रत्नागिरीतील नामवंत वैद्य मंदार भिडे यांचे निधन

रत्नागिरी : शुद्ध आयुर्वेदातील उपचारपद्धतींचा अभ्यासपूर्ण अवलंब करून रुग्णपीडा मुळापासून दूर होण्यासाठी नेमके मार्गदर्शन करणारे रत्नागिरीतील नामवंत वैद्य मंदार श्रीकांत भिडे यांचे दुर्दैवी निधन झाले. ते ५१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
बावीस दिवसांपूर्वी मुंबईत उपनगरीय रेल्वेत चढताना गर्दीचा अंदाज न आल्याने प्लॅटफॉर्मवर पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती स्थिर होती; मात्र शुक्रवारी मध्यरात्रीनंतर (तीन-चार जुलैची रात्र) अचानक हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली.

रत्नागिरीत टिळक आळीत वास्तव्य असलेल्या वैद्य मंदार भिडे यांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरीत झाले. त्यानंतर वडिलांची बदली गुजरातमध्ये झाल्याने त्यांचे पुढील शिक्षण अहमदाबादच्या उद्गम स्कूलमध्ये झाले. अहमदाबादच्या अखंडानंद आयुर्वेद महाविद्यालयातून त्यांनी १९९८ साली बीएएमएस पदवीचे शिक्षण पूर्ण केले. दिवंगत वैद्यचूडामणी रघुवीर भिडे हे मंदार भिडे यांचे काका.
वैद्य म्हणून मंदार भिडे यांनी टिळक आळीत आपल्या राहत्या घरी दवाखाना सुरू करून रुग्णसेवा सुरू केली. शुद्ध आयुर्वेदातील तत्त्वांनुसार उपचार हे त्यांचे वैशिष्ट्य होते. या पद्धतीमध्ये औषधयोजनेपेक्षाही जीवनशैली आणि आहारबदलावर अधिक भर असतो. त्यांचा योग्य अवलंब केल्यास अगदी गंभीर विकारही पूर्णपणे बरा होऊ शकतो, याची प्रचीती रत्नागिरीतील अनेकांनी घेतली आहे. बाह्य चाचण्या करून नव्हे, तर रुग्णाशी चर्चेतून, त्याच्या सवयी जाणून घेऊन, त्याला तपासून रुग्णाच्या प्रकृतीचे नेमके निदान करणे आणि त्यानुसार त्याला आहारविहारातील योग्य ते सुचवणे आणि आवश्यकतेनुसार औषधयोजना यांवर वैद्य भिडे यांचा भर होता. त्यामुळे सुरुवातीला रुग्णांना त्यांचे पथ्य खूप आहे असे वाटे; मात्र ज्यांनी त्यांच्या मार्गदर्शनानुसार आहारविहारात बदल केले, त्यांचे विकार कायमचे दूर झाले. केवळ वेगवेगळ्या ठिकाणचे रुग्ण अभ्यासता यावेत, म्हणून कोकणापेक्षा वेगळे वातावरण असलेल्या ठिकाणीही ते प्रॅक्टिससाठी जात असत. रसजिज्ञासा परिसंवादासारखे कार्यक्रम आयोजित करण्यातही त्यांचा पुढाकार असे.
आयुर्वेदावर प्रभुत्व, सातत्याने नवनव्या गोष्टींचा अभ्यास, आयुर्वेदातील आदर्श आहारविहार पद्धतींचा शक्य त्या माध्यमातून प्रचार-प्रसार करताना इतर वैद्यकीय शाखांची योग्यताही समजून घेणे हे त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण गुण. यांबरोबरच अत्यंत नम्र स्वभाव आणि निरपेक्ष वृत्ती ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये आताच्या काळात दुर्मीळ अशीच. आयुर्वेदाचे शिक्षण घेतल्यामुळे संस्कृत आणि गुजरातमध्ये शिक्षण झाल्यामुळे गुजराती या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. रत्नागिरीतील गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेचे ते अध्यक्ष होते. ते अध्यक्ष झाल्यानंतर पाठशाळेत वैविध्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात येत होते.
वैदिक हिंदू धर्मावर त्यांची प्रचंड निष्ठा होती. अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्येही त्यांचे मोठे योगदान होते. ते सनातन संस्थेचे साधक होते. त्या माध्यमातूनही त्यांनी मोठ्या प्रमाणात कार्य केलेले आहे. आयुर्वेद व्यासपीठ या संस्थेचेही काम त्यांनी केले होते.
अशा व्रतस्थ योग्याच्या अचानक झालेल्या दुर्दैवी निधनामुळे सर्वांनाच चटका बसला असून, मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे. (वैद्य मंदार भिडे यांचा कोकण मीडियाच्या संग्रहातील व्हिडिओ सोबत दिला आहे.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply