रत्नागिरी : ‘रत्नागिरीच्या विमानतळाचं काम ७५ टक्के पूर्ण झालं असून, येत्या सुमारे तीन महिन्यांमध्ये इथून पहिल्या विमानाचं उड्डाण होईल,’ अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली. रत्नागिरीत सध्या असलेली धावपट्टी भारतीय तटरक्षक दलाकडे असून, टर्मिनल बिल्डिंग महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अखत्यारीत आहे. या विमानतळाच्या विकासासाठी या दोन संस्थांमध्ये आज (पाच जुलै) सामंजस्य करार झाला. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर आणि तटरक्षक दलाचे कमांडिंग ऑफिसर कुणाल नाईक यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. विमानतळासाठी आणखी आवश्यक असलेल्या जमिनीच्या संपादनासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून १० ते १५ कोटी रुपयांचा निधी एमआयडीसीकडून दिला जाणार असून, राज्यातला हा सर्वांत सुंदर विमानतळ बनवण्याचा प्रयत्न आहे, असं सामंत या वेळी म्हणाले. पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी येत्या वर्षभरात रत्नागिरीमध्ये पंचतारांकित हॉटेलची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असंही सामंत यांनी या वेळी सांगितलं.
विमानतळ सुरू झाल्यानंतर पाच वर्षांत त्या शहराचा जीडीपी ३.४ टक्क्यांनी वाढतो; मात्र विमानतळ १० वर्षं व्यवस्थित चालल्यास जीडीपी आठ टक्क्यांनी वाढतो, असं अभ्यासातून स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे रत्नागिरीच्या विकासात हा विमानतळ महत्त्वाची भूमिका निभावेल, असं दीपक कपूर या वेळी म्हणाले.
विमानतळ सुरू झाल्यामुळे रत्नागिरीचा जगप्रसिद्ध हापूस आंबा आणि काजू थेट परदेशात निर्यात करणं अधिक सोपं होईल. त्यामुळे स्थानिक उद्योग आणि व्यवसायांना मोठी चालना मिळेल. स्थानिक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी रत्नागिरी विमानतळावर स्थानिक महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी स्वतंत्र दालन उपलब्ध करून दिलं जाणार आहे, असंही सामंत म्हणाले.

