रत्नागिरी : वसुबारसेनिमित्त आज (५ नोव्हेंबर) रत्नागिरी तालुक्यातल्या सोमेश्वर इथल्या सोमेश्वर शांतिपीठ विश्वमंगल गोशाळेमध्ये गोमाता पूजन आणि गोसेवा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गोमाता पूजन करून या वेळी गोसेवेचं महत्त्व सांगण्यात आलं. तसंच, भजन आणि प्रसादवितरणही करण्यात आलं. अनेक नागरिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली होती. माजी आमदार बाळ माने, रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगरसेविका वर्षा ढेकणे आदी मान्यवरांचाही त्यात समावेश होता. (व्हिडिओ बातमीच्या शेवटी)
सौ. अनुजा विनोद पेठकर यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या या गोशाळेत निराधार, आजारी, जखमी आणि रस्त्यावर सोडून दिलेल्या गायी-बैलांचं संगोपन केलं जातं. सध्या या गोशाळेत ७७ गायी-वासरं-बैल असून, त्यांच्यासाठी निवारा, चारा-पाणी, औषधोपचार आणि नियमित देखभालीची व्यवस्था करण्यात आली आहे. गोशाळा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी चारा लागवडीबरोबरच शेणखत, गोमूत्र, धूपकांडी, धूपकप, गोनाइल, साबण आदी गोआधारित उत्पादनांच्या निर्मितीचे उपक्रमही राबवण्यात येत आहेत. अधिकाधिक नागरिकांनी गोशाळेला मदत करावी, असं आवाहन या वेळी करण्यात आलं.

