रत्नागिरी : शालेय जीवनातील विविध स्पर्धा म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासाच्या प्रयोगशाळाच आहे, असे प्रतिपादन कवी-गीतकार प्रवीण दवणे यांनी केले.
येथील फाटक प्रशालेत लेखक आपल्या भेटीला कार्यक्रमात ते आज बोलत होते. वाचन, चिंतन, मननातून आणि संस्कारातूनच माणूस घडतो. आपल्या आवडीचे कलाक्षेत्र निवडा आणि कलेच्या श्रीमंतीने जीवन समृद्ध करा. ध्यानधारणा, चरित्रवाचन करा. स्पर्धेत भाग घ्या, असेही ते म्हणाले.
यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ मंचावर उपस्थित होते. सरस्वतीपूजन आणि दीपप्रज्ज्वलाने कार्यक्रमाला सुरवात झाली. मालगुंड येथे कवी केशवसुत नगरी येथे कोकण मराठी साहित्य परिषदेचे १८वे मध्यवर्ती साहित्य संमेलन पुढील महिन्यात होणार आहे. याचे औचित्य साधून विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधण्यासाठी 'लेखक आपल्या भेटीला' कार्यक्रमाचे आयोजन कोमसाप व शाळेच्या वाङ्मय मंडळातर्फे करण्यात आले.
बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेली अस्वस्थता त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त करताना विद्यार्थ्यांना वाचनाकडे वळण्याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला. ते म्हणाले, पुढे जायचे असेल तर भाषा मात्र उत्कृष्ट हवी. तुमची भावना शुद्ध आहे का ते तुमच्या भाषेतून कळते. प्रकाशाच्या बिया पेरणारे आम्ही शिक्षक आहोत. २०० पेरल्या तर २ तरी उगवतील. म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधतो. कविता कशी सुचते याचा आनंददायी अनुभव अगदी साध्या सोप्या शब्दांत विद्यार्थ्यांसमोर मांडला. ग. दि. माडगूळकर यांच्या गीतरामायणातील रचनांमधला गोडवा अप्रतिम असून एकदा तरी गीतरामायण ऐकावे. रत्नागिरीतील विद्यार्थ्यांनी कोकणातील साहित्यिकांची पुस्तके वाचावीत. ज्याचे चारित्र्य असते त्याचे चरित्र असते, अशी चरित्रे वाचावीत, असे आवाहन श्री. दवणे यांनी केले.
कलावंताच्या सहवासातून कलावंत घडतात. आपल्यातील कलावंत ओळखण्याचे हेच योग्य वय असल्याचे डॉ. प्रदीप ढवळ यांनी सांगितले. कोमसापच्या साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले. श्री. दवणे यांनी फाटक हायस्कूलच्या वाङ्मय मंडळाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा दाक्षायणी बोपर्डीकर यांनी मूकबधिर विद्यार्थ्यांनी तयार केलेली भेटवस्तू देऊन प्रा. दवणे, प्रा. ढवळ आणि कोमसापचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, कोकण युवा मोर्चाचे प्रमुख अरुण मोरये यांचा सन्मान केला. संस्थेचे सचिव राजीव गोगटे, मुख्याध्यापक राजन कीर, पर्यवेक्षिका नेहा शेट्ये आदी मान्यवरांसह शिक्षक आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक राजन कीर, सूत्रसंचालन विजय गावडे यांनी केले. मान्यवरांचा परिचय प्रज्ञा दामले यांनी करून दिला. विलास पांचाळ यांनी आभार मानले.


