फेरोसिमेंट तंत्रज्ञानाने पावसाचे पाणी साठवून कोकण टिकवू शकेल समृद्धी : उल्हास परांजपे

फेरोसिमेंट तंत्रज्ञानाने पावसाचे पाणी साठवून कोकण टिकवू शकेल समृद्धी : उल्हास परांजपे

रत्नागिरी : ‘कोकणात भरपूर पाऊस पडूनही उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते. निसर्गाने आपल्याला पाणी भरभरून दिले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी योग्य पद्धतीने साठवणे आणि त्याचा पुनर्वापर करणे हीच काळाची गरज आहे. त्यासाठी फेरोसिमेंट तंत्रज्ञानाचा वापर करणे किफायतशीर ठरते. पावसाचे पाणी साठवण्याबद्दल जागरूकता झाल्यास कोकण आपली समृद्धी आजच्या काळातही टिकवू शकेल,’ असे प्रतिपादन मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानचे संस्थापक व जलतज्ज्ञ उल्हास परांजपे यांनी केले. (व्याख्यानाचा व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिला आहे.)

रत्नागिरीतील भारत शिक्षण मंडळ आणि माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पावसाचे पाणी साठवण्यात फेरोसिमेंट तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कृ. चिं. आगाशे प्राथमिक विद्यामंदिराच्या कीर सभागृहात हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला संस्थेच्या शैक्षणिक संस्थांतील शिक्षक, विद्यार्थी, पालक, तसेच माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

उल्हास परांजपे म्हणाले, ‘कोकणात सरासरी ३००० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडतो. म्हणजेच एका एकरवर सुमारे एक कोटी लिटरहून अधिक पाणी पावसाच्या रूपाने पडते. या पाण्याचा आवश्यक तेवढा भाग जरी आपण साठवून ठेवला, तरी वर्षभर शेती आणि दैनंदिन गरजा सहज भागू शकतात. ज्याप्रमाणे मुंबईसारख्या महानगराची पाण्याची गरज धरणे बांधून साठवलेल्या पाण्यावर भागवली जाते, त्याच धर्तीवर प्रत्येक घर आणि संस्थेने आपले पाणी स्वतः साठवण्याचा संकल्प केला पाहिजे. कोकणाएवढा पाऊस असलेल्या प्रदेशात पाणी साठवण्याची योग्य व्यवस्था घरोघरी, इमारतींमध्ये, संस्थांनी केल्यास भूगर्भातील पाण्याची गरजच भासणार नाही.”

फेरोसिमेंट तंत्रज्ञान : किफायतशीर आणि टिकाऊ पर्याय पाणी साठवणुकीसाठी फेरोसिमेंट तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त, कमी खर्चाचे आणि दीर्घकालीन उपयोगाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. हे तंत्रज्ञान स्थानिक गवंडी आणि कारागीर सहज शिकून घेऊ शकतात. यासाठी कोणत्याही मोठ्या किंवा बाहेरच्या यंत्रणेची गरज भासत नाही. घराचे बांधकाम करताना किंवा जोत्यामध्येच (पाया) भूमिगत टाक्या बांधल्यास जागेची बचत होते आणि वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याची सोय होते, असे त्यांनी विविध यशस्वी प्रयोगांचे दाखले देत स्पष्ट केले. घराचे बांधकाम करताना शक्य झाले नसेल, तरी फुलबाग, घराची खोली, पार्किंगची जागा याच्या खालीही पाण्याची टाकी बांधणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, शेतकऱ्यांना शेतात खुल्या टाक्याही कमी खर्चात बांधता येत असल्याचे त्यांनी स्वतःच्या अनुभवावरून सांगितले. संस्थेने कोकणासह राज्यभरात केलेले कार्य, तसेच अनेक ठिकाणी वेगवेगळ्या संस्था आणि व्यक्तींनी पर्जन्यजलसंचयासाठी केलेले प्रयत्न यांचीही माहिती त्यांनी दिली.

बोअरवेल रिचार्ज आणि पाण्याची शुद्धता फक्त जमिनीतून पाणी उपसण्यापेक्षा पावसाचे शुद्ध पाणी जमिनीत मुरवणे (बोअरवेल रिचार्ज) तितकेच आवश्यक आहे. आजकाल भूगर्भातील पाण्यामध्ये रासायनिक घटकांचे प्रमाण वाढत असल्याने छतावर पडणारे पावसाचे शुद्ध पाणी साठवून वापरणे आरोग्यासाठी अत्यंत हितावह आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे समन्वयक विनायक हातखंबकर यांनी परांजपे यांच्या कार्याचा गौरव करून उपस्थित शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी पाणी साठवणुकीचा हा संदेश घरोघरी पोहोचवावा, असे आवाहन केले. या वेळी दिलीप भाटकर, डॉ. दिलीप नागवेकर, पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, भारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीराम भावे, चंद्रकांत घवाळी, दादा कदम, श्री. मोहिते आदी उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply