
रत्नागिरी : कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाने ज्येष्ठ नागरिक भवनात ज्येष्ठ नागरिक दिन विविध उपक्रमांनी उत्साहाने साजरा केला.
काल (दि. १ ऑक्टोबर २०२३) ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने झालेल्या या कार्यक्रमात संघाचे अध्यक्ष मारुती अंबरे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. सेवानिवृत्तीनंतर कौटुंबिक जीवनातील जबाबदाऱ्यांमधून मुक्त होताना उर्वरित आयुष्य आपल्या सहकारी ज्येष्ठांच्या सहवासात एकत्र येऊन आपले अंगभूत छंद आणि कलागुण जोपासावेत. त्यामुळे प्रसन्न वातावरणात तणावमुक्त जीवन जगता येईल, असे आवाहन त्यांनी केले.
संघाचे पदसिद्ध मार्गदर्शक श्यामसुंदर सावंतदेसाई म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटना आणि युनोच्या माध्यमातून जागतिक स्तरावर १९९१ पासून एक ऑक्टोबर हा ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जात आहे. राज्य शासनाने २०१८ मध्ये सुधारित धोरण जाहीर केले. आता ज्येष्ठांनी आपल्या आर्थिक मागण्यांसाठी संघटित व्हावे.
संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र कदम, नारायण नानिवडेकर, मधुकर बोले, बळवंत लोवलेकर, प्रकाश शिंदे यांनी चर्चेत भाग घेऊन ज्येष्ठांचे हक्क आणि कर्तव्यांची माहिती करून दिली.
सप्टेंबर महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचा श्रीफळ आणि शुभेच्छापत्र देऊन यावेळी सन्मान करण्यात आला. एसटीचे सेवानिवृत्त आगार व्यवस्थापक दिलीपराव साळवी आणि वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक जयप्रकाश नार्वेकर यांनी सुरेल आवाजात भक्तिगीते गाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कोषाध्यक्ष मुकुंद जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर कार्यवाह सुरेश शेलार यांनी आभार मानले. कार्यक्रमाला स्त्री-पुरुष ज्येष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
