जुने अभंग आणि आरत्यांचा चालताबोलता कोश निमाला; रवीदादा भाट्ये यांचे निधन

रत्नागिरी : सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान असलेले उमरे (ता. जि. रत्नागिरी) येथील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व रवींद्र गोपीनाथ भाट्ये यांचे आज (१२ एप्रिल २०२६) सकाळी पावणेआठच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने राहत्या घरी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. आज सायंकाळी पाच वाजता उमरे गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
रवीदादा भाट्ये म्हणून ते सर्वत्र सुपरिचित होते. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते आणि त्यांचे मोठे नाव होते. त्यांनी आपल्या स्वभावामुळे आणि काम करण्याच्या गुणामुळे अनेक गावांमध्ये अनेक माणसे जोडली. पाली येथील श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थान आणि नंतर मठमध्ये नव्याने उभारलेले श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थान या संस्थांशी ते जवळून संबंधित होते. जुने अभंग, आरत्या, भोवत्यांची पदे त्यांना मुखोद्गत होती. अनेक मंदिरांच्या पारंपरिक उत्सवांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असे. अगदी अखेरपर्यंत ते कार्यरत होते. मठ इथल्या लक्ष्मीपल्लीनाथाच्या मंदिरातील यंदाच्या चैत्रोत्सवाची सांगता तीन एप्रिल रोजी झाली. या उत्सवातही ते सहभागी झाले होते आणि या वयातही बुवांसमोर जमिनीवर बसून कीर्तनाचा आनंद घेत होते. रवीदादांच्या अचानक झालेल्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला असून, मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना रत्नागिरी, लांजा तालुक्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी असलेल्या त्यांच्या सुहृदांकडून व्यक्त होत आहे.
सात डिसेंबर २०२४ रोजी रवीदादांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा झाला होता. त्या वेळी श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानातर्फे (मठ) त्यांना सन्मानपत्र देण्यात आले होते. त्या सन्मानपत्रातून त्यांच्या कार्याच्या व्याप्तीची थोडी कल्पना येते. ते सन्मानपत्र येथे (फोटोच्या खाली) दिले आहे.

नुकत्याच झालेल्या श्री लक्ष्मीपल्लीनाथाच्या चैत्रोत्सवात कीर्तन श्रवणानंद घेताना रवीदादा भाट्ये (डावीकडे)

आदरणीय श्री. रवींद्र गोपीनाथ भाट्ये,
हे तुमचं लौकिक नाव असलं, तरी रवीदादा भाट्ये ही तुमची ओळख सर्वदूर पोहोचलेली, तुमचं व्यक्तिमत्त्व उलगडणारी आणि म्हणूनच सर्वांना भावणारी आहे. आकाशीच्या रवीचं तेज सर्व दिशांना प्रकाशित करतं. तुमच्या तेजाने अनेक क्षेत्रांना ऊर्जा आणि बळ मिळालं. म्हणूनच या ‘रवी’ने सहस्र चंद्रांचं दर्शन घेतल्याचा टप्पा ओलांडणारा हा क्षण कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. मनुष्यमात्रांवर देवाची कृपा झाली, की त्याच्या प्रगतीचे वारू चौखूर उधळू लागतात. तुमच्या बाबतीत मात्र हे समीकरण थोडं वेगळं असावं, अशी श्रींची इच्छा असावी. म्हणूनच पालीच्या श्री लक्ष्मीपल्लीनाथाचं मंदिर तुमच्या भरीव योगदानामुळे नावारूपाला आलं. पूर्वी जिथे दिवसादिवशी सगळं साहित्य घेऊन जाऊन उत्सव करून परत यायचं अशी पद्धत होती, त्या मंदिरातल्या उत्सवांमध्ये अगदी बाबासाहेब पुरंदऱ्यांसारख्या महनीय व्यक्तीही येऊ लागल्या. मंदिराच्या केवळ वास्तूचा जीर्णोद्धार झाला नाही, तर त्याची आणि तिथल्या उत्सवाची कीर्ती सगळीकडे पसरली. वडिलांकडून मिळालेला वारसा समर्थपणे पुढे चालवताना तुम्ही या कामी सर्वस्व ओतलं. (हा वारसा तुमचा मुलगा शैलेशही पुढे नेत आहे.)
पुढे त्या मंदिरातल्या काही अडचणींमुळे मठ इथे श्री लक्ष्मीपल्लीनाथाचं नवं मंदिर उभारण्याचा विषय ठरला, तेव्हाही तुमच्यासारख्या या विषयात अधिकार आणि अनुभव असलेल्या ज्येष्ठ व्यक्तीचं पाठबळ किती मोलाचं होतं, ते शब्दांत सांगता येणार नाही. वयाने आणि सर्वार्थाने ज्येष्ठ असूनही अधिकार गाजवणं नव्हे, तर कार्यकर्ता म्हणून राबणं किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही कृतीतून दाखवून दिलंत आणि आम्हाला प्रेरणा मिळाली. पुढे श्रींच्या आशीर्वादाने ते कार्य सफलही झालं.
तुमचं राजकीय, शैक्षणिक, तसंच सामाजिक कार्य आणि त्यातूनच गावागावांमध्ये जोडलेली माणसं हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा पैलू. माणूस पैशांनी नव्हे, तर कामातून मोठा होतो, हे वाक्य तुम्हाला अगदी तंतोतंत लागू पडणारं आहे. एखाद्या कार्यक्रमाला रवीदादा उपस्थित असले, तर त्या कार्यक्रमाचा सोहळा होऊन जातो तो त्यामुळेच.
शास्त्रीय अंग असलेलं उत्कृष्ट गाणं हा घटक तर तुमच्यापासून वेगळा करताच येणार नाही. उत्सव कोणत्याही देवाचा असो, तुम्ही आलात, की अभंग आणि आरत्यांचा चालताबोलता कोश दैवी सुरांमध्ये सादरीकरण करणार असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण होते आणि काना-मनांना तल्लीनतेची अनुभूती घेता येते.
तुमच्या जीवनातल्या आजच्या महत्त्वाच्या दिवशी तुमच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतानाच तुमच्या आशीर्वादाचा हात आमच्या मस्तकी कायम असावा, अशी अपेक्षा व्यक्त करतो. आरोग्यपूर्ण आणि सुखी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा!!!

कुलोपासक आणि भक्त मंडळी
श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थान, मठ, ता. लांजा, जि. रत्नागिरी

सात डिसेंबर २०२४ (सहस्रचंद्रदर्शन सोहळा)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply