रत्नागिरीत पावसाचा कहर; सहा जुलैला शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

रत्नागिरी : जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेला ऑरेंज अलर्ट लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या, सोमवारी, ६ जुलै २०२६ रोजी सुट्टी जाहीर केली आहे. नवी मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्येही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. सध्या जिल्ह्यात कोसळत असलेल्या सततच्या पावसामुळे खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर चिपळूण येथील वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
​अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी अंगणवाड्यांपासून सर्व सरकारी-खासगी, अनुदानित-विनाअनुदानित शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा, ​व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रांच्या आस्थापनेतील सर्व शैक्षणिक संस्थांना ही सुट्टी लागू असेल.
पूरसदृश परिस्थिती आणि मुसळधार पावसाचा अंदाज पाहता नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • जगबुडी नदीच्या पुराचं पाणी खेड शहराच्या काही भागांमध्ये शिरलं आहे. तीनबत्ती नाका, नगर पालिका, मुकादम कॉम्प्लेक्स वगैरे भागात पाणी आहे. लगतच्याच नारिंगी नदीलाही पूर आल्यामुळे खेड-दापोली मार्ग पाण्याखाली गेला असून, वाहतूक ठप्प झाली आहे.
  • दापोलीत अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे.
  • चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीचं पाणी बाजारपुलाला लागलं आहे.
  • राजापुरात अर्जुना व कोदवली नद्यांना पूर आला असून, जवाहर चौकात पाणी शिरलं आहे.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply