रत्नागिरी : शारीरिक क्षमतेचा कस पाहणारी जागतिक पातळीवरची गोवा आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धा (७०.३) डॉ. नितीन सनगर आणि राहुल भोसले या दोन रत्नागिरीकरांनी केवळ सात तास दोन मिनिटांच्या कालावधीत यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन एशिया समितीच्या अंतर्गत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जगातल्या ६८ देशांमधल्या साडेतीन हजारांहून अधिक नामांकित खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. समुद्राच्या उसळत्या लाटांवर मात करत १.९ किलोमीटर पोहणं, तीव्र चढ-उतारांच्या खडतर मार्गांवर ९० किलोमीटर सायकलिंग आणि दमछाक करणाऱ्या किनारी रस्त्यांवर २१.१ किलोमीटरची हाफ मॅरेथॉन धावणं असं या स्पर्धेचं स्वरूप होतं. जगातल्या सर्वांत खडतर आणि आव्हानात्मक एकदिवसीय ट्रायथलॉनपैकी एक मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या या दोघांनी ऐतिहासिक यश प्राप्त केलं. त्याबद्दल त्या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ. नितीन सनगर यांची ही चौथी ट्रायथलॉन होती. ७०.३ फॉरमॅटमधील तिसरी आणि अधिकृत आयर्नमॅन म्हणून पहिलीच स्पर्धा ठरली. यापूर्वी त्यांनी सुपर रँडोनियर (२००, ३००, ४०० आणि ६०० किलोमीटर) सायकलिंगचे कठीण टप्पे पूर्ण केले आहेत. सलग तीन वर्षे टाटा फुल मॅरेथॉन आणि सलग तीन वर्षे सातारा हिल मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या डॉ. सनगर यांनी नुकतेच सातारा हिल मॅरेथॉनमध्ये 'सब टू' वेळेसह सुवर्णपदक पटकावलं आहे. त्यांना कोल्हापुरातल्या 'अर्हता'चे पंकज रावळू यांचं प्रशिक्षण लाभलं. राहुल भोसले यांनी यापूर्वी दुबईच्या खोल समुद्रातील १० किलोमीटर ओशनमॅन ओपन वॉटर स्विमिंग, लोहपुरुष मालवणमधील राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा यांसह अनेक मॅरेथॉनमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गोवा आयर्नमॅन ७०.३च्या तयारीसाठी त्यांनी डॉ. नितीन सनगर यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव केला होता.
Follow Kokan Media on Social Media

