रत्नागिरीचा जीडीपी गेल्या २० वर्षांच्या तुलनेत कित्येक पटींनी वाढला असून, यात स्थानिक उद्योजक, व्यापारी आणि दुकानदारांचा मोठा वाटा आहे. स्थानिक उद्योजकांनी पुढाकार घेऊन २१५९ कोटींची गुंतवणूक केली आहे. हे सर्व प्रकल्प १०० टक्के पूर्ण करून पुढच्या वर्षी पाच हजार कोटींच्या गुंतवणुकीचा नवा संकल्प आपण पूर्ण करू.’

जिल्ह्यात रोजगारनिर्मितीसाठी मोठ्या प्रकल्पांची घोषणा या वेळी करण्यात आली. येत्या काही दिवसांत जिल्ह्यात स्टील उद्योगाचा मार्ग मोकळा होत असून, यामुळे किमान १० ते १२ हजार स्थानिकांना रोजगार मिळेल. ‘व्हीआयटी’कडून जमीन काढून ती ‘आरआरपी’ या सेमीकंडक्टर कंपनीला दिली जात आहे. निवेंडी, वाटद आणि मेर्वी येथे नव्या प्रदूषणविरहित एमआयडीसी उभारल्या जात आहेत. उद्योगांसाठी एमआयडीसीची जागा मिळवण्यासाठी ‘मिलाप’ ॲप सुरू करण्यात आले असून, वैध अर्ज केल्यास आठवड्याभरात थेट ऑफर लेटर घरबसल्या मिळेल. तसेच ‘मैत्री’ पोर्टलवर अर्ज केल्यास ३० दिवसांत दाखला मिळणे बंधनकारक असून, उशीर झाल्यास अधिकार आयुक्तांकडे जाऊन पुढील आठ दिवसांत मंजुरी दिली जाते.

तरुणांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आणि केंद्राच्या विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊन स्टार्टअप्स उभारावेत आणि नोकरी मागणारे न राहता नोकरी देणारे बनावे, असे आवाहन उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलनाने झाली. या परिषदेला उद्योग विभागाचे सहआयुक्त संदीप पाटील, अप्पर जिल्हाधिकारी मीनाक्षी कुंभार, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, प्रांताधिकारी जीवन देसाई, सहायक आयुक्त अजिंक्य आजगेकर, एमआयडीसी फेडरेशनचे प्रशांत पटवर्धन, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चाळके, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, उद्योजक राजेश सावंत, राज आंब्रे यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहायक आयुक्त अजिंक्य आजगेकर यांनी आभार मानले.

राज्यस्तर जिल्हा गुंतवणूक करार : ३० ऑगस्ट २०२६पर्यंत महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांत १८३७ गुंतवणूक करारांद्वारे ८२,६५५ कोटींची गुंतवणूक झाली असून, १,५५,३८९ जणांना याद्वारे रोजगार उपलब्ध होणार आहे. आगामी कालावधीमध्ये उर्वरित जिल्ह्यांतील जिल्हा गुंतवणूक करार परिषदांचे आयोजन प्रस्तावित असून, त्याद्वारेही राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊन युवक व युवतींना फार मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत.

रत्नागिरी जिल्हा गुंतवणूक परिषदेत एकूण ६२ उद्योग घटकांशी २१५९.३७ कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. या गुंतवणुकीतून एकूण २४२६ रोजगारांची निर्मिती होणार आहे.
आज झालेले करार
१. हॉटेल एक्स्प्रेस इन – १०० कोटी गुंतवणूक, फाइव्ह स्टार हॉटेल
२. स्क्वेअर पोर्ट शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड -१४१३ कोटींची गुंतवणूक, जहाजबांधणी उद्योग
3. सोलर स्केप एलएलपी – ३५ कोटींची गुंतवणूक
४. डिलक्स फिशरीज – १० कोटी गुंतवणूक
५. आरए स्पेशालिटी केमिकल – १५ कोटी गुंतवणूक

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply