करंबेळे, बोले कुटुंबीयांच्या पुढाकाराने कोट येथे वाचनालय

लांजा : कोट (ता. लांजा) गावातील दिवाळेवाडीतील बोलये आणि करंबेळे कुटुंबीयांनी एकत्र येऊन पंचक्रोशतील विद्यार्थी आणि भावी पिढीला दिशा देण्यासाठी गुरुकृपा वाचनालय सुरू केले.

या वाचनालयाचे उद्घाटन राजापूर लांजा तालुका नागरिक संघ (मुंबई) संस्थेचे अध्यक्ष आणि कोकणातील नामांकित सामाजिक कार्यकर्ते सुभाष लाड यांनी केले. यावेळी ते म्हणाले, पुस्तके ही माहिती आणि ज्ञानाचा समृद्ध स्रोत आहे. वाचन ही एक सवय आहे. ती आपल्याला एक चांगली व्यक्ती बनवू शकते. वाचनामुळे आपल्याला ज्ञान आणि प्रेरणा मिळते. ते आपल्याला स्मार्ट बनवते. चांगल्या आणि यशस्वी जीवनासाठी अनेक महान लोक वाचनाची शिफारस करतात. वाचनाच्या सवयीमुळे आपले जीवन यशस्वी होऊ शकते. कोट गावाला ऐतिहासिक महत्त्व असून रणरागिणी लक्ष्मीबाईचे सासर असलेल्या कोट गावात अश्मयुगीन आणि ऐतिहासिक कलेचा उत्तम नमुना असलेला कातळशिल्प समूह ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रकाशात आणून तज्ज्ञांना येथे आणले. निसर्गयात्री संस्थेच्या माध्यमातून त्याचे दस्तावेजीकरण करण्यात आले. इटलीमधील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पांवर दाखविण्यात आलेल्या चित्रपटात कोट गावतील या कातळशिल्पांचे चित्रीकरण होते. यामुळे पुढच्या काळात ऐतिहासिक समृद्धी आणि निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची पावले मोठ्या संख्येने कोट गावाकडे वळतील. त्यादृष्टीने गावात विकासकामे होणे आवश्यक आहे. जागतिक दर्जाचे चित्रकार महेश करंबेळे यांच्या संकल्पनेला बळ देणाऱ्या बोले आणि करंबेळे कुटुंबीयांनी सुरू केलेल्या या गुरुकृपा वाचनालयात कोकणातील प्रत्येक लेखक-कवीचे एक तरी पुस्तक संग्रही असावे, जेणेकरून हे वाचनालय वैशिष्ट्यपूर्ण ठरेल, अशी सूचना श्री. लाड यांनी केली. वाचनसंस्कार करण्यास मदत करणाऱ्या या वाचनालयाची निर्मिती करणाऱ्या कोटवासीयांचे त्यांनी मोकळेपणाने कौतुक केले.

या वाचनालयामागची भूमिका विशद करताना आंतरराष्ट्रीय चित्रकार महेश करंबेळे यांनी कोट गावासह पंचक्रोशीतील मुलांना गुरुकृपा वाचनालय सर्वांगीण विकासासाठी सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

लांजा तालुक्यातील पर्यटनाच्या विकासासाठी प्रयत्नशील असलेले लांज्याच्या लोकमान्य वाचनालयाचे संचालक विजय हटकर यांनी वाचनालयाची निर्मिती करणाऱ्या दोन्ही कुटुंबीयांचे कौतुक केले. लांजा तालुक्यात काही दिवसांपूर्वी थंड हवेचे ठिकाण असलेल्या माचाळ गावात वाचनालय सुरू झाले. त्यापाठोपाठ कोट गावात वाचनालय सुरू झाल्याने तालुक्याच्या ग्रंथालय चळवळीला बळ मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाचनालयात जास्तीत जास्त अभ्यासू वाचक येण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

वाचनालयाच्या उद्घाटनप्रसंगी कोटच्या सरपंच निशिगंधा नेवाळकर, उपसरपंच रवींद्र नारकर, महेंद्र साळवी, मंगेश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य राजू सुर्वे, श्रीमती भिसे, श्री. कांबळे, माजी सरपंच आबा सुर्वे, राजू नेवाळकर, दिलीप मेस्त्री, प्रमोद मेस्त्री, महेश करंबेळे, दिवाळे वाडीप्रमुख, नारकर वाडीप्रमुख, तसेच गावातील भिसे, बोले, डिके, करंबेळे, भुवड, रेवाळे, पांचाळ, सुर्वे, नारकर, विचारे कुटुंबातील मान्यवर उपस्थित होते.Follow Kokan Media on Social Media

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply