रत्नागिरी : 'ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून, त्यांनी मिळवलेले यश केवळ जिल्ह्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्राची आणि देशाची मान उंचावणारे आहे,' असे गौरवोद्गार राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी काढले. रत्नागिरीतील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री डॉ. सामंत यांनी संगणक ऑपरेटर ट्रेडमधील अथर्व नागवेकर या विद्यार्थ्याचे विशेष कौतुक केले. देशभरातील सुमारे एक लाख ३७ हजार विद्यार्थ्यांमधून अथर्वने ६०० पैकी ६०० गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. हे यश ऐतिहासिक असून अशा गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी शासन सदैव भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. राणी लक्ष्मीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या श्रावणी चव्हाण यांचाही यावेळी सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात आयटीआय प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी संगणक लॅबची आवश्यकता व्यक्त केली होती. यावर त्वरित सकारात्मक प्रतिसाद देऊन पालकमंत्र्यांनी ४० संगणकांच्या सुसज्ज लॅबसाठी जिल्हा नियोजन समिती निधीतून आवश्यक निधी देण्याची घोषणा केली. "संस्थेने येत्या दोन दिवसांत रीतसर प्रस्ताव सादर करावा. तात्काळ निधी मंजूर करण्यात येईल," असे सांगतानाच इतर विकासकामांचे प्रस्तावही अधिकाऱ्यांनी कोणत्याही दिरंगाईशिवाय वेळेत सादर करावेत, जेणेकरून निधीअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असे निर्देशही त्यांनी दिले. डॉ. सामंत म्हणाले, "ग्रामीण भागातील शाळेत शिकलो तरी न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. मराठी उद्योजक किर्लोस्करांनी टोयोटासारख्या जागतिक कंपनीशी भागीदारी उभी केली. एके काळी सोलापूरच्या बसस्थानकावर उसाचा रस विकणाऱ्या मराठी आई-वडिलांचा मुलगा गणेश निबे यांना आज देशातील आघाडीची सुरक्षा यंत्रणा (झेड प्लस सिक्युरिटी) आहे. तुमच्यामध्येही अशीच भरारी घेण्याची ताकद आहे." लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या संस्थांमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीने देशाच्या प्रगतीत योगदान करावे आणि शिक्षकांनी केलेल्या संस्कारांची जाणीव ठेवावी, असा मोलाचा सल्लाही पालकमंत्र्यांनी दिला. अथर्व नागवेकर म्हणाला, 'आमच्या शिक्षकांनी वेळेचे उत्तम नियोजन करून आमच्याकडून घेतलेला नियमित सराव व परीक्षा यामुळेच माझी परीक्षेची परिपूर्ण तयारी होऊ शकली. या प्रवासात अभ्यासातील सातत्य, वेळेचे व्यवस्थापन आणि ध्येयपूर्तीसाठी प्रामाणिक मेहनत कशी करावी, हे मला शिकायला मिळाले. माझ्या या यशाचे श्रेय माझे शिक्षक, मार्गदर्शक आणि कुटुंबीय यांना जाते. त्यांनी मला प्रत्येक टप्प्यावर मोलाची साथ दिली. पालकमंत्रिमहोदयांच्या हस्ते माझा सत्कार होणे, हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि आनंदाचा क्षण आहे.' श्रावणी चव्हाण म्हणाल्या, 'आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत आनंददायी आणि संस्मरणीय आहे. स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने उभे राहण्याची जिद्द आणि चिकाटी आज प्रत्यक्षात उतरली आहे. माझ्या या यशामध्ये माझे पती सचिन चव्हाण यांची खंबीर साथ आणि मार्गदर्शक मीनल दळी यांचे अनमोल सहकार्य लाभले, त्याबद्दल मी त्यांची मनापासून ऋणी आहे. विशेषतः राणी लक्ष्मीबाई मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मी मनापासून आभार मानते. शिक्षणासाठी वयाची कोणतीही अट न ठेवता, माझ्यासारख्या स्त्रीला शिकण्याची संधी देऊन संस्थेने माझ्या आत्मनिर्भरतेचे स्वप्न पूर्ण केले. पालकमंत्री डॉ. उदय सामंत सरांच्या हस्ते झालेला हा सत्कार माझ्या पुढील वाटचालीस नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणारा आहे.' प्राचार्य ए. एस. देसाई आणि प्राचार्य एस. जे. कोतवडेकर यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला आयटीआयचे प्राचार्य, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Follow Kokan Media on Social Media

