रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात आंजणारी पुलावर काल मध्यरात्री झालेल्या अपघातात एक पोलीस कर्मचारी आणि ट्रकचालकाचा मृत्यू झाला. आंजणारी नदीपात्रात एक वाहन कोसळल्याची माहिती लांजा पोलीस ठाण्याला मिळाली होती. त्यानंतर हातखंबा इथल्या महामार्ग वाहतूक मदत केंद्रातले सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड आणि काँस्टेबल अनिल शिंगाडे सरकारी बोलेरो जीपमधून घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले; मात्र आंजणारी पुलाच्या अगदी थोडंच अंतर अलीकडे असताना पाठीमागून येणाऱ्या, लोखंडी सळ्या वाहून नेणाऱ्या २२ चाकी ट्रकने या पोलीस जीपला जोरदार धडक दिली. तीव्र उतार आणि धोकादायक वळण असल्याने अपघाताची तीव्रता वाढली. धडक बसल्यानंतर जीप डावीकडे दरीत कोसळली. ट्रकही उलटला. पोलीस जीपचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याने दोन्ही पोलिसांना बाहेर काढण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. या अपघाताची माहिती मिळताच लांजा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सुरेश कदम यांच्यासह त्यांच्या चमूने घटनास्थळी धाव घेतली. मध्यरात्रीच्या अंधारात झालेल्या या मदतकार्यात स्थानिक नागरिकांनीही सहभाग घेतला. दोन्ही पोलिसांना बाहेर काढून आधी पालीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं आणि नंतर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं; मात्र उपचारांपूर्वीच सहायक पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. या अपघातात ट्रकचालकाचाही मृत्यू झाला. अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या साह्याने महामार्गावरून बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. काँस्टेबल शिंगाडे यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Follow Kokan Media on Social Media

