रत्नागिरी : येथील आविष्कार या मतिमंद दिव्यांगांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दिवाळीच्या विविध वस्तू विक्रीसाठी सज्ज झाल्या आहेत.
दिवाळीची चाहूल लागताच आविष्कारमध्ये हस्तकलेतून साकार होणाऱ्या आणि दिवाळीसाठी उपयुक्त अशा वस्तू निर्मितीचे वेध लागतात आणि साकार होत जाते विविध हस्तकलाकृती. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून शामराव भिडे कार्यशाळा आणि मीरा लिमये उद्योग केंद्र विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहित करीत असते. या वस्तू निर्मितीतून विद्यार्थ्यांना अनेक कलागुणांना वाव मिळत असून विद्यार्थी स्वावलंबी होऊन अधिक प्रोत्साहित होताना दिसतात.
प्रौढ दिव्यांगाना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे करून समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणून एक उत्पादक घटक बनविण्याकरिता शामराव भिडे कार्यशाळा गेली ३४ वर्षे कार्यरत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे व्यावसायिक पुनर्वसन करण्यात कार्यशाळेला यश आले आहे. कार्यशाळा आणि उद्योग केंद्राच्या माध्यमातून खास दिवाळीकरिता लागणाऱ्या विविध वस्तू आणि बरेच काही तयार करून त्याची विक्री करण्यात येते. विद्यार्थी विक्री केंद्राच्या माध्यमातून स्वतः वस्तू निर्मिती केलेल्या वस्तू विक्री करीत असतात. त्यामुळे विद्यार्थी प्रोत्साहित होऊन त्यांचे पुढील कौशल्य विकसित होण्यासाठी मोलाची मदत होत असते.
या विद्यार्थ्यांनी खास दिवाळीनिमित्त सुंदर भेट वस्तूंचा आकर्षक गिफ्ट बॉक्स तसेच आकाश कंदील, हँडमेड साबण, पिशव्या, मेणबत्ती, अगरबत्ती, धूप काडी, फोटो फ्रेम, आकर्षक विविधरंगी पर्स आणि बरेच काही तयार केले आहे. संस्थेच्या सौ. सविता कामत विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनीदेखील त्यांच्या त्यांच्या कलाकृतींनी वस्तूनिर्मिती केली आहे. या सर्व वस्तू संस्थेमध्ये विक्रीकरिता उपलब्ध आहेत. रविवार दिनांक १ नोव्हेंबर ते बुधवार दिनांक ४ नोव्हेंबरअखेर सायंकाळी ४ ते ९ या वेळेमध्ये स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात वस्तू विक्री स्टॉलचे आयोजन केले आहे. या विक्री स्टॉलचे उद्घाटन ज्येष्ठ सीए श्रीकांत वैद्य यांच्या हस्ते रविवार दि. १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे.



