रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. गेल्या शनिवारपर्यंतच्या (२७ जून) काळात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या अवघ्या आठ टक्के पाऊस पडला होता. तिथपासून आजपर्यंतच्या (४ जुलै) एका आठवड्यात वार्षिक सरासरीच्या तब्बल १७ टक्के पाऊस पडला आहे. हंगामात आतापर्यंत एकूण २५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळी संपलेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी १०० मिलिमीटर पाऊस कोसळला. सर्वाधिक १३८ मिलिमीटर पाऊस चिपळूणमध्ये, तर त्याखालोखाल १२५ मिलिमीटर पाऊस मंडणगडमध्ये बरसला. खेडमध्ये ११३, दापोलीत १०२, लांज्यात ९६, राजापुरात ९२, संगमेश्वरात ८८, रत्नागिरीत ८६, तर गुहागरमध्ये ५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीची पाणीपातळी अद्याप इशारा पातळीच्या वरच आहे; मात्र आज पहाटे पाचच्या तुलनेत सायंकाळी चारपर्यंत ती ०.५० मीटरने घटली आहे. जिल्ह्यातल्या अन्य कोणत्याही नद्या इशारा पातळीच्या वर नाहीत; मात्र त्यांची पातळी झपाट्याने वाढत आहे. चिपळूणमधल्या वाशिष्ठी नदीची पातळी पहाटेइतकीच म्हणजे तीन मीटर आहे; मात्र संगमेश्वरातली शास्त्री (३ मीटरवरून ४.८० मीटरवर), सोनवी (२.६०वरून ४.२० मीटरवर), बावनदी (४.८३वरून ६.७३ मीटरवर), राजापुरातली कोदवली (१.४०वरून ३.२० मीटरवर), लांज्यातली काजळी (१३.१०वरून १५.४० मीटरवर) आणि मुचकुंदी (०.४० मीटरवरून १.२० मीटरवर) या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ नोंदवली गेली आहे. जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे.
Follow Kokan Media on Social Media

